फटाके विक्रेता ते दुसऱ्यांदा मुखमंत्री : कसा आहे भूपेंद्र पटेल यांचा प्रवास
भूपेंद्र पटेल दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होते आणि आता ते पुन्हा नव्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर कोण आहेत भूपेंद्र पटेल ? त्यांचा राजकीय प्रवास कसा होता. तेच आपण जाणून घेऊ
दोन दिवसापूर्वी गुजरात निवडणुकीचा निकाल लागला. भाजपने गुजरातमध्ये रेकॉर्डब्रेक विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाचा हा विजय मानला जात आहे.
पण यांच्यासोबत आणखी एका नावाची चर्चा होणे गरजेचे आहे ते म्हणजे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल.
भूपेंद्र पटेल दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होते आणि आता ते पुन्हा नव्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर कोण आहेत भूपेंद्र पटेल ? त्यांचा राजकीय प्रवास कसा होता. तेच आपण जाणून घेऊ
भूपेंद्र पटेल यांचा जन्म अहमदाबादच्या शिलाज गावात झाला. त्यांचे वडील रजनीकांतभाई पटेल हे शिक्षक होते. सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यांनतर त्यांनी अहमदाबादच्या शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला.
शिक्षणानंतर त्यांनी सुमारे तीन वर्षे खासगी बांधकाम कंपनीत काम केले. यानंतर त्यांनी आठ मित्रांसह बांधकाम व्यवसायाला सुरुवात केली. त्यांची विहान असोसिएशन नावाची एक बांधकाम कंपनी आहे, ती त्यांचा मुलगा आणि सून सांभाळतात.
एकेकाळी भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबादच्या दरियापूर भागात फटाके विक्रेते म्हणून व्यवसाय सुरू केला. यानंतर त्यांनी यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून आपला ठसा उमटवला.
भूपेंद्र पटेल लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय होते.
त्यांनी महापालिका निवडणुकीपासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. ते अहमदाबाद महानगरपालिकेचे ते अनेक वेळा सदस्य राहिले आहेत. २०१० ते २०१५ या काळात अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षही होते. पक्षाने त्यांना २०१५ मध्ये अहमदाबाद शहर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष केले. ते दोन वर्षे अध्यक्षही होते. या वेळी त्यांनी शहराच्या विकासात शासनाच्या योजना चांगल्या प्रकारे राबवल्या होत्या.
२०१७ मध्ये आनंदीबेन यांच्या सूचनेनुसार त्यांना विधानसभेचे तिकीट दिले, त्यात ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. २०२१ मध्ये मुख्यमंत्री होण्यापूर्वी भूपेंद्र पटेल कधीही मंत्री नव्हते. भूपेंद्र पटेल यांची प्रतिमा प्रामाणिक व स्वच्छ आहे. ते खूप लो प्रोफाइल राहतात. याचंच एक उदाहरण म्हणजे गुजरात निवडणुकीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतानाही भूपेंद्र पटेल माध्यमांना मुलाखती देताना मात्र दिसले नाहीत.
२०१७ मध्ये आनंदीबेन पटेल मध्य प्रदेशच्या राज्यपाल झाल्या तेव्हा त्यांनी अहमदाबादमधील घाटलोडिया मतदारसंघातून भूपेंद्र पटेल यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली. भूपेंद्र पटेल यांनी काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांचा १ लाख १७ हजार मतांनी पराभव केला. २०१७ च्या निवडणुकीत हा सर्वात मोठा विजय होता.
गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला तेव्हा हायकमांड भूपेंद्र यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड करतील, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. असं म्हटलं जातं कि राजीनाम्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रीय निरीक्षक नरेंद्र तोमर यांनी गांधीनगरच्या भाजप मुख्यालयात भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा केली तेव्हा त्यांना शोधण्यासाठी कार्यकर्त्यांना पाच मिनिटे लागली होती.
भूपेंद्र पटेल यांना मख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून लढलेल्या या निवडणुकीत भाजपने रेकॉर्डब्रेक विजय मिळवला असला तरी भूपेंद्र पटेल यांचा वैयक्तिक विजय देखील रेकॉर्डब्रेकच आहे. घाडलोटिया मतदारसंघातून त्यांनी काँग्रेस उमेदवारावर १ लाख ९१ हजार पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे. त्यांना तब्बल ८३ टक्के मते मिळाली आहेत. १२ डिसेंबर रोजी भूपेंद्र पटेल पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम