राजीव गांधी यांचा एक फोन आणि कलेक्टर अजित जोगी राजकारणात आले
२००० साली छत्तीसगड या नव्या राज्याची निर्मिती झाली. कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत मात करून जोगी छत्तीसगड राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले.
आपल्या देशात प्रशासकीय सेवेतून राजकारणात सक्रीय होणारे अनेकजण दिसतील. त्यापैकी एक नाव म्हणजे अजित जोगी. राजकारणात सक्रीय होण्याचा त्यांचा किस्साही असाही इंटरेस्टीग आहेच. पण त्यांचा जीवनप्रवास देखील खास आहे.
अजित जोगी आपल्या काही पत्रकार मित्रांना नेहमी एक किस्सा सांगायचे, एकदा इंदिरा गांधी यांना भेटल्यावर इंदिरा गांधी त्यांना म्हण्याल्या होत्या. “भारतात सत्ता खरतरं तीनच लोकांच्या हातात आहे, डीएम, सीएम आणि पीएम” (जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान)
आणि तेव्हाच अजित जोगी यांना मनात निश्चय केला होता. पुढे ते मुख्यमंत्री झाले. तेव्हा इंदिरा गांधी यांच्या याच वाक्याचा आधार घेत ते म्हणत, “सीएम आणि पीएम तर फार कमी लोक बनले आहेत. पण डीएम आणि सीएम बनण्याचे भाग्य फक्त मला मिळाले आहे”
प्राध्यापक ते आय. पी. एस. आणि आय. पी. एस. पदाचा राजीनामा
अजित जोगी यांचा जन्म २१ एप्रिल १९४६ रोजी छत्तीसगड मध्ये झाला. जोगी यांनी अगोदर मॅकेनिकल इंजिनीअर आणि त्यानंतर त्यांनी लॉं ची डिग्री घेतली. त्यानंतर काही काळ रायपूरच्या इंजिनीअरींग कॉलेज मध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून जॉब केला
प्राध्यापक म्हणून जॉब करत असताना अजित जोगी यु. पी. एस. सी. ची परीक्षा पास झाले आणि आय. पी. एस. म्हणून रुजू झाले. पण अवघ्या दीड वर्षात जोगी यांनी आय. पी. एस. पदाचा राजीनामा दिला कारण त्यानंतर त्यांची आय. ए. एस. साठी निवड झाली होती.
आय. ए. एस. पदाचा राजीनामा
आय. ए. एस. म्हणून काम करताना जोगी यांनी जवळपास १४ वर्ष महत्वपूर्ण अधिकारी म्हणून काम केले. याच काळात त्यांची मध्यप्रदेशचे तेव्हाचे मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांची जवळीक झाली. सिंग यांच्यामुळे जोगी यांची राजीव गांधी यांच्याशी देखील ओळख झाली.
राजीव गांधी यांच्या ऑफिसमधून एक फोन
१९८५ साली कलेक्टर असलेल्या जोगी यांच्या घरी एक फोन आला. फोनवर समोरचा व्यक्ती बोलू लागला “तुम्हारे पास ढाई घंटे है. सोच लो. राजनीती मे आना है या कलेक्टर ही रहना है. दिग्विजय सिंह लेने आएंगे, उनको फैसला बता देना” हा फोन होता राजीव गांधी यांचे पी. ए. असलेल्या व्हिन्सेट जॉर्ज यांचा.
थोड्या वेळात जोगी यांच्या घरी दिग्विजय सिंह पोहचले आणि अजित जोगी कॉंग्रेस पक्षात सामील झाले. काही दिवसात त्यांना कॉंग्रेसच्या कोअर कमिटीमध्ये घेतले आणि त्यानंतर त्यांना राज्यसभा दिली.
मुख्यमंत्री जोगी
दोन वेळा राज्यसभेत गेल्यानंतर १९९८ मध्ये जोगी लोकसभा निवडणूक लढवून खासदार झाले पण पुढच्याच वर्षी १९९९ साली त्यांना हार स्वीकारावी लागली.
२००० साली छत्तीसगड या नव्या राज्याची निर्मिती झाली. कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत मात करून जोगी छत्तीसगड राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले.
छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री बनलेल्या जोगी यांना राज्याच्या राजकारणात चमक दाखवता आली नाही. २००३ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला. राज्यात भाजपचे सरकार आले आणि त्यानंतर १५ वर्षे सत्ता टिकवण्यात भाजपला यश मिळाले.
२००४ साली कॉंग्रेसने जोगी यांना पुन्हा लोकसभा मैदानात उतरवले. जोगी निवडून पुन्हा खासदार झाले.
छत्तीसगड जनता कॉंग्रेस
२०१६ मध्ये जोगी यांनी आपला स्वतःचा पक्ष स्थापन केला. २०१८ साली छत्तीसगड जनता कॉंग्रेसने पक्षाने बहुजन समाज पक्षासोबत निवडणूक लढवली पण यात त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. ९० जागांच्या विधानसभेत फक्त ५ जागा जोगी यांना मिळाल्या.
आज अजित जोगी यांचे निधन झाले. प्राध्यापक, आय. पी. एस. , आय. ए. एस. खासदार, मुख्यमंत्री असा मोठा पल्ला पार करण्याऱ्या जोगी यांना विनम्र अभिवादन..
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम