Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्राध्यक्ष गनी देश सोडून गेल्यानंतर अफगाणिस्तानात आतापर्यंत काय काय घडलं?

0

अफगाणिस्तानमधून अमेरिकी फौजा माघारी परतल्यानंतर जे अपेक्षित होतं, तेच घडू लागल्याचं दिसू लागलं. तालिबाननं हळूहळू अफगाणिस्तानमधील एकेक प्रांत आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. अखेर रविवारी तालिबानी बंडखोरांनी काबूलमध्ये शिरकाव करत अफगाणिस्तानच्या राजभवनावर आपला हक्क प्रस्थापित केला.

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला आणि आख्खा देश तालिबान्यांच्या ताब्यात गेल्याचं स्पष्ट झालं.

अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर काही आठवड्यातच तालिबानने सक्रीय होत, अफगाणिस्तानातील बहुसंख्य शहरांचा ताबा घेतला. राजधानी काबूलसह आता अनेक शहरं तालिबानच्या ताब्यात आहेत.

यानंतर सध्याचे राष्ट्रपती अशरफ गनी हे मात्र स्वत:च्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांना सोबत घेऊन देश सोडून पळून गेलेत. ते ताजकिस्तानला पोहोचलेत. अशरफ गनी यांनी विश्वासघात केल्याची भावना अफगाण लोक व्यक्त करतायत.

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी रविवारी देशातून पलायन केल्याची माहिती दोन अफगाणी अधिकाऱ्यांनी दिली. यापैकी एकजण माजी अध्यक्ष हमीद करझई यांच्या कार्यालयातील असून, दुसरा अफगाणी सुरक्षा परिषदेवर आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्ला मोहिब आणि एक जवळचा सहकारी यांच्यासह घनी यांनी देशत्याग केला, परंतु ते कुठे गेले, हे तात्काळ कळू शकले नाही. मात्र ते ताझाकिस्तान मार्गे गेले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

मोठा संघर्ष टळला

दुसरीकडे अनेक शहरांचे गव्हर्नर यांनी स्वत:हून आत्मसमर्पण केल्याने मोठा संघर्ष टळला. यादरम्यान काबूलमध्ये सध्या असलेल्या अनेक देशांच्या राजदुतांनी आपआपल्या नागरिकांना तातडीने देश कसा सोडता येईल यासाठी प्रयत्न सुरु केले.

अध्यक्षीय प्रासाद ताब्यात घेतला

अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेलाय. रविवारी तालिबान बंडखोरांनी अफगाणिस्तानच्या राजधानीमध्ये प्रवेश करत येथील सरकारी इमारती अध्यक्षीय प्रासाद ताब्यात घेतला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सत्ता हस्तांतराबाबत चर्चा करण्यासाठी तालिबानचे मध्यस्थ रविवारी अध्यक्षीय राजवाड्यात पोहोचले.

सरकारच्या बाजूने माजी अध्यक्ष हमीद करझई आणि अफगाण राष्ट्रीय सलोखा परिषदेचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला वाटाघाटी करणार आहेत. बंद दरवाजाआडच्या या वाटाघाटी ‘तणावपूर्ण’ स्थितीत होण्याची शक्यता एका अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे

अमेरिकेत राजकीय वाद सुरु झाला आहे

अफगाणिस्तानात संघर्ष सुरु असताना तिकडे अमेरिकेत राजकीय वाद सुरु झाला आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकेचे सैन्य हटवल्याने हा वाद उफाळल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष जो बायडन यांना जबाबदार धरत, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

अफगाणिस्तानातून पळाल्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिलं आहे. देशातील रक्तपात रोखण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं असं अशरफ गनी म्हणाले.

अमेरिकेने दुतावास काबूल विमानतळावर हलवलं

काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सर्व व्यावसायिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. इथून केवळ सैन्याच्या विमानांनाच परवानगी देण्यात आली आहे. तालिबानने यापूर्वीच दावा केला आहे की काबूलमध्ये राष्ट्रपती भवनचा ताबा आपण घेतला आहे.

यानंतर काही तासांनी अल जजीराने एक व्हिडीओ जारी करुन तालिबानी सैन्य राष्ट्रपती भवनात असल्याचं म्हटलं होतं. अमेरिकेने आपलं अफगाणिस्तानातील दुतावास काबूल विमानतळावर हलवलं आहे. दुतावासावरील झेंडाही उतरुन एअरपोर्टकडे नेण्यात आला.

मलाला म्हणते, “मला काळजी वाटते!”

२४ वर्षांच्या मलाला युसूफझईने या सगळ्या प्रकारावर प्रचंड धक्क्यात असल्याचं ट्वीट केलं आहे. “तालिबान अफगानिस्तानवर ताबा मिळवत असल्याचं बघून आम्हाला प्रचंड धक्का बसला. मी तिथल्या महिला, अल्पसंख्य आणि मानवी अधिकार कार्यकर्त्यांविषयी खूप चिंतेत आहे. जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक सत्तांनी अफगाणिस्तानमध्ये तातडीने लक्ष घालून युद्धबंदी करावी. अफगाणिस्तानमध्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करावी आणि नागरिकांना व निर्वासितांना संरक्षण द्यावं”, असं मलाला युसूफझईने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.