मधु दंडवते यांचे एक भाषण ज्याने पंतप्रधानाचे डोळे पाणावले
महाराष्ट्रातून प्रत्येक पाच वर्षाला खासदार दिल्लीत निवडून जातात. आपल्या कार्य कर्तुत्वाने अनेक खासदारांनी दिल्लीत आपली प्रतिमा निर्माण केली. “दिल्लीतला महाराष्ट्र” अशा बाबतीत विचार करताना राज्यातून दिल्लीत निवडून गेलेल्या अश्याच काही खासदारांचे किस्से
मधु दंडवते यांचे भाषण
१९७१ साली संपूर्ण देशात इंदिरा गांधी यांची लाट आलेली असताना त्यांनी शेंदूर फासलेला दगड देखील निवडुन येत होता. महाराष्ट्र देखील याला अपवाद नव्हता. इंदिरा लाटेत कॉंग्रेसचे ४८ पैकी ४७ खासदार निवडून आले होते . फक्त एकच खासदार जनता दलाचा निवडुन आला.
तो खासदार म्हणजे मधु दंडवते…! मधु दंडवते लोकसभेत गेल्यानंतर त्यांच्या अभ्यासू भाषणाची नेहमीच चर्चा होत असे.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यानंतर लोकसभेत इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या ठरावावर लोकसभेत अनेक खासदारांनी भाषणे गेली. पण या सगळ्यात मधू दंडवते यांच्या भाषणाची विशेष चर्चा झाली. त्यांच्या भाषणात वैचारिक दर्जा तर होताच, पण त्याबरोबरच हेलावून टाकणारा भावनेचा स्पर्शही होता.
आपल्या भाषणात मधु दंडवते म्हणाले “श्रीमती गांधींच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष गेला, देशाने पंतप्रधान गमावला आणि खुद्द राजीव गांधी यांची माता हरपली. काँग्रेसला नवीन अध्यक्ष, देशाला नवा पंतप्रधान मिळाला; पण राजीव गांधींना पंतप्रधानपदच काय जगातील सर्व सत्ता मिळाली, तरी त्यांची माता मात्र पुन्हा मिळणार नाही.” असे दंडवते यांनी सांगताच सभागृह हेलावून गेले
खरंतर अशा ठरावाच्या प्रसंगी बाके बडवायची नसतात याचे भान न राहून सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनी बाके वाजवली. नंतर दंडवते यांच्या भाषणाचे सत्तारूढ पक्षाच्या मंत्र्यांनी व सदस्यांनी खाजगी भेटीतही कौतुक केले. पण पंतप्रधान राजीव गांधी यांनी देखील ‘तुमच्या भाषणाने माझे अंत:करण हेलावले’ असं दंडवते यांना सांगितले होते.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम