Take a fresh look at your lifestyle.

सरकारी अधिकारी असूनही विश्वास नांगरे-पाटील यांना प्रसिद्धीचे वलय कसे मिळाले ?

0

तरुणांमध्ये विश्वास नांगरे-पाटील नावाचे एक आकर्षण निर्माण झाले आहे. ‘मला सत्यासाठी संघर्ष करायचाय, त्यासाठी माझी नरकात जायचीही तयारी आहे, पण हे करताना ‘कारण’ स्वर्गीय असले पाहिजे,’ असे म्हणणारे विश्वास नांगरे-पाटील एक आगळी-वेगळी ‘स्फूर्ती’च म्हणावी लागेल.

आज प्रत्येक तरुणाला आज ‘विश्वास नांगरे-पाटील’ व्हावंसं वाटतं!

तरुणाईच्या गळ्यातला ताईत

‘पहेलवानाचा तू मुलगा, गुंडच होणार.’ हे शब्द अवघ्या सहाव्या इयत्तेत असणा-या ‘विश्वास’ नावाच्या मुलाला खुपले. ‘मला शाळेतल्या बाईंनी असं ऐकवलं. आता आपण काहीतरी करून दाखवायचं, स्वत:ची ओळख निर्माण करायची’ या जिद्दीने, आयुष्याची प्रत्येक पायरी धाडस आणि कष्टाने पार करणारा लहानपणीचा खोडकर मुलगा आज अवघ्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला आहे.

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या विश्वास नांगरे-पाटील यांनी १९९७ ला कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयातून ‘बी.ए’ पूर्ण केले. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी एकाचवेळी उपजिल्हाधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि आयपीएस अशी तीन पदे मिळवणारे विश्वास नांगरे-पाटील हे एकमेव अधिकारी ठरले.

नंतर मुंबईत येऊन आयपीएस केले. लातूर आणि नांदेडला पोलिस अधीक्षक म्हणून काम करीत असतानाच विश्वास नांगरे-पाटील यांनी एम.ए. पूर्ण केले.

लाडके अधिकारी म्हणून ओळख

सामाजिक जाणिवेतून जगणारे आणि तशा पद्धतीने प्रत्येक नागरिकांनी जगावं, यासाठी आग्रही असणारे विश्वास नांगरे-पाटील पर्यावरणप्रेमीही तेवढेच आहेत. विविध वृक्षारोपण उपक्रमांतून त्यांनी आपल्या पर्यावरणावरील प्रेमाची भूक भागवण्याचा प्रयत्न कायम करत असतात. सर्वसामान्य तरुणांबरोबरच पोलिस दलातील कर्मचा-यांमध्येही विश्वास नांगरे-पाटील ‘लाडके’ पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात.

‘२६/११’ बजावली चोख कामगिरी

विश्वास नांगरे-पाटील हे नाव घेतले की, नजरेसमोर उभे राहते ते ‘२६/११’च्या ताज हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्याचे चित्र. ‘ताज’मध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता आणि जीवाची पर्वा न करता नांगरे-पाटील आपल्या सहका-यांसह सर्वप्रथम ‘ताज’कडे सरसावले.

‘लिओपोल्ड’वर हल्ला करून दोन दहशतवादी ज्या मार्गाने ‘ताज’मध्ये घुसले होते, त्यांच्यापाठोपाठ घुसण्याची हिंमत नांगरे-पाटील यांच्या पथकाने दाखवली.

दहशवाद्यांच्या अत्याधुनिक शस्त्रांनाही न जुमानता नांगरे-पाटील पुढे सरसावत राहिले. ‘ताज’च्या तांत्रिक विभागात धाडसाने पोहोचून त्यांनी तेथील सीसीटीव्हीवरील फुटेजवरून आपल्या वरिष्ठ अधिका-यांना दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती पुरवली.

पोलिस आणि इतर जवानांच्या मोठया पराक्रमाने दहशतवाद्यांचे मनसुबे उधळण्यात आले.या थरारक ‘लढाई’त विश्वास नांगरे-पाटील हे नाव चांगलेच गाजले. ‘२६/११च्या हल्ल्याप्रसंगी मला माझ्या पत्नी आणि मुलांपेक्षाही दहशतवाद्यांचा मुकाबला करणे महत्त्वाचे वाटले.

मी कारण निवडले आणि पुढे सरसावलो,’ असे विश्वास नांगरे-पाटील सांगतात. पोलिस अधिकारी म्हणून चोख कामगिरी बजावणा-या खाकी वर्दीतील या आदर्शवत पोलिस अधिका-यात एक ‘माणूस’ही दडला आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.