मराठी ‘ठाणेदार’ झाले अमेरिकेत ‘आमदार’
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडेन की डोनाल्ड ट्रम्प यांच्यापैकी नक्की कोण बाजी मारणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं, तरी स्टेट्समधून निकाल यायला सुरुवात झाली आहे. मराठी माणसांना आनंद वाटेल अशी एक बातमी आली आहे मिशिगन स्टेटमधून.
अमेरिकेच्या या राज्यातून जिंकलेल्या एका उमेदवाराचं नाव आहे श्री ठाणेदार.
अमेरिकेतले प्रसिद्ध उद्योजक, संशोधक आणि करोडपती म्हणून ओळख असलेले ठाणेदार यांनी मिशिगनच्या तिसऱ्या डिस्ट्रिक्टमधून निवडणूक जिंकली आहे.
श्री ठाणेदार मूळचे बेळगावचे आहेत. ते उत्तम मराठी बोलतात. अमेरिकेत अनेक वर्षं वास्तव्य असणारे ठाणेदार मूळात शास्त्रज्ञ. त्यातून त्यांनी मोठा उद्योग उभा केला. अमेरिकेतले प्रसिद्ध करोडपती उद्योगपती म्हणून ते प्रसिद्ध आहेत. दोन वर्षांपूर्वी मिशिनगच्या गव्हर्नर पदासाठी त्यांचं नाव चर्चेत होतं.
आता डेमोक्रॅटिक पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती. त्यांनी प्रतिस्पर्धी रिपब्लिकनचा पराभव करत मिशिगनच्या तिसऱ्या डिस्टिक्टमधून विजय मिळवला आहे.
भारतीय वंशाचे श्री ठाणेदार हे मिशिगन राज्यातून आमदार झाले आहेत. त्यांनी एकूण मतांपैकी 93 टक्के मते मिळवली. त्यांच्याविरोधात सहा उमेदवार होते. त्यांना पराभूत करून ठाणेदारांनी दणदणीत विजय
ठाणेदार यांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव येथे गरीब कुटुंबात झाला होता. लहानपणी कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या होत्या. त्यांनी मुंबई विद्यापीठातून वयाच्या १८ व्या वर्षी रसायनशास्त्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. यानंतर ते १९७९ मध्ये अमेरिकेला स्थलांतरीत झाले.
१९८८ पासून ते अमेरिकेचे नागरिक आहेत . मुंबई विद्यापीठातून बॅचलर्स पदवी मिळवल्यानंतर ते उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत स्थायिक झाले. तिथेच स्थायिक होत त्यांनी संशोधन, नोकरी पुन्हा संशोधन करत स्वतःचा उद्योग सुरू केला.
“गरिबांचं दुःख मी जाणतो”, असं म्हणत त्यांनी बिघडलेल्या परिस्थितीला सावरण्यासाठी मतं द्या, असा प्रचार केला होता. ट्रम्प प्रशासनात अनेकांचे रोजगार गेले. त्याविरोधात ठाणेदार यांनी प्रचार मोहीम राबवली होती.
24 व्या वर्षी मी अमेरिकेत गेलेल्या ठाणेदार यांनी आपला झेंडा अमेरिकन राजकारणात रोवला आहे. त्यांनी 25 हजार मतांनी विजय मिळवला आहे.
याआधीही लढवली निवडणुक
ठाणेदार यांनी २०१८ मध्ये प्रायमरीची निवडणूक लढविली होती. मात्र, यात त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी त्यांनी दूरचित्रवाणीवर ‘श्री फॉर वुई’ ही जाहीरात प्रचंड प्रमाणात केल्याने त्यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र, त्यावेळी एक कोटी डॉलर खर्च करूनही त्यांना विजय मिळाला नव्हता. यानंतर ते डेट्रॉइट येथे स्थायिक झाले आणि येथे त्यांनी विजय मिळविला.
श्री ठाणेदार यांचं “ही ‘श्री’ ची इच्छा” आत्मचरित्र असून यामध्ये त्यांनी आपला संपूर्ण प्रवास उलगडलेला आहे. आजपर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचे मोठे देणगीदार असलेले श्री ठाणेदार आता पक्षाचे लोकनियुक्त प्रतिनिधी झाले आहेत.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम