संघर्षाला सामोरे जात विजयाची जिद्द तेवत ठेवणारे लढवय्ये ‘दादा
- प्रदीप नणंदकर
जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत वाट्याला संघर्ष आणि संघर्षच आला मात्र संकटाला घाबरून न जाता त्याच्यावर मात करत समाजासमोर एक वेगळा आदर्श आपल्या जीवनातून निर्माण करणारा नीतिवान चारित्र्यसंपन्न, निष्कलंक, निर्लेप राजकारणी म्हणून डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (दादा) यांची ओळख महाराष्ट्रभर कायम राहील. इतिहासाला त्यांच्या संघर्षाची नोंद घ्यावीच लागेल.
सहा महिन्याचे असताना वडीलांचे छत्र हरपले अन् जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात कोरोनासारख्या महामारीचे संकट अंगावर आल्यावर त्याच्याशी दोन हात करून त्यांनी त्यावरही विजय मिळवला होता मात्र काळाने त्यांच्यावर घातला घातला.
निलंगा हे निजामशाही राजवटीतील तालुक्याचे गाव. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वडील भाऊराव हे निलंगा येथील त्याकाळातील प्रगतशील शेतकरी. निलंगा लगतच्या नणंद या गावातील वत्सलाबाई बोळे यांच्याशी भाऊरावांचा विवाह झाला. ९ नेब्रुवारी १९३१ रोजी शिवाजीरावांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मानंतर ते सहा महिन्याचे असतानाच त्यांचे पितृछत्र अकाली हरपले.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला मात्र आई वत्सलाबाईंनी आपल्या शिवाजीला शिकवून शहाणे करायचे असा निश्चत केला व शेतीबाडीची देखरेख स्वत:कडे घेत मुलाचे संगोपन करत सातवीपर्यंत निलंगा येथे शिक्षण दिले. आठवीला नूतन विद्यालय गुलबर्गा या राष्ट्रीय शाळेत प्रवेश दिला. निजाम राजवटीत शिक्षणाचे माध्यम उर्दू होते मात्र राष्ट्रीय शाळेत इंग्रजी उर्दू भाषेसोबत हिंदी व मराठी विषयही शिकवले जात होते.
शाळेतील भाऊसाहेब देऊळगावकर गुरुजी यांची छाप त्यांच्यावर कायमची राहिली. १९४८ साली ते दहावी उत्तीर्ण झाले. १९४७ ते ४८ या कालावधीत त्यांनी आंध्र, महाराष्ट्र व कर्नाटक या तीन प्रांतातील तरुणांसाठी तीन संघटना स्थापन केल्या. मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्याला यश आल्यानंतर उच्चशिक्षणासाठी ते हैद्राबादला गेले. त्याकाळात एकुलत्या एका मुलाला शिक्षणासाठी दूर पाठवणे हे अतिशय अडचणीचे होते मात्र आईने साथ दिली व ते १९४८ ते ५२ याकाळात बीए झाले. आर्य समाजाच्या चळवळीतही ते सक्रीय राहिले. १९५१ साली त्यांचा विवाह झाला. १९५३ साली ते नागपूर येथे उच्चशिक्षणासाठी गेले.
एकाच वेळी एलएलबी व एमए अशा दोन्ही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची सोय त्यावेळी होती व त्यांनी दोन्हीही पदव्या संपादन केल्या.
आर्य समाजाचे नेते शेषेराव वाघमारे हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. १९५७ साली त्यांच्या आग्रहामुळे निलंगा विधानसभेतून त्यांना काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळाली व त्यांच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षातर्फे त्यांचे आतेभाऊ श्रीपतराव साळुंखे निवडणुकीला उभे राहिले व त्यावेळी ११०० मतांनी निलंगेकरांचा पराभव झाला मात्र १९६२ पासून १९९१ पर्यंत झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव निलंगेकर सातत्याने विजयी होत राहिले.
१९८५ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ज्या विधानसभा मतदारसंघात खासदारकीच्या निवडणुकीत कमी मताधिक्य मिळाले त्या आमदारांना विधानसभेचे तिकीट दिले गेले नव्हते तेव्हा निलंगेकरांनी आपले ज्येष्ठ सुपुत्र दिलीप पाटील यांना आमदारकीचे तिकीट दिले व ते विजयी झाले. १९८५ साली ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना त्यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली. त्यानंतर त्यांच्या आमदारपुत्राने राजीनामा दिला व निलंगा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ते ७५ हजार मतांनी विजयी झाले.
१९७४ साली वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात महसूल राज्यमंत्री म्हणून शिवाजीराव निलंगेकरांना पहिल्यांदा मंत्रिमंडळात स्थान मिळाले मात्र त्यांचे ते मंत्रीपद चार महिन्याचेच राहिले. १९७५ साली झालेल्या शंकरराव चव्हाण मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही. त्यानंतर ७७ साली झालेल्या वसंतदादांच्या मंत्रिमंडळात त्यांना कॅबीनेट मंत्रीपद मिळाले. त्यानंतर बॅरिस्टर ए. आर. अंतुले व पुन्हा वसंतदादांच्या मंत्रिमंडळात त्यांना विविध खात्यांची जबाबदारी मिळाली व मिळालेल्या जबाबदारीचे त्यांनी सोने केले.
सार्वजनिक बांधकाम, विधी व न्याय खाते, पाटबंधारे विभाग अशा महत्त्वपूर्ण खात्यांचा लाभ मराठवाड्याला व्हायला हवा हा विचार डोक्यात ठेवून मराठवाड्याच्या विकासासाठी मोठ्या सिंचन प्रकल्पाची त्यांनी पायाभरणी केली व ते पूर्णत्वास नेले.
अनेक लघु पाटबंधारे प्रकल्पही त्यांनी मार्गी लावले. प्रदीर्घ काळ एखाद्या मतदारसंघाचे नेतृत्व करणे सोपे नाही. मतदारसंघातील गावे, त्या प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची नावे त्यांना मुखोद्गत शिवाय गावनिहाय प्रश्न काय आहेत हेही त्यांना पाठ असे. रस्ते, वीज, सिंचन या प्रमुख प्रश्नाबरोबरच गावातील तंटेबखेडे, आरोग्य सुविधांचे प्रश्न यात ते बारकाईने लक्ष घालत असत. सार्वजनिक विकासाच्या प्रश्नात त्यांना रस असे. आपला भाग पाण्यामुळे मागास राहतो आहे हे लक्षात घेऊन प्रारंभापासून सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला व मराठवाड्यातील एका दुर्गम भागातील मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला.
पहिल्यांदा ते मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भेटले व त्यांना निलंग्याला येण्याचे निमंत्रण दिले. त्याकाळी लातूरहून निलंग्याला जायला रस्ता नव्हता. पायी जावे लागत असे. मुख्यमंत्री आले तर किमान रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल हे डोक्यात ठेवून शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याच्या अनावरणाचे निमित्त करून त्यांनी यशवंतरावांना बोलावले होते. त्यानंतर मतदारसंघातील अनेक प्रश्न त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत मार्गी लावले.
शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी स्वतः पुढाकार घेऊन शिक्षणसंस्था काढली व त्यामार्फत शाळांचे जाळे उभे केले. डीएड, बीएड किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या बाजारूपणात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले नाही. काँग्रेसशी एकनिष्ठ असणाऱ्या निलंगेकरांनी आपल्यासमोर उभा असणारा नातेवाईक आहे याचा विचार न करता तो विरोधी विचाराचा आहे हे डोक्यात ठेवून निवडणूक लढवली.
१९९५ व २००४ या दोन निवडणुकात त्यांना पराभव पत्करावा लागला. १९९५ साली परिवर्तनाची लाट होती त्यामुळे प्रस्थापितांचा पराभव झाला. त्यात जनता दलाचे कॉ. माणिकराव जाधव यांच्याकडून त्यांचा पराभव झाला तर २००४ साली नातूच रिंगणात उभा राहिले व नातवाकडून त्यांचा पराभव झाला. मात्र २००९ साली निवडणुकीत त्यांनी नातवाचा पराभव केला. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळात महसूलमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सार्वजनिक जीवनात ते सक्रीय राहिले.
खासदारकीची संधी स्वत:ला मिळत असतानाही त्यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांना खासदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केला. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली व ती शेवटपर्यंत पाळली. राज्यातील विविध विरोधी पक्षातील नेतेही त्यांच्या निर्व्यसनी, निरपेक्ष व निष्ठावान राजकारणाचे कायम कौतुक करतात.
राजकारणात अशी माणसे विरळच असतात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रडत न बसता सतत संघर्षाला सामोरे जात विजयाची जिद्द तेवत ठेवत काम करणारे नेतृत्व म्हणून शिवाजीराव निलंगेकरांची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात कायम राहील. राजकारणातील या दादाला मन:पूर्वक प्रणाम.
- प्रदीप नणंदकर, लातूर
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम