Take a fresh look at your lifestyle.

राज्यमंत्री केले म्हणून यशवंत सिन्हा राष्ट्रपती भवनातून शपथ न घेता निघून गेले होते

समाजवादी विचारधारा असलेल्या जनता दलातून राजकारणाला सुरुवात करून यशवंत सिन्हा यांनी उजव्या विचारसरणीच्या भारतीय जनता पक्षापर्यंत त्यांनी आपला प्रवास केला.

0

आज देशातील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. भाजपप्रणित आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत.

विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव झाला आहे. सिन्हा यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्यांची राजकीय कारकीर्द मात्र मोठी आक्रमक ठरली आहे. 

यशवंत सिन्हा यांच्या आयुष्यातील काही प्रमुख किस्से

दिवस होता 2 डिसेंबर 1989.

त्या दिवशी नवव्या लोकसभेचे निकाल लागले. काँग्रेस पक्ष त्यांच्या त्या वेळपर्यतच्या दुसऱ्या सर्वाधिक निच्चांकी संख्येवर होता. काँग्रेसला सभागृहात फक्त 197 जागा जिंकता आल्या होत्या.

विरोधी पक्षांनी एकत्र येऊन राजीव गांधींच्या विरोधात मोट बांधली गेली. नॅशनल फ्रंट नावाची नवी आघाडी स्थापन झाली. जनता दल 143 जागांसह सर्वात मोठा पक्ष होता. भाजपचे 85 खासदार आणि डाव्यांचे 52 खासदार या जनता दलाला बाहेरून पाठिंबा देत होते.

असे एकत्रित करून हा आकडा अखेर 280 वर पोहोचला होता. सत्ता स्थापनेच्या 272 च्या जादुई आकड्यापेक्षा फक्त आठने जास्त.

विरोधी पक्षाकडे बहुमत येत असल्याचे कळताच विश्वनाथ प्रताप सिंह देशाचे सातवे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार होते. शपथविधी सोहळ्यात एक गोष्ट सर्वांनाच खटकत होती. सत्ताधारी पक्षाचे सरचिटणीस तेथे उपस्थित नव्हते. यशवंत सिन्हा असे या व्यक्तीचे नाव होते

यशवंत सिन्हा यांनी त्यांच्या Confessions of a Swadeshi Reformer या पुस्तकात या संपूर्ण घटनेची नोंद केली आहे.

यशवंत सिन्हा लिहितात, “सार्वत्रिक निवडणुकीत राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा निर्णायक पराभव झाला. व्ही.पी. सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन पक्ष स्थापन झाला. त्याला भाजप आणि डावे या दोघांचाही पाठिंबा होता.

पक्षाचे सरचिटणीस, मुख्य प्रवक्ते म्हणून मध्यवर्ती कार्यालयाचा कार्यभार आणि मुख्य प्रचार व्यवस्थापक म्हणून मी जनता दलाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. दुर्दैवाने माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला व्ही.पी.सिंग यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान दिले पण मला मंत्री होण्याची ऑफर देण्यात आली.

ही ऑफर मला मान्य नव्हती. यामुळे मी राष्ट्रपती भवनातील शपथविधी सोहळ्यापासून दूर राहिलो. चंद्रशेखर यांनाही व्ही.पी. सिंह यांनी माझ्यावर अन्याय केल्याचे वाटत होते. त्यामुळे त्यांनीही माझ्या सरकारमध्ये सामील न होण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.”

पुढे अवघ्या दहा महिन्यातच व्हीपी सिंग यांचे सरकार कोसळले आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर चंद्रशेखर देशाचे नवे पंतप्रधान झाले.

चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात यशवंत सिन्हा यांना स्थान मिळाले. तेही अर्थमंत्री म्हणून. पण त्यावेळी देश सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत होता. त्यामुळे एकप्रकारे यशवंत सिन्हा यांच्या खांदयावर मोठी जबाबदारी देण्यात आली होती. 

दुसऱ्यांदा अर्थमंत्री, पण भाजपच्या सरकारमध्ये…

साल होते 1998

भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी हजारीबागमध्ये निवडणूक प्रचारासाठी आले होते. सभेत आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या बाजूने मते मागताना अडवाणी म्हणाले,

“तुम्ही यशवंत सिन्हा यांना भरघोस मते देऊन विजयी करा. आमचे सरकार आले तर आम्ही त्यांना अर्थमंत्री करू.”

1984 मध्ये जनता पक्षातून राजकीय प्रवासाला सुरुवात करणाऱ्या यशवंत सिन्हा यांनी अवघ्या 12 वर्षात आपली संपूर्ण निष्ठा बदलून टाकली होती.

समाजवादी विचारधारा असलेल्या जनता दलातून सुरुवात करून ते उजव्या विचारसरणीच्या भारतीय जनता पक्षापर्यंत त्यांनी आपला प्रवास केला.

अडवाणी यांच्या भाषणाचा परिणाम झाला. हजारीबाग मधून यशवंत सिन्हा तीन लाख 23 हजार 283 मते घेत निवडून आले. निवडणुकीनंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले. अडवाणींनी दिलेला शब्द पाळला आणि यशवंत सिन्हा यांना अर्थमंत्री करण्यात आले.

17 एप्रिल 1999 च्या दिवशी अण्णा द्रमुकने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने केंद्रातील अटलबिहारी सरकार एका मताने पडले.

ऑक्टोबर 1999 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. भाजपचे पुन्हा सरकार आले. यशवंत सिन्हा हजारीबागमधून पुन्हा निवडणूक आले आणि पुन्हा अर्थमंत्री बनले. पण जुलै 2002 च्या मंत्रिमंडळ बदलात त्यांना परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आले आणि 2004 साली भाजप सरकार सत्तेतून जाईपर्यंत ते या पदावर होते.

लोकसभेत पराभव, पुन्हा विजय पण… 

2004 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. आपल्या विजयाचा विश्वास असलेल्या भाजपाला मोठा धक्का बसला. भाजपची ‘इंडिया शायनिंग’ हि घोषणा फसली. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निवडणूक हरलेल्या बड्या चेहऱ्यांमध्ये यशवंत सिन्हा हे पहिले नाव होते. सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते. हजारीबागमधून भाकपचे भुवनेश्वर प्रसाद मेहता यांनी त्यांचा 105329 मतांनी पराभव केला.

यशवंत सिन्हा यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. मात्र संघटनेतील त्यांचे स्थान तसेच राहिले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत यशवंत सिन्हा यांनी हजारीबागमधून पुन्हा निवडणूक लढवली. ते पुन्हा आपली जागा जिंकण्यात यशस्वी झाले पण भाजपला याही वेळी सत्ता मिळाली नाही. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत यशवंत सिन्हा यांनी पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

2014 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांना आणखी एक संधी हवी होती. पण मोठ्या तयारीनिशी मैदानात उतरलेल्या नरेंद्र मोदी यांना आपली दावेदारी सिद्ध करता आली. पक्षांतर्गत सत्तेचा संघर्ष सुरू होता आणि या संघर्षात यशवंत सिन्हा चुकीच्या बाजूला उभे होते.

नरेंद्र मोदींना कार्यकर्त्यांचा, पक्ष संघटनेचा पाठिंबा आणि संघाचा आशीर्वाद होता. सिन्हा मात्र अडवाणी यांच्या बाजूला उभे होते. अशा स्थितीत मोदी गटाकडून त्यांना बाजूला केले जाऊ लागले. राजकीय पुनर्वसनासाठी त्यांचे पुत्र जयंत सिन्हा यांना हजारीबागमधून भाजपचे तिकीट देण्यात आले. जयंत सिन्हा त्यांच्या वडिलांकडून मिळालेल्या जागेवर निवडून आले, लोकसभेत गेले. पुढे मंत्री देखील झाले.

पण एकेकाळी भाजप नेतृत्वाचे खास असणारे यशवंत सिन्हा भाजपमधून बाहेर पडले आणि भाजप सरकारवर टीका करू लागले. काही काळानंतर त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

ममता बॅनर्जी यांच्या पुढाकारातून त्यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळाली. पराभव होणार हे माहित असताना देखील यशवंत सिन्हा फक्त विरोधाचा आवाज म्हणून उभा राहिले, लढले आणि पडलेही. 

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.