त्या घटनेनंतर नाना पटोले मोदींचे चॅलेंजर म्हणून समोर आले
काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. तसंच ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे प्रदेशाध्यपदावर ओबीसी चेहरा देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
प्रदेशाध्यक्षपदासाठी राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांचीही नावे चर्चेत होती.
मात्र काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी यांच्या पुनरागमनाची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राजीव सातव यांना दिल्लीतून सोडण्यास हायकमांडने नकार दिला आहे. विजय वडेट्टीवार यांच्याबाबतही काँग्रेसमधला एक वरिष्ठ नेत्याचा गट सक्रिय होता. मात्र या दोघांऐवजी नाना पटोले यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे .
कोण आहेत नाना पटोले ?
नाना पटोलेंचा जन्म भंडाऱ्यातील शेतकरी कुटुंबात झाला शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी मोठं काम, मतदारसंघात नानाभाऊ म्हणून ते परिचित आहेत. 1990 साली भंडाऱ्यातील सांगडीतून जिल्हा परिषदेवर निवडून गेले त्यानंतर 1999 पासून सलग तीन वेळा साकोली मतदारसंघातून विधानसभेवर ते निवडून गेले आहेत.
काँग्रेसचे उपनेते म्हणूनही त्यांनी काम बघितले आहे, 2014 आधी पक्षाच्या धोरणावर नाराज होऊन बाहेर भंडारा-गोंदिया मतदारसंघातून 2014 ची लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवली आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेलांचा 1 लाख 49 हजार मतांनी पराभव केला.
आक्रमक नेते नाना पटोले
नाना पटोलेंना त्यांच्या आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखलं जातं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्ष प्रचारात कुठेही दिसत नाही. अशी चर्चा सुरू असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी नाना पटोलेंनी महापर्दाफाश यात्रा काढली होती.या यात्रेदरम्यान त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका केली होती.
आधी काँग्रेस मग भाजप आणि नंतर पुन्हा काँग्रेस
नाना पटोले आधी काँग्रेसमध्येच होते, नंतर ते भाजपमध्ये गेले. मात्र भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही, असं म्हणत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.देशभरातून मोदी सरकारविरोधात स्पष्ट नाराजी व्यक्त करत राजीनामा देणारे ते पहिले भाजप खासदार ठरले.
मोदींचा एक चॅलेंजर म्हणून समोर आले
2019ची लोकसभा निवडणूक वगळता कुठल्याही पक्षात असो वा स्वतंत्र लढलेले असो, पटोले कधीच हरले नाही. निवडणूक जिंकायची कशी, हे त्यांना चांगलंच माहिती आहे. मोदींविरोधात देशभरातल्या 282 खासदारांपैकी कुणीच आवाज उठवला नाही, पण पटोलेंनी ते केलं आणि मोदींचा एक चॅलेंजर म्हणून ते वर आले.
नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. तसंच स्वपक्षाच्या धोरणांवर त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. अखेर 8 डिसेंबर 2017 रोजी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. भाजपची खासदारकी धुडकावल्यानंतर नाना पटोले हे काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसले होते.
राहुल गांधींनी कौतुक केलं होत
सहसा अशी खासदारकी सोडून पक्षात येणाऱ्यांना लगेच राज्यसभा किंवा विधानपरिषदेची ऑफर दिली जाते. त्यानुसार राहुल गांधींनी नानांना तुम्हाला कुठलं पद हवंय असं विचारलं होत . मात्र त्यावर मी काही मागण्यासाठी नव्हे तर देण्यासाठी आलोय. तुमच्या सोबत प्रचार करेन, शेतकऱ्यांची ताकद मजबुतीनं उभी करण्यासाठी प्रयत्न करेन, असं उत्तर दिलं. त्यावर राहुल गांधींनी “ओह नाईस फेलो” असं म्हणत नानांचं कौतुक केलं होत. आता लवकरच काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदासाठी नाना पटोले यांच्या नावार शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे .
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम