Take a fresh look at your lifestyle.

वर्धापन दिन विशेष : “मार्मिक”ने शिवसेनेची पायाभरणी केली होती

कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कृष्णा देसाई यांची हत्या झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने आपला उमेदवार उभा केला. त्यानंतर या निवडणुकीत वामनराव महाडिक शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून निवडून आले.

0

आज 19 जून, आजच्याच दिवशी 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली होती. गेल्या अर्ध्या शतकात शिवसेनेने एक पक्ष म्हणून राजकारणात ठसा उमटवलाच आहे. पण यापलीकडे शिवसेनेचे महाराष्ट्रातील जनतेशी अतूट नाते आहे. आज शिवसेनेच्या वाटचालीतील काही महत्त्वाचे टप्पे आपण इथं जाणून घेणार आहोत.

“मार्मिक”शिवसेनेची पायाभरणी केली होती

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर लगेचच काही दिवसात बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांनी मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाची सुरुवात केली होती. तेव्हाचे राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते मार्मिकच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले होते.

मार्मिक च्या स्थापनेनंतर बाळासाहेबांपर्यंत मराठी लोकांचे अनेक प्रश्न पोहचू लागले. मार्मिक मधून त्याला वाचा फोडली जावू लागली. पण सोडवण्यासाठी संघटनेची गरज होती.

स्थापना आणि दसरा मेळावा

राजकीय पक्ष नाही तर मराठी माणसांची संघटना म्हणून शिवसेनेची स्थापना करण्यात आली. १९ जून १९६६ रोजी प्रबोधनकार ठाकरे यांच्या हस्ते काही निवडक लोकांच्या उपस्थितीतीमध्ये शिवसेनची स्थापना करण्यात आली.

शिवसेनेच्या स्थापनेनंतर काही दिवसात ३० ऑक्टोबर १९६६ च्या दिवशी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिवसेनेची पहिली जाहीर सभा घेण्यात आली. पहिल्याच सभेला मराठी लोकांची मोठी उपस्थिती होती. शिवसेनेची दसरा मेळाव्याची ती उपस्थिती आजदेखील कायम आहे.

त्या पहिल्या सभेला काही कॉंग्रेस नेत्यांची देखील उपस्थिती होती. याच सभेत प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते, “हा बाळ (बाळासाहेब ठाकरे) तुम्हाला दिला.” याच सभेत बाळासाहेबांनी ८० टक्के समाजकारण आणि २० राजकारण या शिवसेनेच्या भूमिकेचा उच्चार केला होता.

निवडणुकींच्या राजकारणात

सुरुवातीला “निवडणुका लढवणार नाही” अशी भूमिका घेतलेल्या शिवसेनेने स्थापनेनंतर एकाच वर्षात निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला. १९६७ साली ठाणे आणि १९६८ साली मुंबई महापालिकेत शिवेसेनेने आपले उमेदवार मैदानात उतरवले.

याच काळात शिवसेनेने कॉंग्रेसच्या काही उमेदवारांना आपला पाठींबा दिला तर समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्षांच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला.

बाळासाहेबांना पहिली अटक आणि दंगल

निवडणुकीच्या राजकारणात आल्यावर शिवसेना अधिक आक्रमक झाली. बेळगाव आणि सीमा प्रश्नावरून तत्कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला. त्यावर पोलिसांनी लाठीचार्च केला गेला आणि बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यात आली.

बाळासाहेबांच्या अटकेनंतर मुंबईमध्ये दंगल पेटली. तब्बल सात दिवस मुंबई जळत होती. अखेर मुंबई शांत करण्यासाठी बाळासाहेबांनीच पुण्याच्या येरवडा तुरुंगातून प्रसिद्धीपत्रक काढले. त्यानंतर मुंबई शांत झाली. पण या सगळ्या प्रकरणात तब्बल ६९ लोकांचे प्राण गेले.

पहिला आमदार आणि पहिला महापौर

कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कृष्णा देसाई यांची हत्या झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने आपला उमेदवार उभा केला. त्यानंतर या निवडणुकीत वामनराव महाडिक शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून निवडून आले.

याविषयी सविस्तर वाचण्यासाठी :- शिवसेनेचा पहिला आमदार कसा निवडून आला होता, माहित आहे का ?

१९७१ साली झालेल्या मुंबई महापालिकेत शिवसेनेचा पहिला महापौर निवडून आला. डॉ. हेमचंद गुप्ते शिवसेनचे पहिले महापौर झाले. तेव्हापासून आजपर्यंत सर्वाधिक काळ शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेत राहिला आहे.

आणीबाणीला पाठींबा आणि काँगेसचा प्रचार

१९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. बाळासाहेब ठाकरे यांनी या आणीबाणीस पाठींबा दिला होता. त्यावरून बाळासाहेबांच्या अनेक वेळा टिकाही झाली.

त्यानंतर १९८० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेबांनी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा थेट प्रचार केला. त्याबदल्यात कॉंग्रेसकडून शिवसेनेला विधानपरिषदेच्या दोन जागा देण्यात आल्या होत्या. मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक आमदार झाले.

बाळासाहेबांची राजीनाम्याची धमकी

१९७७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील शिवसेनेला मोठा धक्का बसला होता.

त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत बाळासाहेबांनी आपल्या शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसैनिकात मोठा हंगामा झाला. त्याचा परिणाम म्हणून त्यांनी पुन्हा तो मागे घेतला.

पहिला महाराष्ट्र दौरा

१९८५ साली महाडच्या अधिवेशनात “आता घोडदौड महाराष्ट्रात” असे म्हणत शिवसेना मुंबई-ठाणे या पट्ट्यातून बाहेर पडली. त्यानंतर बाळासाहेबांनी झंझावाती महाराष्ट्र दौरा केला. याच दौऱ्यावेळी बाळासाहेबांनी गळ्यात कवड्याची माळ घालून आपला पेहराव बदलला

भाजपसोबतची युती आणि लोकसभा

भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या पुढाकारातून १९८९ साली शिवसेना-भाजपची युती झाली. त्यानंतरच्या अनेक निवडणुका युतीने एकत्रित लढल्या. २०१९ पर्यत हि युती अनेक वाद-विवादानंतर देखील टिकली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादानंतर हि युती तुटली.

१९८९ साली भाजप सोबतच्या युतीने शिवसेनेने आपले उमेदवार लोकसभा मैदानात उतरवले. या निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचे चार उमेदवार लोकसभेत पोहचले.

राज्यात सरकार आणि मुख्यमंत्री

१९९५ ची विधानसभा निवडणुकीत युतीने चमत्कार घडवला. राज्यात प्रथमच कॉंग्रेसतर सरकार अस्तित्वात आले. शिवसेनचे मनोहर जोशी मुख्यमंत्री तर भाजपचे गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले.

केंद्रीय मंत्रिमंडळात

1998 साली देशात प्रथमच भाजप आणि मित्रपक्षाला सत्ता मिळाली . अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले . शिवसेना त्या सत्तेत सहभागी होती . शिवसेनेचे मनोहर जोशी मंत्री झाले, पुढे ते लोकसभेचे सभापती देखील झाले

राज ठाकरे आणि मनसे

2005 साली नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली. त्यानंतर एकाच वर्षात राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली.

2014 साली देशात नरेंद्र मोदी यांची लाट आली. देशात भाजप मित्रपक्षांची सत्ता आली.

सेना सत्तेत सहभागी झाली. अनंत गीते केंद्रीय मंत्री झाले. पण त्यांनंतर सहाच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्द्यावरून युती तुटली पण निकालानंतर पुन्हा युती झाली. सेना भाजप पाच वर्ष राज्यात सत्ता चालली.

2019 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार हे नक्की झाले. पण मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून पुन्हा ठिणगी पडली. राज्यात सत्तेचा नवा प्रयोग झाला. महाविकास आघाडी स्थापन झाली. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.