अजित पवार : मला आमदार करणारे दादा
दादांनी एकदा शब्द दिला म्हणजे दिला. त्यामध्ये कोणताही बदल होत नाही. याचा अनुभव मला विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात आला.
दोन वर्षांपूर्वी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार निलेश लंके यांनी लिहलेला हा लेख आज पुन्हा रिपोस्ट करत आहोत.
सामाजिक जीवनात काम करत असताना अनेक व्यक्ती माणसं भेटतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन सहकार्य मिळत असते. त्यांच्या सल्ल्याचा आयुष्यात नक्कीच फायदा होतो. त्यामुळे अशा व्यक्ती आपल्या करता खऱ्या अर्थाने आदर्शवत असतात.
याशिवाय काही व्यक्ती अशा असतात की ज्या आपल्या जीवनाचा पूर्णपणे कायापालट करतात.
पाठबळ प्रोत्साहन देऊन या व्यक्ती आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवतात. माझ्याही राजकीय जीवनाला अशाच पद्धतीने कलाटणी मिळाली. त्याचबरोबर आज सरपंच ते आमदार असा जो प्रवास केला. त्यामध्ये काही व्यक्तींचा नक्कीच हातभार आहे. तो मला प्रांजळपणे मान्य करावाच लागेल.
माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला कमी वेळात आकार आणि वळण देण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी.
दादांच्या बाबतीत मी अनेकदा ऐकले होते. परंतु प्रत्यक्षात दीड वर्षापूर्वी त्यांच्याशी संबंध आला. तसे पाहिले तर मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. फक्त सामाजिक बांधिलकी आणि समाजाचे प्रेम या दोनच गोष्टी माझ्याकडे होत्या. एका शिक्षकाचा मुलगा राज्याच्या विधिमंडळात पर्यंत मजल मारतो. त्यासाठी अजितदादा पवार यांनी खऱ्या अर्थाने मला पाठबळ दिले.
एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सामाजिक आणि राजकीय उंचीवर घेऊन जाण्याचे काम देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब आणि सन्माननीय अजितदादा पवार यांच्याशिवाय दुसरे कोणी करू शकणार नाही. हे माझ्या मी स्व अनुभवातून सांगतोय.
मी लोकवर्गणीतून आमदार झालो असलो तरी साहेब व दादांचा त्यामध्ये नक्कीच वाटा आहे.
त्यांनी मला पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मी सर्व सामान्य जनते करता झटतोय. रात्रीचा दिवस करतोय हे दादांनी जाणले. त्याचबरोबर लोकांचा कल सुद्धा त्यांनी ओळखला. साहजिकच अजितदादांची राजकीय उंची आणि अनुभव हा फार मोठा आहे. त्यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणले. आज पर्यंत सन्मानाची वागणूक दिली.
अजितदादा पवार यांनी जे प्रेम दिले. ते या अगोदर सामाजिक आणि राजकीय जीवनात मला कधीच मिळाले नाही. मान सन्मान दादांनी मला दिला. आदरणीय साहेब आणि दादा या दिग्गजांचा मला सहवास मिळाला. यापेक्षा मोठे भाग्य दुसरे काहीच नसावे.
दादांकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.ते कडक शिस्तीचे असले तरी तितकेच संवेदनशील आणि प्रेमळ आहेत. अन्यायाविरोधात पेटून उठणारे ते अखंड महाराष्ट्राचे नेतृत्व आहे. एखादी गोष्ट करायची म्हणजे करायची. मग काहीही झाले तरी मागे हटायचे नाही. हा त्यांचा स्वभाव खरोखर आदर्शवत आहे.
दादांनी एकदा शब्द दिला म्हणजे दिला. त्यामध्ये कोणताही बदल होत नाही. याचा अनुभव मला विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात आला.
त्यांनी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला. पारनेर नगर या विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. स्वर्गीय वसंतदादा झावरे पाटील यांनी घड्याळाच्या चिन्हावर दोन पंचवार्षिक निवडणुका लढवल्या. ते एक दशकभर पारनेरचे विधिमंडळात नेतृत्व करीत होते. त्यानंतर या मतदारसंघात पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळाले नाही. परंतु 2019 ला पारनेर नगर मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा विश्वास दादांना होता. त्यांनी मला पाठबळ आणि प्रोत्साहन दिले.
तू नक्की जिंकशील आणि आमच्या सोबत आमदार म्हणून काम करशील. हे वाक्य दादा मला प्रत्येकवेळी भेटले की सांगत असत. त्यामुळे साहजिकच माझा आत्मविश्वास अधिकच वाढला.
राजकारणातील बारकावे अजितदादा मला नेहमीच सांगतात. प्रचंड अभ्यास, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण, नवनवीन गोष्टींचा घेतला जाणारा ध्यास, ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करण्याचा स्वभाव, आक्रमक पण तितकेच संवेदनशील अशा अनेक गोष्टी अजितदादा पवार साहेबांबद्दल सांगता येतील. सकाळी लवकर उठून लोकांना भेटणे. राज्यभरातून आलेले फोन घेऊन जागच्याजागी त्यांच्या समस्या आणि अडचणी सोडवणे यामध्ये त्यांचा खरोखर हातखंडा आहे. प्रशासनावर पकड असणारा दादां शिवाय दुसरा नेता आज तरी राज्यपातळीवर दिसत नाही.
त्यांचा सहकारी म्हणून या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. सडेतोड आणि परखड विचार मांडणारे ते नेतृत्व आहे. एखादे काम होणार असेल तर होईल. नसेल तर होणार नाही. असे रोखठोक व्यक्तिमत्व म्हणजे अजित दादा होय. त्यांच्याबद्दल जितक सांगाव तितकं कमी आहे. कारण त्यांचं व्यक्तिमत्व हे उत्तुंग आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना दादांचे मार्गदर्शन नक्कीच मौलिक ठरत आहे. कोरोन वैश्विक संकटात मी पारनेर नगर मतदारसंघात काम केले. बाहेरील येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ अन्नछत्र चालवले.
पारनेर आणि नगर तालुक्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाच्या सहकार्याने अनेक उपाययोजना केल्या. बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातील मजुरांना मदतीचा हात सहकाऱ्यांच्या मदतीने दिला. हे काम करीत असताना सन्माननीय अजितदादा पवारांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळाले. त्यांनी फोन करून माझा व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. त्यांच्याकडून सातत्याने प्रेरणा मिळते.
अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यांच्याकडे असलेला अनुभव सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करीत असताना आम्हा सारख्या कार्यकर्त्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरतो.
अजितदादाबद्दल बरेच काही लिहिता, बोलता आणि सांगता येईल. कारण ते उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. अशा आमच्या प्रेरणा स्थानाचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना मनापासून शुभेच्छा !!
- निलेश ज्ञानदेव लंके
- लेखक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम