Take a fresh look at your lifestyle.

म्हणून मार्क्स कालातीत ठरतो !

0

एकोणिसावे शतक तंत्रज्ञान, उद्योग आणि पर्यायाने जागतिक राजकीय व्यवस्थेत उलथापालथ घडवून आणणाऱ्या अनेक घडामोडींचा साक्षीदार होते. पण या सगळयांहूनही महत्वाची क्रांती घडून आली ती नव्या विचारांमुळे. हे विचार अतिशय भव्य स्केलचे, ठळक आणि तितकेच धोकादायक होते. हे विचार ज्यावेळी प्रत्यक्षात मांडले गेले त्यावेळी त्यांना मूर्त स्वरूप प्राप्त होऊ नये यासाठी प्रस्थापितांनी जीवाचे रान केले. वर्षानुवर्षे चालत आलेली राजकीय व्यवस्था उलथवून टाकण्याचा तो काळ होता. विज्ञानाने धर्माचे महत्त्व केव्हाच कमी केले होते. वेगाने बदल घडून येत असलेल्या जगात इथून पुढच्या मानवी पिढ्यांवर कोणत्या प्रकारच्या विचारांचे संस्कार असावेत हे त्या काळातील तत्त्ववेत्त्यांसमोरचे सर्वांत मोठे आव्हान होते. मानवी आयुष्यावर बंधने घालू पाहणाऱ्या व्यवस्था ओळखून त्यांना अधिक जबाबदार बनवणे हे या तत्ववेत्त्यांचे ध्येय होते. समाजमनाचे आकलन हे त्यांच्याकडे असलेले एकमेव शस्त्र होते. त्यातील काही जणांना आपल्या देशात देशद्रोही म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करणे भाग पडले आणि अगणित अडचणींचा सामना करावा लागला. पण त्यांनी आपले काम सोडले नाही. वैयक्तिक स्वार्थाचा त्याग करून त्यांनी ज्या चष्म्यातून जगाकडे पाहिले त्याचा आजही मानवी जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रभाव पडलेला आहे.

Highgate cemetary मध्ये अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्वे विसावा घेतात, त्यात एक व्यक्तिमत्त्व असेही आहे जे आपले वेगळे मत मांडण्याचा प्रयत्न केल्याने आजही अस्तित्वात आहे. भांडवलशाही व्यवस्थेचे संश्लेषण केलेला हा विचारवंत मानवी आयुष्याच्या मुक्तीचा देवदूत होता. त्याचे थडगे नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण अर्थव्यवस्था आणि मानवी सहभाग यांचा अभ्यास करताना त्याचा विचार आजही प्राथमिक ठरतो. त्याची विचारसरणी मानवाला स्वातंत्र्य देणारी असली तरी ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ज्या राज्यव्यवस्था निर्माण झाल्या त्या धोकादायक ठरल्या. 80’s आणि 90’s मध्ये साम्यवादी राज्यव्यवस्थेचे पतन झाले. पण आर्थिक प्रश्न आणि सामाजिक विषमता तशीच राहिल्याने त्याचे विचार कुणी discredit करू शकले नाही.

मार्क्सच्या जन्माआधी काही वर्षे त्याची जन्मभूमी असलेले Trier शहर नेपोलियनच्या ताब्यात असल्याने फ्रेंच राज्यक्रांतीच्या स्वातंत्र्य आणि समतेच्या तत्वांच्या प्रभावाखाली होते. फ्रेंच कायद्याने त्याचे वडील वकील म्हणून प्रॅक्टिस करू शकत होते पण प्रशियन राज्यात ज्यू समाजावर लादण्यात आलेल्या नागरी बंधनांमुळे त्यांना वकील म्हणून काम पाहण्यासाठी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करणे भाग होते. ज्यावेळी नागरिक उठाव करून राज्यव्यवस्था मोडीत काढतील अशी प्रत्येक युरोपियन राष्ट्राला भीती वाटत होती आणि त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात होता त्यावेळी मार्क्सचा महाविद्यालयीन प्रवास सुरु होता.बॉन विद्यापीठातील मध्यमवर्गीय मुलांच्या एका गटात तो सहभागी झाला. त्या गटातील मार्क्सचा सहभाग त्याच्या अभ्यासात distraction ठरेल अशी भीती वाटल्याने वडिलांनी त्याला बर्लिन विद्यापीठात पुढच्या अध्ययनासाठी पाठवले. तिथले जॉर्ज हेगेल नावाचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक नुकतेच अनंतात विलीन झाले होते. त्यांच्या विचारांचे आदानप्रदान करणारा Young Hegelians नावाचा एक ग्रुप तयार झाला होता. Freedom आणि Reason यांचा सहसंबंध जोडणारे हेगेलचे तत्वज्ञान मार्क्ससाठी डोळ्यांवर असलेली झापडे उघडणारे ठरले. हेगेलचे विचार मार्क्सच्या पुढच्या कार्यासाठी एक खूप मोठा कॅनव्हास देऊन गेले. त्याला कायम असे वाटत राहिले की पुरातन विचारवंतांपासून सुरु झालेली मानवी जीवनाचा अर्थ लावण्याची प्रक्रिया आता निष्कर्षाप्रत येऊन ठेपली आहे आणि तो या प्रक्रियेचा एक शिलेदार आहे.

हे Young Hegelians श्रीमंत सरंजामी वर्ग control करत असलेल्या जगात राहात होते आणि मानवी प्रगतीमध्ये धर्म हाच सगळ्यांत मोठा अडसर आहे, या विचारापर्यंत येऊन ठेपलेले होते.समाजात असलेला divide हा धर्म आणि परंपरा कायम ठेवू पाहतात, अशा आशयाचे विचार मार्क्स विद्यापीठातील outlet मधील लेखनातून मांडत होता. हे अर्थातच authorities ना पटले नाही. त्यामुळे त्याला Rhineland News सारखा दुसरा platform शोधावा लागला जिथे संवैधानिक सुधारणा करण्यासाठी आग्रही असणाऱ्या लिबरल विचारांवर भर दिला जात असे.नव्याने श्रीमंत झालेले व्यावसायिक हे वर्तमानपत्र चालवत होते. मार्क्सच्या लेखनामुळे त्याचा खप वाढला. कायदा हा फक्त सामान्यजनांना लागू होतो, अभिजन मात्र कायद्याच्या चौकटीपासून दूर राहतील अशी पूर्वापार व्यवस्था करण्यात आली आहे, असा मार्क्सच्या लेखनाचा सूर होता. 1842 मध्ये त्याने गरीब द्राक्ष उत्पादकांना सामना करावा लागलेल्या तोट्यासाठी या व्यवस्थेला जबाबदार धरले. परिणामी, समाजाचे clinical deconstruction करु पाहणाऱ्या Rhineland News वर बंदी आणली गेली.

मार्क्स लेखन सोडू शकत नव्हता. त्याच्या विचारस्वातंत्र्याला पूरक असणाऱ्या फ्रान्समध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. फ्रेंच मूल्ये आणि प्रशियन व्यवस्था यांचा संबंध जोडणारे विचार मांडण्यासाठी एक publication सुरु केले. यात त्याच्या Young Hegelians विचारांशी फारकत घेऊन धर्म ही मूळ समस्या नसून समाजाला गुंगवून ठेवणारे अफू आहे आणि भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी दावणीला बांधलेले मानवी जीवन ही खरी समस्या आहे असा उलगडा मार्क्सला झाला. इथे त्याने ‘Species-essence’ संकल्पना मांडली. सर्व प्राणी निर्मितीक्षम आहेत पण मानवाची निर्मितीक्षमता वेगळी आहे. Profit या एकमेव उद्दिष्टाच्या मागे धावणाऱ्या फॅक्टरीमध्ये तेच ते repetitive काम करणे हे या निर्मितीक्षमतेवर अन्याय करणारे आहे. त्याच्या या publication ला फारसे यश मिळाले नाही.

पॅरिसमध्येच मार्क्सची फ्रेडरिक एंजेल्सशी भेट झाली. एंजेल्सही एका मध्यमवर्गीय प्रशियन कुटुंबात वाढलेला होता. दोघांचाही वैचारिक प्रवास हेगेलपासून सुरु होऊन भांडवलशाहीतील मानवाच्या स्थानापर्यंत येऊन ठेपला होता. त्यांनी दहा वर्षे एकत्र काम केले. फरक एवढाच होता की ज्या भांडवलशाहीबद्दल मार्क्स आणि एंजेल्स चर्चा करायचे त्याच भांडवलशाहीचा एंजेल्स एक घटक होता. त्याच्या वडिलांची मँचेस्टरला एक टेक्सटाईल मिल होती. एंजेल्सची त्यावेळची गर्लफ्रेंड मेरी बर्न्स ही आयर्लंड मधून स्थलांतरित झालेली एक फॅक्टरी कामगार होती आणि एका स्लममध्ये राहात होती. त्यामुळे एंजेल्सने भांडवलशाही व्यवस्थेची दोन्ही टोके पाहिली होती. याउलट मार्क्स armchair thinker होता आणि त्याचे काम कागदोपत्री होते. या दोघांच्या एकत्र येण्याने मार्क्सच्या विचारांना प्रॅक्टिकल अनुभवांची जोड मिळाली. शेवटी पॅरिसमध्ये असणाऱ्या प्रशियन हेरांनी फ्रेंच authorities ना मार्क्सविरोधात सावध केले आणि त्याला ब्रसेल्सला राजकीय आश्रय घ्यावा लागला. इथेही प्रशियन गुप्तहेरांचे लक्ष वेधले जाऊ नये यासाठी त्याने प्रशियन नागरिकत्वाचा त्याग केला. तो खऱ्या अर्थाने राज्यहीन आणि दरिद्री झाला होता. त्याच्या चरितार्थाची मारामार सुरु होती.

एंजेल्स आणि मार्क्स परत एकत्र आले. त्यांनी संपूर्ण युरोपातील समविचारी bourgeoisie वर्गाची एक गुप्त संघटना स्थापन करण्याचे ठरवले. ब्रसेल्समध्ये मार्क्स आणि एंजेल्सना एक नवीन दिशा मिळाली. ऐतिहासिक काळापासून सामाजिक व्यवस्था अर्थव्यवस्थेला कशा प्रकारे आकार देत आली आहे याचा अभ्यास ते करू लागले. परस्परसंबंधावर आधारलेल्या आर्थिक व्यवस्थेत पूर्वीपासून चालत आलेली गुलामगिरी, मध्ययुगीन सरंजामशाही, जमीनदार वर्ग आणि त्यांच्याकडील कामगार यांचेच नवे प्रारूप म्हणजे आत्ताची उद्योगव्यवस्था असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. अगदी सुरुवातीपासूनच समाजात Haves आणि Have-nots होते. ते आजही आहेत. फक्त त्यांच्या भूमिका बदलत गेल्या. हा मानवी इतिहासाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन होता. त्या त्या काळातील कायदा, धर्म, राज्यव्यवस्था, संस्कृती आणि कला या Haves ना पूरक असणाऱ्या होत्या. सामाजिक संबंधांतील Status Quo कसा कायम राहील याची सोय करणाऱ्या होत्या. या व्यवस्थेविरोधात आवाज उठवणे ही तत्कालीन औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची जबाबदारी आहे, असा मार्क्सचा विचार होता. 1847 मध्ये युरोपातील गहू आणि बटाटा उत्पादक शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, दुष्काळामुळे झालेली उपासमार, अन्नासाठी झालेले riots आणि राजकीय असंतोष यांमुळे एकंदरीत वातावरण मार्क्स आणि एंजेल्सच्या विचारांसाठी पोषक होते. 1848 मध्ये त्यांनी संयुक्तपणे लिहिलेला केवळ 30 पानांचा Communist Manifesto प्रकाशित झाला. यामध्ये भांडवलशाहीची खरडपट्टी काढली असावी असा समज होता पण प्रत्यक्षात साम्यवादी रचनेसाठी भांडवलशाही आणि तंत्रज्ञानातील प्रगती आवश्यक असल्याचे कबूल केले होते. प्रत्येकाला आवश्यक वस्तू मिळण्यासाठी उत्पादन आवश्यक आहे आणि ते भांडवलशाही पुरवू शकते हा निष्कर्ष काढण्यात आला होता. Communist Manifesto तितका प्रसिद्ध झाला नाही पण फ्रान्समध्ये लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी monarchy ला पायउतार व्हायला भाग पाडले. संघर्षाची ठिणगी पडली होती. मार्क्सला बेल्जीयम सोडून जाण्यास सांगण्यात आले. त्याचे क्रांतिकारी विचार प्रत्यक्षात उतरत आहेत असे वाटत असतानाच फ्रान्समध्ये कामगारांचे आंदोलन नव्याने तयार झालेल्या प्रजासत्ताक व्यवस्थेच्या हाताबाहेर गेले आणि दहा हजार लोक मारले गेले. युरोपातील जुन्या सरंजामी वर्गाने परत सत्ता हातात घेतली.

मार्क्स प्रशियामध्ये परत आला, क्रांती परत सुरु करण्याची संधी शोधत असतानाच त्याला अटक झाली आणि तो अल्पावधीत सुटलाही. क्रांतिकारी विचारांच्या निर्वासितांना आश्रय देणाऱ्या लंडनमध्ये 1849 मध्ये त्याने स्थलांतर केले. त्यावेळी तो केवळ 32 वर्षांचा होता. 1848 ची निदर्शने समाज बदलासाठी तयार नसल्याने अयशस्वी ठरल्याची त्याने स्वतःच्या मनाची समजूत घातली. तिथून पुढचा वेळ त्याने ब्रिटिश म्युझियममध्ये अभ्यास करण्यात आणि दास कॅपिटल लिहिण्यात व्यतीत केला. 1860 मधील ब्रिटन हे जगातील सर्वांत मोठे औद्योगिक पॉवरहाऊस झाले होते. एका शतकात UK ची लोकसंख्या दुप्पट झाली होती आणि त्याचे सामाजिक परिणाम भयंकर होते. त्याचवेळी मार्क्स तेथील पब्लिक रेकॉर्ड्सचा अभ्यास करून झपाट्याने वाढत असणाऱ्या भांडवलशाहीचे विघातक परिणाम नोंदवत होता. 1863 मध्ये Children’s Commission Report आला. त्यात दिवसाला 15 तास काम करणाऱ्या अवघ्या 9 वर्षांच्या मुलांचा उल्लेख होता. ही नफेखोर व्यवस्था त्यांचे शिक्षण आणि इतर कौशल्ये गिळंकृत करत होती. Mainstream अर्थशास्त्र-त्यावेळचे आणि आजचेही- ‘शोषण’ ही संकल्पनाच मुळी स्वीकारत नाही. कारखान्यात होणारे मृत्यू हे ‘अपघात’ असतात. ही व्यवस्था कुठे घेऊन जाणार आहे, भांडवलशाहीचे भविष्य काय असेल,या नफाआधारित व्यवस्थेला मर्यादा आहेत का यावर मार्क्सने काही predictions मांडण्याचा प्रयत्न केला. तेजी आणि मंदीवर चालणारी भांडवलशाही ही unstable असून त्यानुसार माणसे puppets प्रमाणे आयुष्य जगणार का हा प्रश्न उरतोच.

1867 मध्ये, 16 वर्षांनी, दास कॅपिटल चा पहिला भाग प्रकाशित झाला. हा ग्रंथ मोठा आणि क्लिष्ट होता. तो अधिक लोकांपर्यंत पोहोचला नाही. तोवर निर्माण झालेल्या जागतिक मार्केटमुळे युरोपमध्ये आर्थिक सुबत्ता आली. सरकारांनी कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी कायदे पास करायला सुरुवात केली. त्यामुळे भांडवलशाहीने निर्माण झालेले crisis सौम्य वाटू लागले. ज्यावेळी मार्क्सने आपली थिअरी पूर्णावस्थेत आणली होती त्यावेळी जग त्याने उपस्थित केलेल्या सामाजिक प्रश्नांपासून फार पुढे निघून आले होते. हे लक्षात आलेला मार्क्स नंतरच्या आयुष्यात स्थिरावला. त्याने कुटुंबावर लक्ष केंद्रीत केले. 1883 मध्ये त्याचा मृत्यू झाला त्यावेळी एंजेल्सने त्याच्या graveside वर ‘His name and work will endure through the ages’ असे शब्द कोरले. एंजेल्स बरोबर होता. एंजेल्सने मार्क्सचे विचार अधिक स्पष्टतेने जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. 1917 मध्ये रशियात बोल्शेव्हिक क्रांती झाली, साम्यवादी सत्ताही स्थापन झाली पण तेथील हुकूमशाहीच्या अनियंत्रित व्यवस्थेमुळे मार्क्सचा साम्यवाद काळवंडून गेला आणि ती सत्ता सत्तर वर्षांनी कोलमडली.

मार्क्स हा प्रश्न उपस्थित करणारा आणि त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणारा विचारवंत होता. केवळ एकच गृहीतक मांडून त्याच्या बाजूने वादविवाद करणारा नव्हता. त्याला मसीहा होण्यातही इंटरेस्ट नव्हता. त्याची भाषा किचकट होती पण त्याने जमेल तितक्या बाजू explore करण्याचा अभ्यासू प्रयत्न केला आणि जे सापडले ते वेळोवेळी लिहीत राहिला. भांडवलशाही व्यवस्थेत आपल्याला निरोगी,कार्यकुशल, शोषण न करणारे परस्पर सामाजिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी काय करावे लागेल, हे आव्हान तो पुढच्या पिढ्यांसमोर ठेवून गेला. विषमतेमुळे निर्माण होणाऱ्या दुःखावर उपाय शोधण्याचा पहिला प्रयत्न त्याने केला. म्हणून मार्क्स कालातीत ठरतो.

अभिपर्णा भोसले

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.