शिवाजी पार्कवरच्या जाहीर सभेत बाळासाहेबांनी शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आणि…
शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे असं समीकरण आजवर आपन्न सगळ्यांनी पाहिलं. त्यांच्या शिवसेनाप्रमुख या पदावर ते अखेरपर्यंत राहिले. पण याच शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा त्यांनी दिला होता. त्याचाच हा किस्सा
शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर पुढच्या काही वर्षात शिवसेना मुंबई महापालिका आणि राज्यभरात विस्तार करू लागली. पण याच काळात १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना करिष्मा दाखवू शकली नाही.
मुंबई महापालिका निवडणुकीत देखील शिवसेना नेते-उमेदवारांचा दारुण पराभव झाला. बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर काही प्रश्न निर्माण होवू लागले.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीतलं आलेलं अपयश आणि मुंबई महापालिकेचा तो पराभव बाळासाहेबांच्या जिव्हारी लागला.
त्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी बाळासाहेबांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. शिवाजी पार्कवरील झालेल्या सभेत मी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.
काय होता तो प्रसंग
बाळासाहेबांचे वडील संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे बिनीचे शिलेदार प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचं 20 नोव्हेंबर 1973 रोजी निधन झाले. आईनंतर दुसरं सत्र बाळासाहेबांच्या डोक्यावरुन हरपलं. शिवसेना उभी करण्यात प्रबोधनकारांचा मोलाचा वाटा होता .
बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे संबंध अगदी मित्रत्वाचे होते. अनेक गोष्टी ते एकमेकांशी शेअर करायचे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या जाण्याने बाळासाहेबांच्या आयुष्यात फार मोठी पोकळी निर्माण झाली. परंतु बाळासाहेब यांच्या पत्नी मीनाताईंच्या सामर्थ्यानं आणि शिवसैनिकांच्या बळावर बाळासाहेब पुन्हा उभा राहिले…!
तो निर्णय का घेतला असावा?
१९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीला बाळासाहेबांनी शिवसेनेच्या वतीने पाठिंबा दिला. खरंतर त्या काळात बाळासाहेबांचा हा निर्णय अनेक सेना नेत्यांना रुचला नव्हता, पचलाही नव्हता. बाळासाहेबांनी असा निर्णय का घेतला असावा असा प्रश्न अनेक शिवसैनिकांना पडला होता.
पण बाळासाहेबांचा आदेश तो आदेश असतो. बाळासाहेबांपुढे कोण काय बोलणार…?
बाळासाहेबांनी मार्मिकच्या अनेक अंकातून मराठी माणसांवरील अन्यायाला तत्कालीन काँग्रेस राजवटीला जबाबदार धरले होते.
मग अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी यांना पाठिंबा का? असा प्रश्न अनेक दिग्गजांना पडला. पण बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना नव्हे तर इंदिरा गांधींच्या योग्य वेळी आणीबाणीचा जाहीर केलेल्या निर्णयाला पाठिंबा दिला होता.
मतभेद असावेत पण मनभेद नसावेत असं म्हटलं जातं. बाळासाहेबांचा विरोध आयुष्यभर सर्वांशी मतभेदाच्या स्वरुपात झाला आणि मनभेद होण्यापूर्वीच बाळासाहेब ते नातं सावरत असत. अनेकांना बाळासाहेब शेवटपर्यंत समजले नाहीत.
अखेर राजीनामा मागे घेतला
सभेत मी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचं ते म्हणाले. एकंदरित विधानसभा निवडणुकीतलं आलेलं अपयश आणि मुंबई महापालिकेचा तो पराभव बाळासाहेबांच्या सर्वार्थाने जिव्हारी लागला होता. त्यावेळी शिवाजी पार्कवर एकच हल्लकल्लोळ माजला.
उपस्थित शिवसैनिकांनी ‘नाही नाही…’ असा आवाज केला… त्यावेळेस जरी काही गोष्टींना आधारुन बाळासाहेबांचे विचार शिवसैनिकांना समजले नव्हते, पटले नव्हते. परंतु बाळासाहेबांवर त्यांची प्रचंड निष्ठा होती. त्यामुळे तिथं एकच गदारोळ झाला आणि शिवसैनिकांच्या आग्रहास्तव बाळासाहेबांनी अखेर राजीनामा मागे घेतला.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम