भेट (कथा)
उन तसं रणरणत च होतं. तरी तिची पावलं थांबलेली नव्हती. लाईट कलरची जीन्स, पांढऱ्या रंगाचा मनगटापर्यंत बाह्या असलेला टी शर्ट, पुण्याच्या सवयीनुसार स्कार्फ घालुन पॅक केलेला चेहरा, एरवी मोकळे सोडलेले पण आता उन्हाचा त्रास होवु नये म्हणुन घट्ट बांधलेले लांबसडक केस, डोळ्यांना त्रास होवु नये घातलेला गॉगल, कितीही टोचत असले तरी पाय उन्हाने पोळु नये म्हणून घातलेले शुज असा जामजिमा करुन ती आली होती. चला आता हा आता चौक आला. याच्या पुढे अर्धा किलोमीटर मीटर दुतर्फा लागलेल्या झाडीच्या रस्त्या वरुन चालत गेलं की लगेच एक वळण येईल. त्या वळणाला पार केलं की समोर च ती उभी असेल! कशी असेल ती आता ? कशी दिसत असेल? शेवटचं तिला पाहुन ही १० – १२ वर्षे झाली असतील. खुप वेळा वाटायचं जावुन भेटावं, तिच्याशी बोलावं, सावलीत बसुन गप्पा माराव्यात पण कधी हिम्मत नाही झाली. तिला सोडताना चा प्रसंग आठवला तरी अजुन ही काळजात चरा पडतो. भांडणे, राग, द्वेष, चीड, अपमान या सगळ्या भावनांचं मिश्रण मनात दाटुन येतं. भुतकाळातल्या आठवणींच्या चवीने क्षणभर तिची जीभ कडवट झाली. ती तसल्या रणरणत्या उन्हात ‘ती’ च्या कडे जाणाऱ्या रस्त्यावर थबकली. जावं की न जावं?? पण तसल्या उन्हात भर रस्त्यात थांबणं शक्य नव्हतं. इतकं मोठं अंतर पार केल्यावर आता थोडक्यासाठी तिला चुकवणं शक्य नव्हतं. हा भ्याडपणा ठरला असता. ती तशीच चालत राहिली.
ऱस्ता निस्तब्ध होता, उन्हामुळे सगळ्या वातावरणावर एक प्रकारची मरगळ आली होती. सगळ्यात प्रसिद्ध चौक असुन ही माणसांची वर्दळ कमी होती तिथे. तिने नेहमीचं वळण पार केलं आणि सावकाश पावले उचलत शेवटी एकदाची ती तिच्यासमोर येवुन उभी राहिली! उन्ह अंगावर घेवुन उभ्या राहिलेल्या “ति”ला पाहुन मनात काय भावना येवुन गेल्या हे तिची तिला ही कळल नाही. किती विसंगत दृश्य होतं ते. भर दुपारचं उन्हाळी उन, रस्त्यांवर कुणी चिटपाखरु नाही, माणसे आपापल्या घरात पंखे बिंखे लावुन आमरसाच्या मेजवान्या झोडत बसलेली अशा वातावरणात अनेक वर्षापुर्वी सोडुन गेलेल्या रस्त्यावरुन पुन्हा चालत आलेली एक मुलगी आणि तिच्यासमोर उभी असलेली भली थोरली भव्य अशी वास्तु!
अभावितपणे तिच्या तोंडुन शब्द बाहेर पडले शाळा!
शब्द फक्त ओठातुन बाहेर नव्हते आले. तिच्या हृदयात कधी पासुन लपवुन ठेवलेल्या भावनांचा उमाळा होता तो. तिच्या ही नकळत तिचे ओठ थरथरले. नाकाचा शेंडा लाल झाला, गळ्यात आवंढा दाटुन आला, पाणी पापण्याच्या बाहेर येवु नये म्हणुन आटोकाट प्रयत्न करणारी ती तशीच चालत गेट मधुन आत गेली. अनेक वर्षापूर्वी चढलेल्या त्याच प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांपाशी येवुन थांबली. सगळं तेच, तसचं आहे, तीच भली थोरली वास्तू, त्याच त्या प्रचंड मोठ्या अर्धचंद्राकृती खिडक्या, तो रंग, ती झाडे, त्या पायऱ्यांचा स्पर्श, लहानपणी शाळेत मुद्दाम लवकर येवुन याच पायऱ्यावर बसलेली असायची ती. समोरच्या पटांगणात मुली मुले खेळत असलेले खेळ बघत. अचानकपणे काळाचा पडदा पाठिमागे गेला. मोकळं उदास असलेलं प्रांगण एकदम किलबिलाटाने भरुन गेलं, शिवणापाणी, नदी का डोंगर, बिस्टेल, चिपळ्या, क्रिकेट च्या नादाने त्या सगळ्या पटांगणाला लय आली.
“आउटेय” , “अमल्या चिडु
नक्को”, “किरण्या कॅच !!” , “जा कडकडनं”, “ईईई टुकार कारटी बॉल लागला
मला”, “ए पकड, किर्ते पळ ,
प्रिया चिडीची बात नश्शे!”
या आणि अशा अनेक आवाजांचा गलका सुरु झाला, अचानक “ओये पकड तिला डाव जावु देवु नक्को” असा आवाज तिच्या कानावर आला. पायऱ्यांजवळ पाठमोरी उभी असलेली ती तिने एका तंद्रीत पळण्याचा पवित्रा घेवुन गर्रर्रकन मागे वळुन पाहिले…….
सगळं प्रांगण उन्हात शांत उभं होतं, ना कुणी माणुस, ना मुले, ना कसले खेळ! कोलाहल तर फक्त आठवणींचा होता. मघाशी कसबसं पापण्याआड दडवलेलं पाणी सुसाट वाहु लागलं. पायातलं त्राण कोसळुन ती त्या पायऱ्यांवर बसली. गॉगल , स्कार्फ काढुन टाकला. ऱडले तरी आता इथे कोण आहे बघायला अस तिने मनाचं समाधान करु घेतलं. कुलुप असल्याने आतमधले वर्ग तर पाहता येणार नव्हते तिला पण आठवणींच्या कप्प्यात साठवलेला हर एक वर्ग तिच्या डोळ्यासमोर फिरत राहिला. हर एका वर्गाच्या आणि त्याच्या बरोबर घालवलेल्या वर्षांच्या आठवणींचा पाऊस तिच्या डोळ्यातुन भर उन्हात त्या वास्तुमधे कोसळला, हमसाहमशी कोसळत राहिला. इतक्या वर्षांचं दु:ख, इतक्या वर्षाच्या वेदना, इतक्या वर्षाचे सल घेवुन चाललेली वाट पुन्हा तिला त्याच वास्तुपाशी घेवुन आली जिला भेटण्याची तिची इच्छा नव्हती. त्यासाठीच तर मुद्दामहून कुणी नसतानाची वेळ निवडली होती ना. कुणाचं तोंड बघायला नको, कुणाला आपलं तोंड दाखवायला नको, मग काय करतेस झालं का शिक्षण , नोकरी, करिअर, लग्न, मुलबाळं, घर, बंगला, गाडी, प्रमोशन अशा रेल्वेसारख्या लांबलचक प्रश्नांची सरबत्ती झेलणं ही नको. काय केलं आपण शाळेसाठी? असताना ही कधी अभ्यास करुन मेऱीट बिरीट मधे यायला जमलं नाही आणि तिचा हात सोडल्यावर ही आयुष्याच्या मेऱीट मधे अजुन स्वत:ला प्रूव्ह करु शकलो नाही!
तिच्या विचारात पायरीवर अंग टाकुन आधाराला असलेल्या हातावर डोके ठेवून ती विचार करत बसली होती. किती वेळ गेला हे तिलाही समजलं नाही इतक्यात उन्हाच्या पाऱ्यात अचानक गार वाऱ्याच्या झुळका तिच्या चेहऱ्यावर आलेल्या बटा हलवुन गेल्या. तिने आश्चर्याने मान उंचावुन आजूबाजूला पाहिलं. इतक्या उन्हाचा हा गार वारा कुठुन आला?
” बाळा कडवट आठवणी माणसे देतात, वास्तु नाही आणि परिक्षा फक्त शाळेतल्या मार्कांची गोळाबेरीज नसते, आयुष्याच्या संघर्षात माणुस म्हणुन उभं राहण्याची मरेपर्यंत चालणारी प्रक्रिया असते ती! तिथे भल्याभल्यांचं मेरिट कोलमडतं. बाकी कुणाला असो वा नसो मला तुझा अभिमान नक्की वाटतो पोरी! माझ्या पंखाखालुन शिकुन गेलेल्या हर एका पाखराचा मला अभिमान वाटतो! माझ्यावर राग धरु नको!”
वाऱ्याच्या झुळुकीमधुन वास्तुने तिच्यासाठी बोललेले ते शब्द ऐकुन रणरणत्या उन्हात कुणाला न सांगता भेटायला आल्याचं सार्थक वाटलं तिला. अश्रू ओघळुन सुकलेल्या डोळ्यात पहिल्यांदा चमक आली. इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा कुठली तरी जिव्हाळ्याची तार त्या वास्तुबद्दल तिच्या मनात छेडली. ती उठली. शाळेच्या खडबडीत भिंतीवरुन प्रेमाने हात फिरवला. इतकी वर्षे तिला टाळल्याबद्दल मनोमन तिची माफी मागितली आणि तिच्या वस्तु उचलुन जायला निघाली.
शाळेच्या
गेटमधुन बाहेर जाण्यापुर्वी एकदा तिला डोळे भरुन पाहावं म्हणून थांबली ती. वास्तु
कडे पाहताना अपरिहार्यपणे नजर ओली होतच होती. डोळे पुसुन ती जायला निघणार इतक्यात
गेटजवळ लावलेल्या गुलमोहराच्या झाडावरचं फुल टपकन तिच्या खांद्यावर पडलं. वास्तुने
दिलेला आशीर्वाद होता तो!
– अंजली झरकर
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम