इतरांना संधी मिळावी म्हणून पक्षाने दिलेले आमदारकीच तिकिट नाकारलं
वैजापुरचे माजी आमदार रंगनाथ मुरलीधर उर्फ आर.एम. वाणी यांचे मंगळवारी रात्री औरंगाबाद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. अभ्यासू पत्रकार, संपादक, नगराध्यक्ष ते तीन वेळा आमदार राहिलेले आर. एम. वाणी यांनी विधानसभेत सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मांडले होते.
विधानसभा गाजविणारे, नाशिक-औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील भागासाठी उभारलेल्या नांदूर मधमेश्वर कालव्याचे जनक, एक अभ्यासू, हजरजबाबी, निर्भीड, प्रशासकीय वचक असलेले नेते म्हणून त्यांची ओळख होती.
ग्रामीण भागाच्या विकासात मोठे योगदान दिले
औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणात आर.एम. वाणी या नावाने सुप्रसिद्ध असेलेल्या वाणी यांनी १९८४ ते १९९४ या कालावधीत वैजापूरचे नगराध्यक्षपद भुषवले. पन्नास वर्षाच्या राजकिय कार्किर्दीत वाणी यांनी शहरासह ग्रामीण भागाच्या विकासात मोठे योगदान दिले. त्यांनी १९९९ ते २०१४ या कालावधीत सलग तीन पंचवार्षिकमध्ये विधानसभेत वैजापूर मतदारसंघाचे शिवसेनेतर्फे प्रतिनिधीत्व केले
सलग ३९ दिवस आंदोलन केले
नांदुर मधमेश्वर जलदगती कालव्यातुन पाणी आणण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सलग ३९ दिवस आंदोलन केले. त्याची दखल घेत राज्यपालांनी आंदोलकांची भेट घेतली. प्रशासनावर त्यांचा चांगला वचक होता. नगरसेवक, नगराध्यक्ष ते आमदार असा त्यांचा राजकिय प्रवास राहिला.
नेते त्यांची दोन दिवस समज काढत होते
औरंगाबाद जिल्ह्यात आपली वेगळी छाप पाडणाऱ्या आमदारांपैकी वाणी हे एक आमदार होते. शिवसेनेचा गड असलेल्या वैजापूर तालुक्यात गेल्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाणी यांनी स्वतःहुन आमदारकीचा तिकिट नाकारलं होतं.
कार्यकर्ते आणि अनेक नेते त्यांची दोन दिवस समज काढत होते, पण आता इतरांना संधी मिळावी असं म्हणत त्यांनी उमेदवारी नको म्हणून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना कळवलं होते. वैजापुरचे नगराध्यक्ष ते तीन वेळा आमदार असा त्यांचा राजकीय जीवन प्रवास होता.
माजी आमदार वाणी यांच्या निधनामुळे जनकल्याण प्रश्नांची जाण असणारा नेता गमावला असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रात उमटत आहेत. तसेच अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम