Take a fresh look at your lifestyle.

दोन मुख्यमंत्री : पृथ्वीराज बाबा आणि उद्धव ठाकरे

0

दिल्लीच्या राजकारणाचा बाज वेगळा आहे. तिथे नेते दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी 6 वाजले की एकतर क्लब मध्ये जाऊन physical fitness ची काळजी घेतात, किंवा राजकारणाच्या पलीकडे जपलेली मैत्री निभावण्यासाठी अन्य पक्षातील आपल्या मित्रांना भेटून गप्पा मारतात.

दिल्लीत पूर्व appointment मध्ये घेतल्याशिवाय कुठल्याही नेत्याला भेटता येत नाही. याच राजकीय संस्कृतीत समरस झालेले पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर 2011 मध्ये अचानक महाराष्ट्राची जबाबदारी आली आणि ते मुख्यमंत्री म्हणून रुजू झाले.

महाराष्ट्र्रातील राजकीय संस्कृती तशी खूप ओपन आहे. म्हणजे केवळ मंत्रीच नव्हे तर अगदी मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी आमदारांना कधी वेळ घ्यावी लागत नाही. दिवंगत विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्री कार्यलयात तर काही आमदार कायम बसलेले असायचे.

चव्हाण यांच्या कार्यालयाचे दार ढकलून आमदार जेव्हा प्रवेश करत असत, तेव्हा चव्हाण यांना ते आवडत नसे. आधी वेळ घ्या आणि मग या ही चव्हाण यांनी दिल्लीची शिस्त महाराष्ट्रात लावण्याचा प्रयत्न केला आणि आमदारांचा रोष ओढवून घेतला. अर्थात त्याचे राजकीय परिणाम त्यांना भोगावे लागले.

संध्याकाळी 6 वाजेनंतर कार्यालयीन कामापासून मुक्त होण्याची सवय असलेले चव्हाण 2012 मध्ये मुंबई महापालिका निवडणूक दरम्यान पहाटे 3 वाजेपर्यंत बैठका घेत असे. ती सवय त्यांनी लावून घेतली. वेळ न घेता आलेल्या नेत्यांना भेटायचे ही सवय देखील त्यांनी नंतर लावून घेतली.

मातोश्रीचा रुबाब वेगळा आहे. इथे उद्धव ठाकरे यांच्या खूप जवळ असलेल्या नेत्यांनाच वेळ न घेता उद्धव यांना भेटण्याची संधी मिळते. अन्य कोणी असेल – अगदी पक्षाचा आमदार – तरी त्याला थेट भेट लगेच मिळेल याची शक्यता फार कमी.

मातोश्रीवर एखाद्या नेत्याने फोन केला तर तो attend करून योग्य तो रिप्लाय येईल याची शक्यता नसते. मिलींद नार्वेकर याना वाटले तर ते हा फोन अटेंड करतात. नार्वेकर यांना वाटले आणि वेळ मिळेल तेव्हा ते साहेबाला सांगणार आणि साहेब वेळ मिळेल तेव्हा या नेत्याला वेळ देणार असे साधारण चित्र असते.

शिवसैनिकांसाठी मातोश्री हे मंदिर आणि उद्धव ठाकरे हे ‘दैवत’ आहेत. पण याच मंदिरात अमित शहा किंवा भाजपचे केंद्रातील वरिष्ठ नेत्यांना, राज्यातील रावसाहेब दानवे सारख्या दुय्यम नेत्यांना प्रवेश द्यायचा की याचा निर्णय दैवत घेत असते.

उद्धव ठाकरे हे आता मुख्यमंत्री आहेत आणि काँग्रेस हा त्यांच्या सरकारमधील घटक पक्ष आहे, हे कदाचित ठाकरे विसरले असावेत. मातोश्री संस्कृती आणि सवयी आता बदलायला हव्या असे त्यांना वाटत नसावे.

आपल्या घटक पक्षातील वरिष्ठ मंत्री, ज्यांनी सक्रिय राजकारणात 30-40 वर्षे घालवली आहेत अशा मंत्र्यांना भेटायला मुख्यमंत्री ठाकरे यांना वेळ मिळू नये? आरोग्य मंत्री राजेश टोपे जे अहोरात्र कोरोना काळात काम करत आहेत त्यांचा फोन घ्यायला वेळ असू नये?

ही राजकीय संस्कृतीची घसरण आहे की सत्तेतून आलेली मुजोरी? सत्ता हे वळवावरचे पाणी आहे. आज आहे, उद्या नसेल याचे भान ठेवले नाही तर उगवत्या सूर्याला नमस्कार करणारा हा समाज तुम्हला कधी अडगळीत टाकतो हे तुम्हालाही कळत नाहीत…

काँग्रेसचा एवढा अपमान अजपर्यंत झालेला नसेल. पण सत्तेची चव लागलेली काँग्रेस सगळा अपमान पचवून कुठलेही टोकाचे पाऊल उचलण्याची धमक दाखवाणार नाही हे ही तेवढेच खरे आहे..

  • विवेक भावसार
    लेखकांचा संपर्क – 99304 03073

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.