Take a fresh look at your lifestyle.

शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह कसं मिळालं होत ?

शिवसेनेचं 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. 'शिवसेना' पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही.

0

मागच्या काही महिन्यापासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातला सर्वाधिक चर्चेचा मुद्दा आहे तो म्हणजे शिवसेना कोणाची? आज याच चर्चेत एक मोठा निर्णय निवडणूक आयोगाकडून आला आहे.

शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. ‘शिवसेना’ पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही.

नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

अंधेरी पोटनिवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. चिन्हासंदर्भातील अंतिम निर्णय निवडणूक आयोगाने राखून ठेवला आहे. उद्धव ठाकरे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला अंधेरी-पूर्व निवडणुकीत हे चिन्ह वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.

शिवसेना कुणाची या वादाबाबत सुनावणी निवडणूक आयोगात सुरू असल्याने आगामी निवडणुकीत कोणताच पक्ष किंवा गट या चिन्हाचा वापर करू शकणार नाही.

सध्यातरी, निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय आगामी अंधेरी-पूर्व पोटनिवडणुकीपुरताच लागू असणार आहे.

त्यामुळे खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणत्या गटाला मिळणार कि कायमस्वरूपी गोठवले जाणार, याबाबत उत्सुकता आहे. पण शिवसेना आणि धनुष्यबाण हे नातं कसं जुळलं, याबाबतची माहिती तुम्हाला आहे का ? तीच या लेखाच्या माध्यमातून जाणून घ्या

शिवसेनेची स्थापना जून १९६६ मध्ये झाली. पण सुरुवातीच्या काळात शिवसेना एकप्रकारे सामाजिक संघटना होती. स्थापनेनंतर तब्बल २२ वर्षानंतर १९८८ मध्ये राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यासाठी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव दिला. सोबतच स्वतःची घटनाही तयार केली.

कागदपत्रांच्या पडताळणीनंतर शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. मात्र मतदानाची आवश्यक टक्केवारी नसल्यामुळे त्यांना चिन्ह मिळू शकलं नव्हतं.

दरम्यान, १९८९ मध्ये शिवसेनेने लोकसभा निवडणूक लढवली. यासाठी शिवसेना-भाजपची युती झाली होती. त्यावेळी परभणीतून शिवसेनेचे उमेदवार म्हणून अशोकराव देशमुख रिंगणात उतरले होते. त्यांना निवडणूक लढण्यासाठी उमेदवार म्हणून धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळालं होतं.

देशमुखांसह शिवसेनेचे चार खासदार निवडून आले होते. आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केल्याने शिवसेनेला मागणीप्रमाणे धनुष्यबाण मिळाले.

एका अर्थाने परभणीमुळे शिवसेनेला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने धनुष्यबाण चिन्हासह मैदानात उतरुन ४२ आमदार निवडून आणले.

धनुष्यबाण हे प्रभू श्रीरामचंद्रांचं शस्त्र असल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी निवडणूक चिन्ह उत्साहाने स्वीकारलं. हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करणाऱ्या केशरी रंगाचा वापर त्यात करण्यात आला.

१९६८ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत धनुष्यबाण निशाणीवर शिवसेनेने ४२ नगरसेवक निवडून आणले होते. तर १९८८ च्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीत चंद्रकांत खैरेंसह २८ नगरसेवक विजयी झाले होते. झारखंड वगळता गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यातही शिवसेना धनुष्य बाण या निवडणूक चिन्हावर रिंगणात उतरते.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.