Take a fresh look at your lifestyle.

राजीव गांधी पंतप्रधान म्हणून देशाला आधुनिकतेचा कानमंत्र देऊन गेले

देशात त्याआधी असणाऱ्या 21 वर्षे या मतदानाच्या वयोमर्यादा बदलून त्यांनी 18 वर्षे ही नवीन वयोमर्यादा लागू केली. 61 व्या घटनादुरुस्तीद्वारे त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता

0

आज आपण ज्या ‘आधुनिक भारतात’ व ‘डिजिटल इंडियामध्ये’ श्वास घेतो आहोत. त्या आधुनिकतेचा पाया स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी रचला होता. आपल्या अथक परिश्रम दूरदृष्टी यामुळे त्यांनी भारतीयांच्या मनात ‘आर्थिक महासत्तेचे स्वप्न’ पाहण्याची कुवत निर्माण केली.

उदात्त, भव्य,देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला, जनसेवेचा वसा पुढे चालताना त्यांनी देशाला आधुनिकतेची झळाळी दिली.

भारतासारख्या खंडप्राय देशात राजकीय नेत्यांची एक टिपिकल छबी लोकांच्या मनात होती त्यास छेद देणारे राजीव गांधी यांचे व्यक्तिमत्व होते. ब्रिटीशांच्या जोखडातून देशाला सोडून लोकांच्या मनामध्ये ते अभय एकात्मता निर्माण करणाऱ्या, पंडितजींचा व स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या सर्वसमावेशक राजकारणाचा प्रगल्भ वारसा चालवताना त्यांची शिकवण राजीवजींच्या कर्तृत्वावर उमटलेली दिसते.

ऑगस्ट 20 ऑगस्ट 1944 ला राजीवजी यांचा जन्म झाला. ते तीन वर्षाचे असताना देश स्वतंत्र झाला. त्यांच्या वाढत्या वयाबरोबरच स्वतंत्र भारताचे वयही वाढत होते.

हातात हात घालून वाढणाऱ्या या दोघांची नाळ तेव्हापासून जोडली गेली होती. त्यांचे नाते भविष्यात एका वेगळ्याच दृष्टीने दृढ होणार आहे. याची पुसटशी कल्पनाही त्यावेळी त्यांच्या मनी नव्हती.

तरुण वयात देश-विदेशात शिक्षणाचे धडे गिरवताना त्यांनी त्या-त्या ठिकाणची संस्कृती लोकजीवन यांचा बारकाईने अभ्यास केला पुढील काळात भारतातील खेड्यापाड्यात योजना पोहोचवण्यासाठी व व्यवस्थेतील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी या बाबींचा त्यांना फार उपयोग झाला.

आपले बंधू संजयजी गांधी यांच्यासोबत त्यांनी प्राथमिक शिक्षण ‘ड्यून स्कूल देहरादून’ येथे पूर्ण केले. ‘ट्रिनिटी कॉलेज’ येथेही त्यांनी काही काळ शिक्षण घेतले व त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार ते ‘केंब्रिज इम्पीरियल कॉलेज’, लंडन येथे त्यांनी उच्च शिक्षण घेतले.

शिकत असताना घरात जरी राजकारणाचा वारसा असला,तरी आपण वेगळा मार्ग निवडायचा हे त्यांनी ठरवून टाकले होते. अगदी त्यासाठी ती काय ते वैमानिकही झाले. यावेळी दीर्घकाळ त्यांचा राजकारणाशी संबंध नव्हता. ते आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात व्यस्त होते.

याचदरम्यान 1968 मध्ये ते ते सोनियाजींच्या प्रेमात पडले व प्रेमाला न्याय देत त्या दोघांनी लग्नगाठ बांधली. असे म्हटले जाते, की ‘राजकारणात सहभाग घेणार नाही’, असेही या नवदांपत्यांना ठरवून टाकले होते.

पण काळाचा महिमा कोणासही कळत नाही राजीव गांधी यांच्या बाबतीतही असेच झाले. 1980 मध्ये झालेल्या एका विमान अपघातात त्यांचे थोरले बंधू संजय गांधी यांच्या अकाली निधन झाले.

त्यावेळी इंदिराजी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी राजीव यांनी फार प्रयत्न केले. इंदिराजींना राजकीय जीवनातही भक्कम आधार म्हणून राजीव गांधी यांचा अनिच्छेने का होईना पण राजकारणात प्रवेश झाला. पुढे 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर संपूर्णपणे जबाबदारी राजीवजी यांच्या खांद्यांवर आली.

त्यावेळी त्यांच्यावर दोन मोठ्या जबाबदाऱ्या होत्या एकीकडे आजोबा व आईचा प्रगल्भ राजकीय व देशसेवेचा वारसा सांभाळण्याची व दुसरीकडे कुटुंबाची देखभाल करण्याची.

त्याग, समर्पण, देशसेवा यांच्यासाठी वाहून घेतलेल्या कुटुंबातील सदस्याला लोकांनी प्रचंड मताने देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान केले. पण त्यावेळी ते राजकारणात नवखे होते, कुठलेही राजकीय आराखडे व डावपेच त्यांच्या मनात नव्हते आणि म्हणूनच ते व्यवस्थेच्या शेवटच्या घटकाच्या भावनाही संवेदनशील मनाने जाणून घेऊ शकले.

गांधीजींच्या स्वप्नातला, खेड्यातला भारत त्यांना जाणून घ्यायचा होता, म्हणून त्यांनी खेडोपाडी फिरून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.

त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील निर्णयांनी भारताला आधुनिकतेची कवचकुंडले चढवली. त्यांचे अनेक निर्णय आजही आपणास आश्चर्यचकित करतात अत्यंत दूरदृष्टीने घेतले गेलेले निर्णय भारताच्या जडणघडणीत आजही पोषक ठरत आहेत. जगात भारताची आधुनिक छबी निर्माण करण्याचे श्रेय स्वर्गीय राजीव गांधी यांनाच जाते. देशाच्या एकंदरीत व्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारे निर्णय त्यांनी घेतले.

पंचायतीराज व्यवस्थेचा पाया रचण्याचं श्रेय देखील त्यांच्याच नावावर आहे. राजीव गांधी यांचं म्हणणं होतं की, जोपर्यंत पंचायतराज व्यवस्था सुदृढ होत नाही, तोपर्यंत आपण शेवटच्या घटकांपर्यंत लोकशाही पोहचवू शकणार नाही.

त्यांनी आपल्या कार्यकाळात पंचायतीराज व्यवस्थेबाबत एक संपूर्ण प्रस्ताव तयार केला होता. त्यांच्या हत्येनंतर एका वर्षाने त्यांचा हा विचार प्रत्यक्षात उतरला.

1992 मध्ये 73 आणि 74 वी घटनादुरुस्ती करत पंचायतीराज व्यवस्थेचा उदय झाला. राजीव गांधीं सरकारने केलेल्या 64 व्या घटनादुरुस्तीच्या आधारे नरसिम्हा राव सरकारकडून हे विधेयक पारीत करण्यात आलं. 24 एप्रिल 1993 पासून संपूर्ण देशात पंचायती राज व्यवस्था लागू झाली.

पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांनी दोन गोष्टी साध्य केल्या ग्रामीण भागामध्ये विकास आणि हक्काची जाणीव निर्माण केली व महिलांना त्यांचा हक्क स्वाभिमान व अधिकार याविषयी जागरूक केले.

भारतातील प्रत्येक गाव टेलिफोनद्वारे जोडले जाणे व संगणकाच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे, हे त्यांचे सर्वात मोठे स्वप्न होते.

त्या स्वप्नाची पायाभरणी त्यांनी आपल्या काळात केली व आधुनिक भारताला विज्ञान-तंत्रज्ञानाच्या पंखांची जोड दिली. केवळ तांत्रिक प्रगती वर भर देऊन ते थांबले नाहीत, तर नवभारताच्या सशक्तिकरणासाठी त्यांनी क्षेपणास्त्र आणि अनुप्रसाराच्या कार्यक्रमांना वेग देण्याचा निर्णय घेतला.

देशात त्याआधी असणाऱ्या 21 वर्षे या मतदानाच्या वयोमर्यादा बदलून त्यांनी 18 वर्षे ही नवीन वयोमर्यादा लागू केली. 61 व्या घटनादुरुस्तीद्वारे त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.

ग्रामीण आणि शहरी भागात नवोदय विद्यालयांचा पाया राजीव गांधी यांनी रचला. त्यांच्या कार्यकाळात “जवाहर नवोदय विद्यालये” निर्माण झाली. याचा फायदा भविष्यात लाखो विद्यार्थ्यांना झाला व आजही अनेक गुणवंत त्यातून घडवले जात आहेत. या योजनेची की त्यावेळी सर्व स्तरातून स्तुती झाली होती.

1984 मध्ये दूरसंचार नेटवर्क ची स्थापना करण्यासाठी C-DOT (सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स) ची स्थापना करण्यात आली. गावागावांपर्यंत या माध्यमातून दूरसंचार जाळे टाकण्यात आलं. जागोजागी PCO सुरू झाले.गावातील जनता शहर आणि जगाशी नाळ जोडू शकली. 1986मध्ये MTNL ची स्थापना केली.

1986 मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाची त्यांनी घोषणा केली व राबवली. या धोरणांतर्गत देशात उच्च शिक्षण व्यवस्थेचा आधुनिकीकरण आणि विस्तार करण्यात आला.

‘भारताला संगणक युगात आणणारा पंतप्रधान’ म्हणूनही त्यांची ओळख आहे. राजीव गांधी आजपर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.

वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर विरोधकांकडून अनेक दोषारोप झाले; पण ते सिद्ध होऊ शकले नाहीत.

1988 साली राजीव गांधी यांनी लिट्टे विरोधात लढण्यासाठी श्रीलंकेत शांती सैनिक पाठवले. त्याची परिणिती लिट्टे सोबतचच्या संघर्षात झाली. 21 मे 1991 रोजी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान चेन्नई जवळ लिट्टेने मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधी यांची हत्या घडवून आणली. या दहशतवादी संघटनेने ‘आधुनिक भारताच्या भगीरथाला, आपल्यापासून हिरावून नेले.

नवभारताचे स्वप्न पाहणारे, भारताला आधुनिकतेचे पंख प्रदान करून विश्वाच्या अवकाशात सन्मानाने भ्रमण करण्यासाठी सज्ज करणारे, भारताच्या नव्या सहस्त्रकाचे स्वप्न पाहणारे, दूरदृष्टीचे कणखर बाण्याचे व तंत्रस्नेही, युवा मनाचे पंतप्रधान या देशाला आधुनिकतेचा कानमंत्र देऊन गेले.

  • बालाजी गाढे पाटील
  • लेखक महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते आहेत.
  • 9657575424

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.