Take a fresh look at your lifestyle.

कोरोना से डरोना; कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरचा अनुभव

0

एक डॉक्टर म्हणून कोरोना पँडमीकचा माझ्या अनुभवाला मी ‘माझा लढा’ हे शब्द कधीच वापरणार नाही, कारण कोरोना असो किंवा भविष्यात येणारा आणखी कोणता विषाणू असो, येणाऱ्या पेशंटवर उपचार करणं हे माझं कर्तव्यचं आहे आणि राहील. यात माझा ‘स्व’ कायमच दुय्यम स्थानावर राहील. नेहमी प्रथम असेल तो पेशंट.

खरतरं हीच शिकवण मेडीकलचं शिक्षण घेतेवेळीच माझ्या मनावर बिंबली आहे. त्यामूळे कोरोना पँडमीकमध्ये निस्वार्थपणे हे कर्तव्य पार पाडायचंच, हेच पहिल्यापासून मनात होत. राहिला होता प्रश्न कोरोना संक्रमनाच्या भीतीचा, ती फक्त माझ्या घरच्यांना होती.

मला त्याची कधीच भीती वाटली नाही आणि संक्रमन झाले तर काय..? हा विचारही कधी मनाला शिवला नाही. त्यामागचं कारण ओव्हरकॉन्फिडन्स अजिबातचं नव्हतं आणि आज ही नाही.

जगभरात थैमान घातलेल्या या कोरोना विषाणूचा संक्रमणातील वयोगट, त्यांच्यावर झालेला परिणाम, त्यातून बरा होण्याचा दर, मृत्यु दर या सर्व गोष्टींचा तपशील देणारे पब्लिकेशन माझ्या इंचार्ज सरांनी मला दाखविले होते. हे पब्लिकेशन, मेडिकल फिल्डमधल्या बायबल समजल्या जाणारया JAMA आणि NEJM Journals मधून होते.

कोरोना विषाणूबद्दलची कोणतीही माहिती मी वर्तमानपत्रात किंवा सोशल मिडियावर वाचलेली नाही, आजही वाचत नाही.

आमच्या मेडिकल बायबलमुळे शास्त्र अगदी काचे सारखं माझ्या डोळायांसमोर स्पष्ट होतं. ते डोक्यात घेतलं, बेसिक precuationsची शिदोरी जमा केली आणि निडरपणे कामाला सुरवात केली. शेवटी ‘संकल्प से सृष्टी’ हे माझ्या बाबतीत खरं झालं.

right information, right belief system, right thought process आणि ultimately right action या बेसीसवर वर मी आज निडरपणे, शांतपणे काम करत आहे. यावेळी काम करतानां मात्र एक वेगळीच जबाबदारी जाणवली कारण मी पहिल्यांदाच पँडमीकमध्ये काम करण्याचा अनुभव घेत आहे. ज्यामध्ये एक पेशंट नाही, तर संपुर्ण समाजाला या रोगापासून सावध करायचं आहे, वाचवायचं आहे.

कोरोना रोखण्याचे काम वेगवेगळ्या स्थरांवर अगदी युद्धपातळीवर होत असताना आपलाही यासाठी हातभार लागतोय या गोष्टीचं एक वेगळंच समाधान वाटतं होतं.

आता पर्यंत माझे कोव्हिड अतिदक्षता विभागात तीन रोटेशन्स झाले. या दिवसांमधला माझा अनुभव चांगला किंवा वाईट, असा मी विचार केला नाही. कारण जे काही बदल चालले होते. त्याचा स्विकार करीत पुढे जाणे हेच माझ्या दृष्टीने योग्य होतं. झालेला बदल आणि त्याचा परिणाम मात्र कायमच लक्षात राहिल.

एरव्ही ड्यूटी करताना माझा नेहमीच हा प्रयत्न असतो की पेशंट-डॉक्टर -सिसटर-नातेवाईक यांच्यामधली संवादाची सायकल फिल्डवर स्मुथली धावावी, ज्यामूळे पेशंटला योग्य उपचार देण्याचा आपला मूळ हेतू साध्य होतो. कोव्हिड अतिदक्षता विभागातमध्येही हाच प्रयत्न असतो. त्यामागचा हेतूही साध्य होतो.

पण या सर्वांत एक गोष्ट हरवली आहे- आमचा चेहरा, त्यातून व्यक्त होणारं आमचं भावविश्व, ती चेहऱ्यावरची स्माईल, तो धीराचा स्पर्श जो पेशंटला बर करण्यासाठीचा औषधाआधीचा रामबाण उपाय असतो. आता पी.पी.ई. किटमुळे आमचा पेशंटशी कनेक्ट होण्याचा एकच मार्ग असतो तो म्हणजे आमचा आवाज, आमचे डोळे आणि त्याचा वापर करून झालेला संवाद. हा बदल स्विकारला आहे.

पण पेशंटसहीत आम्ही सगळेच एकमेकांमधल्या मुक्त संवादाला, भावनांच्या देवान-घेवानीला मुकलो आहोत. आठ तासाच्या ड्युटीत मशीन सारखं काम करावं लागत. पी.पी.ई. किट घालून काम अजिबात आल्हादायक नाही. नाईट ड्यूटीला सहनशक्तिचा कस लागतो ! गुदमरन काय असत यांचा अनुभव असंख्यवेळा घेऊन झाला आहे. कधी कधी तर चीड येऊन अंगावर चढवलेला सेफ्टी किट काढून टाकून मोकळा श्वास घ्यावा, पेशंटशी, स्टाफशी मोकळा संवाद साधत ड्यूटी करण्याची इच्छा होते, पण असं होणं शक्य नाही हे स्विकारून काम करणं चालू आहे.

कोरोना बाधित रुग्णांबद्दल सांगायचं झालं तर, मी जे आमच्या मेडिकल बायबलमध्ये वाचलं तेच पाहत आहे. रूग्णांची संख्या वाढत जरी असली तरी बरे होणाऱ्याचीही सख्या चांगली आहे. बाधित होणारा तरूण वर्ग तर अगदी कमी आहे पण बाधित झाल्यानंतरही त्यांचा लवकर बरा होण्याचा दर जास्त आहे. पन्नाशीच्या पुढचे आणि अनेक व्याधींनी ग्रासलेल्या रुग्णांना धोका जरी असला तरी मृत्यु दर कमी आहे आणि असे बरेच लकी चार्म आहेत जे कोरोनाला पुरून उरलेत. या सर्वांना माझा मानाचा मुजरा…!!

एक गोष्ट मी या जिंकलेल्या लोकांमध्ये बघितली, ती म्हणजे जगण्याची जिद्द आणि त्याला जोर देणारं त्यांच्या घरच्यांच प्रेम. एरव्ही पेशंट अॅडमीट असला की नातेवाईकांना त्याच्या जवळ राहून त्याला धीर देता येतो पण कोव्हिड अतिदक्षता विभागात मध्ये असण्यारया पेशंट आणि नातेवाईकांमध्ये मेडिएटर मध्यस्थ असतो फक्त व्हॉटस अपचा व्हिडीओ कॉल. आपल्या घट्ट ऋणांणूबधांची, भावनांची ताकत एवढी असते की ती टेक्नॉलॉजीच्या खेळण्याला चीरत एकमेकांपर्यंत पोहचते आणि मनाला उभारी देते याचा प्रत्यय परत एकदा आला.

नातेवाईक: “कसं हाईसा पप्पा…? काळजी घ्या..? जेवनात दुध आणून देवू का पप्पा…? दाढी किती वाढली ओ पप्पा…?”

पेशंट: “मनु, अरे फोन करत जा की रे, सकाळ, संध्याकाळ करत जा बघ, डॉक्टरला विचारून घे, कधी सोडणार आहेत ?
सुमे रडू नकोस, रडू नकोस. मी परत येणार हाय.
यवस्थित रहावा. भांडू नकोस…?”

काम करताना हे पेशंटच आणि नातेवाईकांच असं बोलणं कानावर अनेकदा पडायचं, अजूनही पडत. ती ऐकल कि माझ्यातला भावनिक भाग जागा होऊन डोळ्यांत टचकन पाणी भरायचं.

या सर्वांत, माझ्या मनात अस्वस्थता आली नाही असं झालं नाही, शेवटी मी ही माणूस, मलाही नात्यांची ओढ आहे, ती नाती जपायची आहेत. ड्यूटीनंतरचा एकटेपणा खायला लागायचा. घरची ओढ लागायची, घरच्यांची काळजी वाटायची आणि डोळ्यांतून गंगा-जमूना वहायला लागायच्या.

मी माझ्या लहान बहिणीशी तासंनतासं बोलून सर्व गोष्टी शेअर करायचे. या सर्वांतून मला तारणारी आणखी एक गोष्ट होती मराठी साहित्याचे भंडार, माझी अवांतर वाचनाच्या आवड आणि लेखन.

‘पैशासाठी नोकरी आणि जगण्यासाठी कला हवीच..’ या पु. ल. देशपांडेच्या वाक्याप्रमाने, मी या काळात खरंच जगलेली आहे. या बरोबरचं अजून एक गोष्ट मी खूप मनापासून करत राहिले, ती म्हणजे “योग”. याचे धडे गिरवायला मी आधीपासूनच सुरवात केली होती पण लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेत हे धडे पक्के होत आहेत. याचे फळ म्हणून मिळालेल्या शारीरिक आणि मानसिक खंबीरतेचा आनंद मी पावलो- पावली घेत आहे.

नकळतपणे या सर्व गोष्टी, माझ्यासाठी कोरानाचं संक्रमन टाळणारं ठरलं आहे, कारण अद्याप तरी त्यावरील औषधाचा शोध लागलेला नाही. हे सगळ इथ मुद्दाम नमूद करत आहे कारण आता कोरोना पँडमीक आणि भविष्यात नंतर कुठलाही येणारा विषाणू असूदेत, मला तुम्हाला, आपल्या सर्वांना तारणारी एकच गोष्ट असेल, ती म्हणचे आपलं मानसिक आणि शारीरीक स्वास्थ्य. हे जोपासता आलं तर आपल्याला कोरोना काय आयुष्यात येणारया कोणत्याही संकटाचा सामना सहजपणे करता येईल.

शेवटी एवढचं सांगेन ‘Change is the only permanent thing in life.’

कोरोना आला, त्याला जे थैमान घालायचे होते ते त्याने घातले, त्यामुळे खूप संकटे आली आहेत, जग बदलत आहे, ही गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्याकडे बघण्याचा स्वतःचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा आणि कोरोनाला न घाबरता.

‘तू चाल पुढं, तुला रे गड्या भीति कशाची….”, हे गाणं म्हणंत आयुष्याची गाडी पुढे हाका.

  • डॉ. शुक्लिमा शिवाजी पोटे
  • लेखिका पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात कार्यरत आहेत.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.