Take a fresh look at your lifestyle.

पंजाबच्या भावी मुख्यमंत्र्यांचा थक्क करणारा प्रवास

निवडणुकीच्या आधी आपने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून खासदार भगवंत सिंह मान यांच्या नावाची घोषणा केली होती.

0

दिल्लीनंतर आता आम आदमी पक्षाचे सरकार आणखी एका राज्यात येणार आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत आपने काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल यांना मागे टाकत बाजी मारली.

निवडणुकीच्या आधी आपने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून खासदार भगवंत सिंह मान यांच्या नावाची घोषणा केली होती.

जाणून घेऊयात कोण आहेत भगवंत मान. आता लवकरच ते राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतील.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये मुख्यमंत्री कोण असावा यासाठी जनतेतूनच कौल घेतला होता. खासदार भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीसाठी लोकांनी पसंती दर्शविली होती.

एक विनोदी कलाकार ते मुख्यमंत्री असा मान यांचा प्रवास झालाय.

घरचे भगवंत यांना जुगनू या नावाने हाक मारतात. भगवंत मान हे एक विनोदी कलाकार म्हणून लोकप्रिय आहेत.

भगवंत मान यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९७३ रोजी पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील सतोज गावात झाला. त्यांचे वडील महिंदर सिंग सरकारी शिक्षक होते आणि आणि आई हरपालकौर गृहिणी आहे. बारावीनंतर त्यांनी बीकॉमसाठी प्रवेश घेतला होता.

पण कॉमेडीच्या कामांमध्ये व्यग्र असल्यानं त्यांनी शिक्षण मध्येच सोडलं.

पदवीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर भगवंत मान कॉमेडीच्या क्षेत्रात आले. संगरुरच्या सुनाम शहीद उधम सिंह कॉलेजमध्ये शिक्षण घेताना त्यांनी कॉमेडी आणि कवितेच्या अनेक स्पर्धा जिंकल्या. तसंच ते व्यावसायिक कॉमेडियनही बनले. भगवंत मान यांनी 1994 ते 2015 पर्यंत 13 पंजाबी आणि हिंदी चित्रपटांसह जाहिरातींमध्ये काम केलं.

२०१४ साली आपमध्ये दाखल होण्याआधी ते पिपल्स पार्टी ऑफ पंजाबमध्ये होते. २०१२ साली त्यांनी या पक्षाच्या झेंड्याखाली निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि नंतर आम आदमी पक्षात गेले.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संगरुर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते सुखदेव सिंग धिंडसा यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. मान यांच्यावर मे २०१७ मध्ये पंजाब प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

२०१७ साली त्यांनी विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला. २०१९मध्ये संगरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी आपच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि २ लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला.

पंजाबच्या राजकारणात येण्या अगोदर भगवंत मान यांनी आपलं संपूर्ण कुटुंबं सोडलं आहे. ४८ वर्षीय भगवंत मान यांचा २०१५ मध्ये घटस्फोट झाला आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून ते परदेशात राहतात. मुलांशी देखील मान यांचा फारसा संपर्क नसल्याची माहिती समोर आली आहे.

पण जवळपास एका दशकाच्या राजकीय करिअरमध्ये भगवंत मान यांच्यावर लागलेला सर्वांत मोठा आरोप म्हणजे ते दारु पित असल्याचा आरोप.

आपचे बंडखोर नेते योगेंद्र यादव यांनी 2015 मध्ये असं वक्तव्य केलं होतं की, जुलै 2014 मध्ये खासदारांची एक बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी भगवंत मान माझ्या जवळ बसलेले होते, तेव्हा दारुचा वास येत होता. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही नंतर माध्यमांमध्ये भगवंत मान यांच्यावर दारुचं व्यसन असल्याचा आरोप केला होता.

भगवंत मान आणि त्यांच्या समर्थकांनी दारुचं प्रकरण म्हणजे अकाली-भाजपा आणि काँग्रेसकडून खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.पंजाबमध्येही भगवंत मान यांचे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांचे व्हीडिओ ते दारुच्या नशेत असल्याचं सांगत व्हायरल झाले आहेत.

मात्र, हा कारस्थानाचा भाग असल्याचा दावा मान आणि त्यांच्या समर्थकांकडून वारंवार करण्यात आला आहे. २० जानेवारी, २०१९ ला भगवंत मान यांनी बरनालामध्ये एका सभेमध्ये त्यांच्या आईच्या उपस्थित शपथ घेतली होती. १ जानेवारी २०१९ पासून दारुला स्पर्श न करण्याची शपथ त्यांनी घेतली होती.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.