Take a fresh look at your lifestyle.

त्या दिवशी बीड मध्ये गुलाल उधळायला जेसीबी कमी पडल्या …!

0

२०१४ साली राज्याच्या वरिष्ठ सभागृहाचे विरोधीपक्षनेते पदी धनंजय मुंडे विराजमान झाल्यावर आणि डिसेंबर २०१९ मध्ये राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट पदाची धुरा हाती घेतल्यावर त्यांच्या बाबतीत माध्यमांमध्ये नव्या ‘मुंडे’ पर्वाचा उदय, राजकारणातील नवा ‘मुंडे’, अलीकडच्या काळात तर लोकनेत्याचा पुनर्जन्म, मुंडे साहेब २.० असे मथळे असलेल्या अनेक बातम्या पाहण्यात आल्या.

वैयक्तिक आयुष्यात धनंजय मुंडे यांच्या बऱ्याच गोष्टी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्याशी मिळत्या जुळत्या. उदाहरण सांगायचे झाल्यास दोघांनाही विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. दोघांनाही राज्य स्तरावर पहिले महत्वाचे पद भाजपा मध्ये मिळाले, दोघांनाही पाहिले राज्यस्तरावरील संवैधानिक पद मिळालेले – विरोधी पक्षनेता, दोघांच्याही पोटी लक्ष्मी सुवर्णयोग, दोघांचेही श्रद्धा पीठ भगवानगड, असे कितीतरी लहान मोठे उदाहरणे सांगता येतील.

धनंजय मुंडे मंत्री झाले, बीड जिल्ह्यात त्यांच्या हस्ते पहिले शासकीय ध्वजारोहण २६ जानेवारी २०२० रोजी बीड येथील पोलीस प्रांगणात पार पडले; ध्वजारोहण पार पडताच त्यांनी काही लोकांना त्या व्यासपीठावर बोलावून कसलेतरी चेक दिले. ते लोक होते नारायणगडाच्या पायथ्याच्या साक्षाळपिंपरी गावातील एकाच कुटुंबातील ५ अंध व्यक्ती, त्यांना समाज कल्याण खात्याकडून काही लाखांची मदत भाऊंनी दिली. त्याच्या आदल्या रात्रीच या विषयाच्या कागदांवर भाऊंनी पहिली शासकीय सही केली होती. मिळालेल्या सामाजिक न्याय खात्याच्या कामांचा खरा श्रीगणेशा इथूनच झाला!

स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आयुष्यात भगवानगडाचे अनन्यसाधारण महत्व होते, मुंडे साहेबांची बाबांवर, बाबांच्या गादीवर अपार श्रद्धा होती. भगवानबाबांच्या नंतर स्व. ह. भ. प. भीमसिंह महाराज आणि त्यानंतर आता न्यायाचार्य ह. भ. प. डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनाही मुंडे साहेब गुरुस्थानी मानत, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत धनंजय मुंडे यांनी देखील भगवानगड आपलासा केला.

डॉ. नामदेव शास्त्री यांनी त्यांच्या वाणीतून आशीर्वाद देत ‘धनंजय तुम्ही मंत्री होऊन भगवानगडावर दर्शनाला या’, असा आज्ञादेश धनंजय मुंडे यांचे नाव मंत्रिमंडळात येण्या अगोदर दिला होता. जेव्हा हे नवे मुंडे साहेब मंत्री होऊन जिल्ह्यात आले, भगवानगड, गहिनीनाथगड या ठिकाणी जाऊन संत – महंतांचे शुभाषिश घेतले आणि आपल्या घराकडे परळीला निघाले तेव्हा जिल्ह्यातील प्रत्येक गावच्या लोकांचा उत्साह मी प्रत्यक्ष पाहिला, अनुभवला आहे .आपल्या कुटुंबातील एखादा व्यक्ती २४ – २५ वर्षांचा वनवास भोगून ‘रामराज्य’ स्थापित करायला परत येतोय की काय? अशी भावना त्यावेळी लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

बीड जिल्ह्यात त्यादिवशी जेसीबी मिळत नव्हत्या, आजूबाजूच्या जिल्ह्यातून बोलवल्या होत्या, कारण गावोगाव जेसीबीने गुलाल उधळून, मोठमोठे हार घालून माय – माऊल्यांच्या हस्ते औक्षण करून आपल्या या भूमीपुत्राचे संबंध जिल्ह्यात स्वागत होत होते.

हे स्वागत सत्कार सोहळे पाहत परळीत पोचलो, स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वागत करायला परळी कधी एके काळी अशीच सजली होती म्हणतात, डोळ्याचे पारणे फेडणारे स्वागत आणि कोणाचेही उर भरून येईल असा जनतेचा उत्साह! एखाद्या माणसाला जनतेचं एवढं प्रेम मिळतं, ईश्वरी योगायोग म्हणावं की माणसाने कमावलेलं देवपण?

या मुंडे पर्वा मध्ये संघर्ष या शब्दाचं एक वेगळं वलय आहे, धनंजय मुंडे २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोकमान्य सत्ताधारी बनतात काय आणि सगळ्या जगावर कोरोना सारख्या महामारीचे संकट ओढवते काय.जिल्ह्यात आणि परळीत जागोजागी झालेल्या स्वागत सोहळ्याच्या आठवणी ताज्या होत्या तोपर्यंतच सगळीकडे हा हा म्हणता कोरोनाने डोके वर काढले आणि असे वर काढले की जगभर हाहाकार माजला.

एखाद्या माणसाला लोकनायक लोकनेता अशा उपाध्या अशाच मिळत नाहीत.

सर्वत्र लॉकडाऊन सुरू होतं, विरोधक एसी बंगल्यामध्ये बसून राजकीय खेळी खेळत असत, परंतु पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ठरवलं होतं की प्रसंगी टीका सहन करू, पण भावनिक न होता आधी लोकांच्या समूहाची सुरक्षा प्राधान्याने विचारात घेऊ आणि त्यांनी तसच केलं.

ऊसतोड कामगारांचा विषय किती साधेपणाने हाताळला, त्याला देशातील सर्वात यशस्वी स्थलांतर असे नाव दिले गेले. एवढंच नाही तर ग्रामविकास विभागाकडून एका दिवसात मंजुरी मिळवून जिल्ह्यातील सर्व ऊसतोड कामगारांना पण मोफत किराणा घरपोच करून दिला. किती लोकांचे आशीर्वाद मिळाले असतील!

जेव्हा २० – ३०% निधी एक दोन योजनांसाठी देऊन दिल्लीतून मोदींनी निराधारांना, दिव्यांगांना एकत्रित मानधन देण्याच्या सूचना जारी केल्या, तेव्हा भाऊंनी राज्याच्या तिजोरीचा विचार न करता विविध योजनांसाठी तब्बल १३०० कोटी रुपये आपल्या खात्याकडून मंजूर करून राज्यातील ३५ लाखांहून अधिक निराधार, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विधवा आदी नागरिकांना तीन – तीन महिन्यांचे मानधन एकत्रित दिले. किती लोकांचे आशीर्वाद लाभले असतील!

जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील लहानात लहानात गोष्टींवर बारीक लक्ष ठेऊन ‘सर्व अधिकारी – कर्मचारी चांगले काम करत असताना लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पाठीशी राहून सहकार्य करावे, आवश्यक तिथे सूचना कराव्यात, अडथळे आणू नयेत’ असा सल्ला देऊन विरोध शमावणारे भाऊ कोरोनाशी लढताना अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. पण दुर्दैवाने आग विझवायला जाणाऱ्याला त्या आगीचे चटके बसतातच असे म्हणतात, तसेच झाले आणि सगळ्यांच्या लाडक्या धनु भाऊंना सुद्धा या कोरोनाची लागण झाली.

पण मी सुरुवातीला म्हटलं तसं हे नव्या दमाचे नवे ‘मुंडे’ आहेत, दमदार आणि शक्तिशाली; कोरोनाला हरवून ११ दिवसात बाहेर आले.

कोरोनामुळे सध्या जरी आशा – अपेक्षांना, विकासकामांना खीळ बसला असला तरी परिस्थिती समोर हात टेकून शांत बसतील ते मुंडे कसले? नव्या दमाने ते पुन्हा लढतील, पुन्हा एकदा नवे विकासपर्व हाती घेतील.

धनंजय मुंडे यांच्या आजवरच्या कामाची शैली, लोकांना वेळ देणे, समस्येचे पूर्ण निराकरण करणे, आश्वासन नाही – प्रत्यक्ष कृती असा धाडसी स्वभाव आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या स्वप्नातील आयडियल विकासाचे, सामान्य माणसाचे आर्थिक जीवनमान उंचावण्याचे अत्यंत महत्वाकांक्षी स्वप्न या गोष्टी पूर्णत्वास जाईपर्यंत ते स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नाहीत.

ते एका कामगिरीवर – मिशनवर आहेत, त्यांच्या नजरेत विकासाचे व्हिजन स्पष्ट दिसते, ते मिशन जोपर्यंत फत्ते होत नाही, तोपर्यंत शांत बसणारे हे मुंडे नाहीत. येणाऱ्या काळात नव्या दमाचे हे मुंडे आपल्या कामातून आपल्या नावाची उंची वाढवतील, लोकनायक – लोकनेत्यांच्या यादीत शिर्षस्थानी ‘मुंडे’ हे नाव कायम राहील इतक्या उंचीवर नेतील यात शंका नाही!

महाराष्ट्राच्या लाडक्या धनुभाऊंना जन्मदिवसाच्या निमित्त मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा..

©️ सुधीर सांगळे, बीड

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.