Take a fresh look at your lifestyle.

त्या फक्त भारतातल्याच नाहीतर ब्रिटनमधल्या देखील पहिल्या महिला वकिल होत्या

0

आपल्या देशात आणि जगात अनेक स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी स्वत:च्या आयुष्यात असं काहीतरी केलं की त्या इतिहासात अमर झाल्या. त्यांनी स्वत:च्या आयुष्यात स्वत:ची स्वप्न पुर्ण करताना इतरांना स्वप्नं दिली. इतरांना त्या स्वप्नांपर्यंत पोहचण्यासाठी, इतरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी स्वत: रस्ते तयार केले.

कॉर्नेलिया सोराबजी (Cornelia Sorabji) ही त्यातलीच एक स्त्री जिने अशी वाट तयार केली ज्यावर ती आधी एकटीच होती, पण आज त्याच वाटेने असंख्य स्त्रियां चालत जात आहेत. तर कोण होत्या या कार्नेलिया सोराबजी? असं काय केलं त्यांनी ?

कॉर्नेलिया सोराबजी या भारताच्या पहिल्या महिला वकील होत्या. जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड महाविद्यालयात “कायद्याचे” शिक्षण घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. खरंतर कुठल्याही ब्रिटिश महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या त्या “भारताच्या पहिल्या नागरीक” होत्या. बॉम्बे विश्वविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.

त्या काळी बॉम्बे विश्वविद्यालयात कार्नेलियांच्या बाकीच्या पाच बहिणींचे अर्ज नाकारले गेले होते, कारण त्यावेळी तिथे महिलांना प्रवेश नव्हता. पण कार्नेलिया सोराबजी यांनी तिथे प्रवेश मिळवला. इंग्लंड आणि भारतात वकीलीची प्रॅक्टीस करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.

कार्नेलिया सोराबजी त्या काळात वकील झाल्या, ज्या काळात स्त्रियांना वकीली करण्याचा अधिकार नव्हता.

15 नोव्हेंबर 1866 ला महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात कॉर्नेलिया सोराबजी यांचा जन्म झाला. अकाली मृत्यू झालेल्या दोन भावांसहित नऊ भावंडांमधे कॉर्नेलिया सर्वात लहान होत्या. त्यांची आई फ्रांसिना सेंटिया फोर्ड या हिंदू अनाथ होत्या. भारतीय सैन्यातल्या एका ब्रिटिश दांपत्याने त्यानां दत्तक घेतलं. पुढे त्यांनी खार्सेदजी सोराबजी या पारशी व्यक्ती सोबत लग्न केलं.

कॉर्नेलिया सोराबजींच्या कुटूंबाचं राहणीमान हे पारशी परंपरेनुसार होतं. पण ते ईसाई धर्माचे पालन करायचे आणि गुजराती भाषेत बोलायचे. कॉर्नेलियांच्या आईवडीलांना पुण्यात हिंदू , मुस्लिम आणि पारशी मुलांसाठी अनेत शाळांची स्थापना केली. कॉर्नेलिया सोराबजी यांचे बालपण सुरूवातीला बेळगाव आणि नंतर पुण्यात गेले. मिशनरी शाळेत शिक्षण पुर्ण केल्यानंतर, कॉर्नेलिया या पहिल्या महिला विद्यार्थी होत्या, ज्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधे प्रवेश घेतला. डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी साहित्याचा अभ्यास केला आणि प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.

त्याकाळी पहिली रँक मिळालेल्या विद्यार्थांना ऑक्सफोर्ड विद्यापिठाची शिष्यवृत्ती दिली जायची. पण त्या महिला असल्यामुळे प्रथम रँक मिळूनही त्यांना शिष्यवृत्ती नाकारली गेली.

मग त्यांनी गुजरातमधे मुलांच्या विद्यालयात इंग्रजीची प्रोफेसर म्हणून काम सुरू केलं. आणि नंतर जेव्हा त्या बॉम्बे विश्वविद्यालयातून ग्रॅज्युएट झाल्या त्यानंतर त्यांनी ऑक्सफोर्डला जाण्याचा निर्णय घेतला. त्याकाळच्या पुण्या-मुंबई मधल्या काही मुख्य इंग्रजी स्त्रियांनी मिळून पैसे जमा केले आणि अशा प्रकारे कॉर्नेलिया सोराबजी यांनी 1889 मधे ऑक्सफोर्ड युनिर्व्हसिटीच्या सोमरविले कॉलेजमधे वकिलीचा अभ्यास सुरू केला.

1892 मधे बॅचलर ऑफ सिविल लॉ (बीसीएल) ही परिक्षा उत्तीर्ण करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. पण त्या वेळी त्यांना डिग्री दिली गेली नाही. कारण त्यावेळी कायद्याने स्त्रियांना वकीली करण्याचा अधिकार नव्हता.

भारतात परत आल्यानंतर त्यांनी समाजकार्यात स्वत:ला गुंतवून घेतलं. गुजरातमधल्या काठियावाड संस्थानात त्या पर्दानशी स्त्रियांसाठी, त्या स्त्रियां ज्यांना त्याकाळी बाहेरच्या जगातील पुरूषांसोबत बोलण्यास मनाई होती. त्यामुळे त्या स्त्रियांना कायद्याच्या लढाया लढताना अडचण यायची. म्हणून अशा स्त्रियांसाठी कॉर्नेलिया काम करू लागल्या.

त्यांनी जवळपास 600 स्त्रियां आणि अनाथ मुलांच्या केसेस तयार केल्या. अनेकदा फी न घेता काम केलं. 1897 ला त्यांनी बॉम्बे विश्वविद्यालयातून LLB पुर्ण केलं. पण तरी त्यांना 1923 पर्यंत बॅरिस्टर म्हणून मान्यता मिळाली नव्हती. कधी कधी त्या अलाहबादला त्यांच्या लहान भावाला कायद्याच्या कामात मदत करायच्या.

1920 मधे लंडन बार ने महिलांना कायद्याच्या अभ्यासक्रमाच्या पदवीची आणि वकिली करण्याची परवानगी दिली.

त्यामुळे त्यांनी ऑक्सफोर्ड मधे जाऊन त्यांची डिग्री घेतली. परत आल्यानंतर त्या कोलकत्त्याला उच्च न्यायालयात एक बॅरिस्टर म्हणून काम करू लागल्या. त्यावेळी ब्रिटन आणि भारतातल्या त्या एकमेव महिला वकिल होत्या.

त्यानंतर त्या भारतातल्या राष्ट्रीय महिला परिषद या बंगाल शाखेच्या त्या सदस्या झाल्या. त्यांनी आसाम, बिहार, बंगाल मधे अनेक समाज कल्याणकारी कामात स्वत:ला जोखून दिलं. त्यासाठी त्यांना सरकार कडून केसर-ए-हिंद या सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आलं.

महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता पंडिता रमाबाईंसोबत त्यांनी सतीप्रथा, बाल विवाह या त्याकाळच्या गंभीर विषयांवर काम केलं. 1929 मधे त्यांनी वकिली सोडून दिली आणि पुर्ण वेळ समाजकार्य सुरू केलं.

अमेरिकन लेखिका कॅथरीन मायो यांनी त्यांच्या मदर इंडिया (1927) या पुस्तकात भारतातल्या ब्रिटिश शासनाला योग्य म्हटलं होतं. त्याचं कॉर्नेलिया यांनी समर्थन केलेलं. ज्यामुळे गांधीजी आणि त्याकाळचे सगळे राष्ट्रीय नेते त्यांच्यावर वर कायमचे नाराज झाले. त्यानंतर 1931 मधे त्या इंग्लंडला गेल्या आणि कायमच्या इंग्लंड मधेच स्थायिक झाल्या. कधी कधी हिवाळ्यांच्या सुट्टीला त्या भारतात यायच्या.

6 जुलै 1954 ला 88 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्या अविवाहित होत्या. त्या लेखिका सुद्धा होत्या. वकिली आणि समाजकार्यासोबत त्यांनी भरपूर लेखन सुद्धा केलं. त्यांची दोन आत्मचरित्र प्रसिद्ध आहेत. India Calling: The Memories of Cornelia Sorabji (1934) आणि India Recalled (1936). लंडनमधल्या राष्ट्रीय पोट्रेट गॅलरी मधे त्यांचं अतिशय सुंदर पोट्रेट आहे.

कॉर्नेलिया सोराबजी यांच्यामुळे आपल्या देशातल्या तसेच इंग्लंडच्या स्त्रीयां आज वकिली हे क्षेत्र निवडू शकतात. त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाने इतर स्त्रीयांना नविन मार्ग मिळाला.

  • प्रियांका जगताप

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.