Take a fresh look at your lifestyle.

शिंदे-ठाकरे गटात शिवसेना पक्षच नाहीतर नेत्यांची घर देखील फुटली आहेत 

शिवसेना जशी उद्धव ठाकरे-शिंदे अशा दोन गटात विभागली, तशीच परिस्थिती राज्यातील काही घरात झाली आहेत.

0

तीन महिन्यापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणारी घटना घडली. ती घटना म्हणजे एकनाथ शिंदे यांचं बंड. एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि शिवसेना पक्ष विभागला गेला. बरचसे आमदार-खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले तर काही आमदार-खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले.

हे गोष्ट झाली पक्ष फुटल्याची पण या सगळ्या घटनाक्रमात काही घरात देखील फूट पडली आहे. शिवसेना जशी उद्धव ठाकरे-शिंदे अशा दोन गटात विभागली, तशीच परिस्थिती राज्यातील काही घरात झाली आहेत. अशीच काही घरातील पक्षफुटीचा आढावा घेणारा हा रिपोर्ट

गजानन किर्तीकर – अमोल किर्तिकर

अगदी दोन दिवसापूर्वी निष्ठावान शिवसैनिक असलेल्या खासदार गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटातून शिंदे गटात प्रवेश केला. तसं गजानन किर्तीकर शिंदे गटात प्रवेश करणार याची बऱ्याच काळापासून चर्चा सुरु होती. अखेर त्यांनी गट बदलला. 

पण या सगळ्या घटनांपासून गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर मात्र अलिप्त राहिले. वडिलांनी पक्ष बदलला तरी अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचे नक्की केले आहे.

भावना गवळी – प्रशांत सुर्वे

शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार भावना गवळी या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्या. पण या सगळ्या घटनाक्रमात भावना गवळी यांचे पती प्रशांत सुर्वे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला आहे. खासदार गवळी यांचे सुर्वे हे पती असून त्यांचा घटस्फोट झाला आहे.

खासदार भावना गवळी आणि प्रशांत सुर्वे यांचा 2013 सालीच घटस्फोट झालेला आहे. भावना गवळी यांच्याशी विभक्त झाल्यानंतर प्रशांत सुर्वे यांनी 2014 मध्ये त्यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवली होती.

सुषमा अंधारे – वैजनाथ वाघमारे 

शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला. आपल्या आक्रमक भाषणांनी त्यांनी महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण केली. पण सुषमा अंधारे यांचे पूर्वाश्रमीचे पती ॲड. वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला.

शिंदे गटात प्रवेश केल्यांनतर ॲड. वैजनाथ वाघमारे यांनी सुषमा अंधारे यांना थेट इशारा देत त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचही जाहीर केलं. शिवाय लवकरच सुषमा अंधारे यांचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा वाघमारे यांनी दिला आहे.

प्रतापराव जाधव – संजय जाधव

बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. पण प्रतापराव जाधव यांचे बंधू संजय जाधव हे मात्र मूळ शिवसेनेतच राहीले. ज्यामुळे जाधव कुटुंबातच राजकीय फूट पडली असल्याचं बोललं जातंय. संजय जाधव हे मेहकरचे दोन वेळा नगराध्यक्ष होते. 

किशोर पाटील – वैशाली सूर्यवंशी

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून त्यांच्या परिवारातील वैशाली सूर्यवंशी समोर उभ्या राहणार असल्याच्या चर्चा आहेत. वैशाली सूर्यवंशी ह्या किशोर पाटील यांच्या चुलत भगिनी आहेत.

वैशाली सूर्यवंशी यांचे वडील आर. ओ. पाटील हे आमदार होते आणि किशोर पाटील यांना आर. ओ. पाटील यांनीच राजकारणात आणले होते. त्यामुळे पाटील परिवारातील सदस्य आता शिंदे-ठाकरे गटातून आमने-सामने असतील. 

अगदी ठाकरे परिवाराने देखील राज ठाकरे यांच्या रूपाने घरातील फूट पहिली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये देखील स्मिता ठाकरे, जयदेव ठाकरे, निहार ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याचे आपण पाहिलं. 

महाराष्ट्राच्या राजकारणात घरातील फूट हि काही नवीन नाही, आजवर अनेक वेळा एकाच परिवारातील सदस्य आमने-सामने उभे ठाकले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर पुन्हा काही नावाची यात भर पडली इतकंच!!

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.