Take a fresh look at your lifestyle.

आचार्य अत्रे यांचे हजरजबाबीपणाचे हे किस्से तुम्हाला वाचायला हवेत

0

आचार्य अत्रे नसते तर हा संयुक्त महाराष्ट्र मिळाला नसता. आचार्य अत्रे नसते तर या महाराष्ट्र राज्याचे ‘महाराष्ट्र’ हे नाव ठेवले गेले नसते. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली गेली असती. महाराष्ट्रात मराठी माणसाचा आवाज केव्हाच दाबला गेला असता. आचार्य अत्रे होते, म्हणून आज महाराष्ट्र उभा आहे.

पंचवीस हजाराच्या सभा, लाख लाख दीड दीड लाखांच्या सभांना हसत ठेवणे हा आचार्य अत्रे यांचा हातखंडा विषय होता.

वीस वीस मिनीटे हशा आणि वीस वीस मिनीटे टाळ्या ही आचार्य अत्रे यांचे वैशिष्ट्य होते आणि टाळ्या हे आचार्य अत्रे यांचे अभेद्य समीकरण होते.

आचार्य अत्रे यांना गर्दीचे व गर्दीला आचार्य अत्रे यांचे वेड होते” असे प्रा.ना.सी. फडके म्हणत असत.

लहान मुलांपासून थोरांपर्यंत आचार्य अत्रे यांचे विनोद महाराष्ट्राला माहिती नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रात कदाचित सापडणार नाही. आचार्य अत्रे यांचा हजरजबाबीपणा प्रचंड होता. त्यातच त्यांचे काही गमतीशीर किस्से

खिशातला हात

१९६५ सालची गोष्ट असावी. सांगली मध्ये अत्रे यांचे भाषण होते एवढ्यात गर्दीतून “अत्रेसाहेब खिशातला हात काढा” असा आवाज ऐकू आला. अत्रे यांना खिशात हात घालून बोलण्याची सवय होती. त्यावर अत्रे यांनी शांतपणे उत्तर दिले कि

“तुमच्या मनात जे आहे ते माझ्या हातात नाही”

गर्दीतून प्रचंड हशा नि टाळ्या पडल्या आणि अत्र्यांचे भाषण शांतपणे तसेच पुढे चालू राहिले.

सभ्य गृहस्थ

पुण्याच्या ऍम्पी थिएटर फर्ग्युसन कॉलेजमध्ये कळ्यांचे निश्‍वास या मालतीताई बेडेकरांच्या पुस्तकावर विविध वृत्ताने खटला भरला होता. त्या पार्श्‍वभूमीवर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या ऍम्पीथिएटरमध्ये विद्यार्थ्यांसमोर आचार्य अत्रे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

आचार्य अत्रे व्याख्यानास सुरवात केली आणि सभ्य गृहस्थ हो! असे म्हटल्यावर तिसऱ्या मजल्यावरील एका विद्यार्थ्यांने ओऽऽओ अशी जोरदार प्रतिसाद दिला. त्यावर आचार्य अत्रे म्हणाले, “तुम्हाला नाही मी सभ्य गृहस्थांना उद्देशून म्हटले होते.” अशी हजरजबाबी, तात्काळ, सत्वर विनोदाची अनेक उदाहरणे खूप देता येतील.

गाढवाच्या पाठीवरील केस

वक्‍त्याला घाबरवण्यासाठी श्रोते देखील काही कमी बेरकी नसतात. एका सभेत एका श्रोत्याने काय हो, गाढवाच्या पाठीवर किती केस असतात? असे आचार्य अत्रे यांना विचारले

त्यावर अत्रे यांनी शांतपणे उत्तर दिले “या व्यासपीठावर मोजून सांगतो’ अत्रे यांचे उत्तर ऐकून श्रोता पळून गेला.

गाडगीळ आणि रशिया

आचार्य अत्रे रशियावरुन नुकतेच आले होते. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली आचार्य अत्रे यांचे “मी रशियात काय पाहिले?’ यावर पुण्याच्या लक्ष्मी क्रिडा मंदिरात (आताचे डीएसके चिंतामणी. पूर्वीची नातू बाग) सभेचे आयोजन बॅ. विठ्ठलरावांनी त्यांच्या अध्यक्षतेखालीच केले होते.

स्वागत, प्रास्तविक करताना बॅ. विठ्ठलराव म्हणाले खरे तर गाडगीळ मंडळी महाराष्ट्रात सर्वत्र पसरलीयत. अर्थशास्त्रात धनंजयराव गाडगीळ, वाडःमयशास्त्रात गंगाधर गाडगीळ, राज्यशास्त्रात काकासाहेब गाडगीळ, पत्रशास्त्रात पांडोबा गाडगीळ

एकदा आचार्य अत्रे यांनी पांड्या, पांड्या बॅरीस्टर का झाला नाहीस? म्हणून पांडोबांना विचारले. मग बॅरीस्टर होऊन कायदेशास्त्रात पारंगत झालो.

आचार्य अत्रे यांचा आम्हा गाडगीळ घराण्यावर फार राग आहे. ते उत्तम नाटककार, आद्यविडंबनकार आहेत. पण ते फार अतिशयोक्ती करतात आणि त्यांना पळता येत नाही.

आचार्य अत्रे मुख्य भाषण द्यायला उठले आणि म्हणाले, “आजचे अध्यक्ष बॅ. विठ्ठलराव गाडगीळ काकासाहेबांचे चिरंजीव जरा थांबून काय हो अतिशयोक्ती नाही ना?” सर्वत्र हशा पिकला. पुढे ते म्हणाले आताच “बॅ. विठ्ठलराव गाडगीळ म्हणाले मला पळता येत नाही. पण पळणाऱ्यांची मी पळता भुई पुरी करतो.”

दोन चांगल्या गोष्टींत एखादी वाईट गोष्टही घडते

स. का. पाटील संयुक्त महाराष्ट्राचे विरोधक. त्यांची चेष्टा करण्याची एकही संधी आचार्य अत्रे सोडत नसत. स. का. पाटलांनी मुंबई मराठी जनतेला मिळणार नाही, अशी गर्जना केली होती. त्यामुळे अत्रे यांचा त्यांच्यावर राग होता.

एका सभेत बोलताना, “दोन चांगल्या गोष्टींत एखादी वाईट गोष्टही घडते,’ असे सांगून अत्रे म्हणाले, “”13 ऑगस्टला माझा जन्म झाला. म्हणजे 13 ऑगस्टला विनोद जन्माला आला. 15 ऑगस्टला हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले. या दोन चांगल्या गोष्टी झाल्या. पण, 14 ऑगस्टला स. का. पाटील जन्माला आले..!”

अजून एक आला तर बिघडलं कुठं?

आचार्य अत्रे पुण्यामध्ये राहत असताना एकदा काकासाहेब गाडगीळ त्यांना म्हणाले “तुमच्या साहीत्य संमेलनाला मी कधी येत नाही.”

अत्रे: “हो मी तुम्हाला कधी साहीत्य संमेलनात पाहीले नाही.
काका : “मी साहीत्य संमेलनाला का येत नाही विचारा”
अत्रे : “का बुवा येत नाही?”
काका: तुमच्या त्या साहीत्य संमेलनात सगले डँबिस लोक असतात.

अत्रे : मग तेवढ्यासाठी तुम्हाला न येण्याचे कारण काय? इतक्या डँबिस लोकां अजून एक आला तर बिघडलं कुठं?

मधला ‘च’ एवढा महत्वाचा आहे का?

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणा प्रसिद्ध झाली होती. जवाहरलाल नेहरूंचा मात्र याला विरोध होता आणि त्यामुळेच राज्यातले काँग्रेस नेते सुद्धा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राला विरोध करत होते.

यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्याने तर नेहरु व संयुक्त महाराष्ट्रात मला नेहरु महत्त्वाचे वाटतात असे म्हटले होते. अत्र्यांनी आपल्या ‘मराठा’ या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तर विरोधकांवर बोचरी व कठोर टीका केली.

त्यांच्या भाषणातून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला होता. त्यानंतर असेच एकदा यशवंतराव चव्हाण अत्रेंना भेटायला गेले. त्यांनी अत्रेंना सांगितले की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, हि मागणी ठीक आहे. पण झाला’च’ पाहिजे असा हेकेखोरपणा का ? तो झालाच मधला ‘च’ एवढा महत्वाचा आहे का?

तेव्हा अत्रेंनी यशवंतरावांना प्रतिप्रश्न केला, तुमच्या आडनावातून ‘ च ‘ काढला तर तुम्हाला चालेल का? जर नसेल चालणार तर च महत्वाचा आहे.
(चव्हाण = व्हाण = चप्पल)

अत्रेंची हजरजबाबीपणाची अनेक उदाहरणे आहेत. अजूनही असे काही किस्से तुम्हाला वाचायला मिळतील.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.