Take a fresh look at your lifestyle.

प्लेगच्या साथीमध्ये केलेल्या छळाचा बदला म्हणून त्यांनी रँड चा खून केला

0

तारीख होती २२ जून १८९७, पुण्यातल्या गव्हर्मेंट हाउसमध्ये (सध्या इथे पुणे विद्यापीठ आहे) ब्रिटनची राणी व्हिटोरियाच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त मोठा समारंभ होणार होता. या कार्यक्रमाला अनेक ब्रिटीश अधिकारी उपस्थित राहणार होते.

त्यामध्ये तेव्हा पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साठीच्या नियंत्रणासाठी विशेष अधिकारी म्हणून नेमलेले वाल्टर चार्ल्स रँड हे सुद्धा होते. कार्यक्रम संपवून ते आपली आरामस्थानाकडे निघाले, पण त्यांना त्यावेळी हे माहित नव्हते कि ते आपल्या मृत्यूच्या दिशेने चालले होते.

चाफेकर बंधू

चाफेकर बंधू म्हणजे दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हे तीन भाऊ. त्यांचा जन्म तेव्हा पुण्याजवळ असलेल्या चिंचवड या गावचा. त्यांचे वडील हरिपंत चाफेकर हे कीर्तनकार होते.

लोकमान्य टिळकांची प्रेरणा

देशात तेव्हा ब्रिटीशांचे शासन होते. लोकमान्य टिळक पुण्यातून देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करत होते. चाफेकर बंधूंनी लोकमान्य टिळकांकडून प्रेरणा घेवून गावात युवकांचे एक व्यायाम मंडळ देखील सुरु केले होते.

१८९४ साली चाफेकर बंधूंनी टिळकांची प्रेरणा घेवून शिवजयंती आणि गणेशोत्सवाचे कार्यक्रम सुरु केले होते.

प्लेगची साथ आणि सामान्य जनतेचा छळ

१८९७ साली पुण्यासह देशातील काही भागात प्लेगची साथ आली. बघता बघता प्लेगची साथ मोठ्या प्रमाणात पसरू लागली. ब्रिटीश सरकारने सुरुवातीला त्यावर योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत. पण नंतर परिस्थिती सावरण्या पलीकडे गेल्यानंतर विशेष अधिकारी नेमून त्यांना परिस्थिती सावरण्यास सांगितले.

पुण्यातील प्लेगची साथ नियंत्रित करण्यासाठी वाल्टर चार्ल्स रँड याची नेमणूक करण्यात आली होती. रँडनी साथीचे नियोजन करण्यापेक्षा जनतेचा छळ करण्यास सुरुवात केली. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी साथ निवारणाच्या नावाखाली घरातल्या पुरुषांना घराबाहेर काढणे, स्त्रियांवर बलात्कार करणे, घरातील साहित्याची लुटमार करणे असे प्रकार सुरु केले.

तर विशेष अधिकार प्राप्त असलेले रँड आणि आयर्स्ट हे तर बूट घालूनच देवळात घुसत असत. प्लेग पीडितांना मदत करण्याऐवजी लोकांना मारहाण करणे, त्यांना त्रास देणे हा आपला अधिकार समजत असत.

त्यांच्या या वागण्याने लोकमान्य टिळक विचलित झाले. आणि एक दिवस लोकमान्य टिळकांनी चाफेकर बंधूंना म्हटले, “शिवाजी महाराजांनी कायम अत्याचाराच्या विरोधात लढा दिला. परंतु आज जेव्हा हे इंग्रज निष्पाप जनतेवर अत्याचार करीत आहेत, तेव्हा तुम्ही काय करत आहात?”

लोकमान्य टिळकांना आदर्श मानणाऱ्या चाफेकर बंधूंना टिळकांचे हे शब्द मनाला भिडले आणि त्यांनी ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या अन्यायाचा बदला घेण्याचा निर्णय घेतला.

गोंद्या आला रे आला

२२ जून १८९७ च्या रात्री रँड कार्यक्रम संपून टांग्यातून जावू लागला. चाफेकर बंधू गणेशखिंडीत त्याची वाट पाहत थांबले होते. रँड टप्यात येताच “गोंद्या आला रे आला” असं म्हणत सावध करण्याचे ठरले होते. सावध करण्यासाठी वासुदेव चाफेकर थांबले होते.

सुरुवातीला वासुदेव चाफेकरांनी “गोंद्या आला रे आला” अस असा संकेत दिला. बाळकृष्णपंतांनी पिस्तुलीतून गोळी झाडली. पण गोंद्या आला चा संकेत देणारे वासुदेवपंत अजूनही संदेश देत होते. त्यामुळे आपण दुसऱ्याच अधिकाऱ्याला गोळी झाडली आहे. याची जाणीव बाळकृष्णपंताना झाली.

तेवढ्यात मागून रँडची गाडी येताना दिसली. ते पाहताच दामोदरपंत सावध झाले. त्यांनी पाठीमागून गोळी झाडली. तेव्हा मात्र गोळी रँडच्या पाठीत लागली. रँड बेशुद्ध पडला आणि दवाखान्यात नेण्यात आले. पण ३ जुलै १८९७ रोजी रँड मृत्यू पावला.

अटक आणि फाशी

ब्रिटीशांचे महत्वाचे अधिकारी मृत्यू पावल्याने ब्रिटीश सरकार कठोर झाले. त्यांनी माहित देणाऱ्या व्यक्तीला २० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. पण गणेश आणि रामचंद्र द्रविड या दोघांनी सरकारला माहिती दिल्यामुळे त्यांना अटक झाली.

द्रविड बंधूच्या फितुरीचा बदला वासुदेवपंतानी घेतला आणि ८ मे १८९९ च्या दिवशी पुण्यातील खुन्या मुरलीधर मंदिराजवळ द्रविड बंधूचा वध केला. ब्रिटिशांनी चाफेकर बंधूंना पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी दिली.

चाफेकर बंधूच्या या शौर्यानंतर लाला लजपतराय यांनी लिहल होत, “चापेकर बंधु वास्तव में भारत के क्रांतिकारी आंदोलन के जनक थे”

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.