Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सिनेमातील न्वार

0

‘मनोरमा सिक्स फीट अंडर’ पाहिलाय? काहींनी असेलही पण बहुतांश लोकांना तो ठाऊक नाही. त्यामागं कारणं बरीचं असू शकतील पण तो फार अंडर रेटेड आहे हे नक्की. हा चित्रपट बऱ्याच कारणामुळे एका विशिष्ट वर्गाने का होईना पण पहिला.. अभय देओल किती उत्तम अभिनेता आहे हे या निमित्तानं कळलं. अर्थात त्याचंही  B Town मध्ये फारसं काही झालं नाही. कथा- पटकथा, संकलन – दिग्दर्शन अशा जवळपास सगळ्याच बाजूंवर हा सिनेमा बऱ्यापैकी उजवा होता हे एक त्यामागचं कारण आहेच पण अजुन एक कारण होतं ते म्हणजे सिनेमाचा जॉनर.. ‘ निओ न्वार..’..!

मनोरमा च्या आधी निओ न्वार फिल्म्स झाल्या नव्हत्या का असा सवाल येणं साहजिक आहे त्याचं उत्तरही नकारार्थी नाही पण त्या ठळकपणे निओ न्वार म्हणाव्यात अशा होत्या का हा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे.  हा मुद्दा विचारात घेण्यासाठी मुळात न्वार आणि निओ न्वार म्हणजे काय हे देखील लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

न्वार किंवा सिनेमॅटिक लिंगो मध्ये असणारा फिल्म न्वार हा शब्द मुळात फ्रेंच भाषेची देणगी  आहे. न्वार (Noir)  या शब्दाचा अर्थ होतो गडद काळा.. इंग्रजीमध्ये डार्क नेस .. ज्यामध्ये नायक आणि खलनायक यांची रचना ही उघड उघडपणे कळण्यासरखी, भडक आणि गुन्हेगारी स्वभावाच्या सगळ्या कांगोऱ्यातून फिरणारी अशी असते.  सरळ साध्या भाषेत चांगल्या वाईटाचा उघड संघर्ष असतो. पांढरा- काळा रंग या माध्यमातून..

ही संज्ञा मुळात अमेरिकन चित्रपटांसाठी तयार करण्यात आली. १९४० ते १९६० च्या दशकातल्या अमेरिकन सिनेमावर जर्मन – इटालियन विचारपद्धती असेल किंवा मग गुन्हेगारी जगाचा प्रभाव प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसत होता. मुळात कृष्णधवल (B&W) असणाऱ्या सिनेमातून पांढऱ्या काळ्याचा संघर्ष अधिक स्पष्टपणे दाखवता येत होता.  म्हणूनच न्वार ही संकल्पना फक्त कृष्ण धवल चित्रपटांच्या संदर्भात आहे असं बरेच चित्रपट अभ्यासक म्हणतात. १९४६ च्या सालात प्रसिद्ध फ्रेंच चित्रपट समीक्षक निनो फ्रॅंक आणि त्याचा सहकारीजिन पेरी चर्तीअर या दोघांनी एका फ्रेंच चित्रपट विषयक मासिकात (L’écran français ) दोन लेख छापले. याच लेखात फ्रॅंक यांनी न्वार ही संज्ञा पहिल्यांदा वापरली. न्वार या संज्ञेची उकल करताना फ्रॅंक हा जॉनर म्हणजे ‘A new police genre with the criminal adventure’ असं म्हणतात. खरं पाहता ही उकल आजतरी अर्धी किंवा अपूर्ण वाटते. पण त्याकाळचे चित्रपट बघता या विधनामागच तथ्य लक्षात येतं.

त्याकाळचे फक्त अमेरिकन असं नाही पण युरोपियन सिनेमावर सुद्धा पोलिस जॉनर प्रभाव होता. या सिनेमांची रचना ढोबळमानाने, एक नायक जो एक तर गुप्तहेर असेल किंवा सध्या वेशातला पोलीस किंवा मग एक सरळ साधा पण हुशार असा नागरिक जो कुठल्यातरी गुन्ह्याच्या कचाट्यात सापडलाय. या नायकाबरोबर एक मादक क्रीडा करणारी ललना आणि उघड पने लक्षात यावा असा खलनायक अशी असायची. त्यामुळे न्वार ला समजावताना फ्रॅंक वरचं विधान करतात. पण गंमत अशी की त्याचं लेखात ते एक भविष्यही वर्तवतात की हा जो काही पोलिसी किंवा गुप्तहेर चित्रपटाचा गुन्हेगारी जगाशी असलेला मेळ न्वार मध्ये फार काळ टिकणार नाही. (These “dark” films, these films noirs, no longer have anything in common with the ordinary run of detective movies”). आज जवळपास ७० वर्षानंतर हे विधान  काळाच्या किती पुढे होतं याची प्रचिती येते. न्वार ही अमेरिकन चित्रपटांच्या बाबतीत वापरली जाणारी संज्ञा असली तरी काही अभ्यासक मात्र फ्रेंच चित्रपटांना त्यामागची प्रेरणा म्हणातात. १९३८ सलाचे काही चित्रपट , Quai des brumes (1937) , La Bête humaine (1938)  हेच होय. पण त्यावर अजुन अभ्यास होणं गरजेचं आहे. १९४६ ला न्वार समोर आलं असलं तरीही तात्कालिक अमेरिकन दिग्दर्शक , समीक्षक यांनी तो आपलासा केला नव्हता. त्यावेळी न्वार प्रकारातल्या सिनेमांना सुद्धा ‘ मेलोड्रामा ‘ याच एका संज्ञेत समजलं जातं असे. न्वार सर्वमान्य व्हायला ७० च दशकं यावं लागलं. तो पर्यंत न्वार भारतात पाय घट्ट करू लागला होता.

निओ न्वार ( Neo Noir) खरतर न्वार चीच पुढची पायरी. फ्रॅंक ने वर्तवल्या नुसार इथे न्वार च रूप बदललं. त्याच्या टिपिकल रचानेपासून वेगळं झालं.  निओ न्वार हा शब्द सुद्धा फ्रेंच मधलाच शब्द आहे. निओ म्हणजे नवीन. न्वार मधला नवीन प्रकार किंवा न्वार मधलं नवीन रचना. आजच्या बहुतांश क्राईम जॉनर चित्रपटांवर याच रचनेचा कमी अधिक प्रमाणात प्रभाव जाणवतो. न्वार हा उघडउघड अन् भडक असल्यामुळे तो कृष्णधवल काळातच संपुष्टात आला आणि तसं अधिकृत रीत्या अभ्यासक समीक्षक मान्यही करतात. पण मग रंगीत सिनेमात न्वार हा कसा असेल याचं उत्तर म्हणजे निओ न्वार होय.

ही संकल्पना सुद्धा फ्रॅंक च्या न्वार वर अधिक विश्लेषण करतानाच निर्माण झालेली आहे. न्वारच्या निर्मिती नंतरच्या अवघ्या दशकात निओ न्वार माहीत झालं. १९५५ मध्ये पुन्हा एका फ्रेंच अभ्यासक समीक्षक असलेल्या ‘रेमंड बोर्ड यांनी निओ न्वार  या संज्ञेला पहिल्यांदा वापरलं. या रचनेत नायक – खलनायक अशी नक्की अशी रचना निदान शेवटपर्यंत तरी निश्चित करता येत नाही. किंबहुना ती धक्कातंत्र वापरून सतत वाहती ठेवली जाते. त्यामुळे यात संगीत आणि छायाचित्रण हा प्रामुख्याने महत्त्वाचा भाग असतो. न्वार मध्ये हा भार जरा जास्त प्रकाश रचनेवर असतो. तांत्रिक बाजूंनी पाहिलं तर न्वार किंवा निओ न्वार काही भागात विभागल जाऊ शकतं – टेक्निकल म्हणजे तांत्रिक आणि सिंबोलिक म्हणजे सांकेतिक.

तांत्रिक बाजुंमध्ये कॅमेरा, त्याची रचना , फ्रेम्स लावण्याची पद्धत, अँग्लस, दृष्याची लांबी ( shot duration), ध्वनी रचना, संकलन अशा अनेक तांत्रिक बाजू येतात. त्याचा विचार केला जातो. या उलट सांकेतिक घटकांचा किंवा बाजूचा विचार जरा व्यापक पातळीवर होतो. यात सिनेमाचं दृश्य माध्यम हे कृष्णधवल आहे का रंगीत हा महत्त्वाचा मुद्दा राहतो. उरलेले घटक सुद्धा याचं मुद्द्यापशी घुटमळत राहतात. सिनेमाची पटकथा आणि त्याची रचना, अभिनय करणाऱ्यांची क्षमता त्याचं सादरीकरण, नेपथ्य या गोष्टी इथे विचारात घेतल्या जातात.

प्रकारच्या दृ्ष्टीकोनातून विचार केला तर न्वार चे दोनच प्रकार आहेत,  एक म्हणजे ‘क्लासिक न्वार ‘ (१९४० ते १९६० हा  कृष्णधवल सिनेमाचा काळ. खरं न्वार याचं  दशकात संपलं असं मानलं जातं.) आणि दुसरं  निओ न्वार. पण भारतीय चित्रपटांच्या बाबतीत मात्र  तीन प्रकार पडतात. क्लासिक आणि निओ हे आहेच पण ट्रान्स  न्वार  हा प्रकार वाढतो.  हे प्रकार काळानुसार सुद्धा विभागले जाऊ शकतात.

उदाहरादाखल १९५० ते १९७० हा कृष्णधवल सिनेमाचा काळ हा क्लासिक न्वार, १९७१ ते १९९० चा काळ हा ट्रान्स न्वार तर १९९० ते आजपर्यंतचा काळ म्हणजे निओ न्वार म्हणून ओळखला जातो. कृष्णधवल सिनेमा हाच न्वारचा  एलिमेंट आहे हे आपण जाणतो. परिणामी १९७० पर्यंतचा काळ हा क्लासिक मध्ये मोडतो. त्यानंतरच्या काळात सिनेमात आणि प्रत्यक्षात बरीच स्थित्यंतरे झाली. भारत- पाकिस्तान युद्ध असेल, बांगलादेश जन्म असेल, आणीबाणी असेल किंवा मग देशांतर्गत असणाऱ्या समस्या असतील, या सगळ्याचा प्रभाव सिनेमावर दिसू लागला. त्यातूनच ट्रान्स  न्वार जन्माला आलं.  ट्रान्स न्वार  हा निओ न्वार चा पूर्वार्ध आहे असं मान्य करण्यास हरकत नाही. कारण हेच रूप पुढे विस्तारत गेलं.  १९९० नंतरचा काळ हा खऱ्या अर्थानं कात टाकणारा असा होता. जागतिकीकरण अगदी उंबरठ्यावर होतं.  तांत्रिक गोष्टी बरोबर कथे पटकथेवर सुद्धा प्रयोग होत होते. फ्रॅंक च भविष्य या काळात खरं ठरायला गती मिळाली.

न्वार बघताना काही महत्त्वाची लक्षणं दिसतात किंवा मग ती लक्षणं असतील तर न्वार ओळखायला सोपं जातं. काही ठळक वैशिष्ट्य जी सुरुवातीच्या काळातच सांगितली गेली आणि ती तंतोतंत तशी वापरी सुद्धा गेली. क्लासिक न्वार पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की कथेतला भाग हा एक स्वप्नवत असतो अन् अचानक सत्यात रूपांतर होतो.  या लक्षणाला ONIERIC अर्थात स्वप्नवत अवस्था असं म्हटलं जातं. विजय आनंदाचा `कालाबाझार’ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. विशेषतः अल्का ( नायिका) जेव्हा रघुवीर ( नायक) ला सिनेमा थेटर मध्ये भेटते ते दृश्य.  त्यानंतर विचित्र पद्धतीचं कथानकं किंवा मग पात्रांच्या स्वभावातला विचित्रपणा (strange) सुद्धा एक लक्षण आहे. उदाहरणारासाठी हाऊस नं.४४ हा चित्रपट पाहिला तर आपल्या लक्षात येतं की अशोक(नायक) हा गुन्हेगारी जगातला नामचीन असूनही फक्त निमों( नायिका) साठी सगळं सोडतो हे भारतीय चित्रपटात सहज होत असलं तरी विचित्र नाही का? किंवा नंतर केवळ कुठलही काम मिळत नाही म्हणून परत त्या जगात जाणं हे देखील विचित्र आहेच. तिसरं लक्षण हे कामुकता किंवा लैंगिक उत्तान पणाच असतं. अभ्यास केल्यास आपल्याला या फिल्म्स मध्ये पुरुष आणि स्त्री या दोन्हींत कामुकता किंवा स्वैर सुखाची भावना आढळून येऊ शकते.  या मागची कारणं कधी खासगी तर कधी व्यावसायिक असू शकतात. वर म्हटल्या प्रमाणे मनोरमा मध्ये रायमा सेनच पात्र हे असाच आहे. Sexually overtone. न्वार मध्ये एरोटिझम ला महत्त्वाचा भाग मानला जातो. त्याचबरोबर क्रूरता हे देखील एक लक्षण आहे अर्थात ते स्वाभाविक सुद्धा आहे.

१९७० च्या नंतर सिनेमात बरेच बदल होऊ लागले. कृष्णधवल सिनेमा जवळपास पूर्णपणे रंगीत झाला. कथेमध्ये जुने टिपिकल विषय नवीन रचनेतून दर्शवू लागले. सभोवतालच्या परिस्थितीचा संदर्भ सिनेमा देऊ लागला. क्लासिक न्वार हा b&w  रचनेतून सिनेमा बरोबर संपला पण मग जे काही रंगीत सिनेमा बरोबर आलं त्याला ट्रान्स न्वार म्हटलं गेलं.  यात निओ न्वार ची सुरुवात होती हे देखील सत्य आहे. त्या काळात प्रसिद्ध झालेली अँग्री यंग मॅन थेअरी सुद्धा याचं रचनेचा भाग होती. प्रकाश मेहतांचा जंजीर असेल किंवा यश चोप्रांनी केलेले दीवार किंवा त्रिशूल असतील क्राईम जॉनर ला दिलेली वेगळी हाताळणी मुळे अमर झाले. या काळात अंडरवर्ल्ड चं वाढत प्रस्थ हा सिनेमाचा गाभा होता. बऱ्याच कथा या मुंबईच्या पार्श्वभूमीवर घडत असतं. यातूनच अजुन एका सब – जॉनर चा  जन्म झाला –  ‘मुंबई न्वार.  हा मुळात colonial genre आहे. वसाहतींमधील आयुष्य, त्या भोवती घडणारं नाट्य हा याचा  गाभा आहे. अर्थात ते फक्त मुंबईपुरतच मर्यादित नाही तर मग कुठल्याही शहराच्या पार्श्वभूमीवर उमटणार आहे. 

१९९० च्या दशकात मात्र सिनेमा बदलला. आतून बाहेरून सगळीकडून..विधू विनोद चोप्राचा ‘परिंदा’ ही या बदलांची सुरुवात मानली जाते. परींदा मधाला नायक हा परदेशात शिकलेला, सुसंस्कृत असूनही गॅंग जॉईन करतो. हेच मुळात विचित्र किंवा strange आहेच पण सिनेमाला दिलेली ट्रीटमेंट सुद्धा विशेष आहे. छायाचित्रण किंवा ध्वनी – संगीत या बाबी सुद्धा प्रचंड प्रभावित करणाऱ्या आहेत. काळाच्या प्रवासात आणि  च्या प्रवासात सत्या, रामू वर्मा, अनुराग कश्यप , श्रीराम राघवन ही नावं अशी आहेत ज्यांना आपण घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. १९९९ चा सत्या हे खऱ्या अर्थानं क्लासिक न्वारचं पुनरागमन होतं.  कथा – पटकथा – दिग्दर्शन सगळ्याच बाजून प्रयोगशील आणि नव्या धारेच होतं. इथून खरं भारतीय निओ न्वार ची पिढी सुरू झाली. त्यांनतर काही वर्षांनी आलेला राकेश मेहरा यांचा अक्स सुद्धा न्वार मधल्या प्रयोगाचं उत्तम उदाहरण आहे. रघु नावाच्या क्रिमिनल माणसाची कथा यात हॉलिवूड सारख्याच स्टाईल मध्ये अगदी exotic अशा जागांवर घडते. भारतीय चित्रपटात हे नवीन होतं. त्यातला मनोज वाजपेयी चा अभिनय ही सुद्धा जमेची बाजू होती.  २१ व्या शतकातला हा पहिला न्वार पण खऱ्या  अर्थानं परिपूर्ण नाही. तो मान श्रीराम राघवन च्या एक हसीना थी (२००४) ला जातो. श्रीराम च्या आधीच्या दिग्दर्शकांनी अपवाद वगळता न्वार चा वापर  हा अजाणतेपणी केला अशी मान्यता आहे मात्र श्रीराम तो जाणूनबुजून करतो. वर उल्लेख आलेली सगळी लक्षणं तो त्याच्या सिनेमात वापरतो. एक हसीना थी असेल किंवा मग अगदी अलीकडचा बदलापूर.. त्याला ह्या जॉनर ची नस कळली आहे. त्याच्या उल्लेखाशिवाय भारतातली न्वार अपूर्ण आहे.

जसं जसं दशकं पुढे सरकू लागली तसं तसं न्वार अजुन थोडं कात टाकू लागला. सामन्यात: निओ न्वार सुद्धा क्राईम याच जॉनर शी संपूर्ण पणे  जोडला जातो पण त्यात पूर्णपणे सत्य नाही. मुळात अगदी न्वार म्हणजे डार्क इथपासूनच त्यात गडबड आहे. डार्क फिल्म्स फक्त क्राईम शी निगडित असतात का? नाही हेच उत्तरं आहे. त्यामुळे समीक्षक किंवा अभ्यासकांनी केलेली ही गडबड आहे. दुसऱ्या दशकात हे सत्य समोर आणणारे अनेक सिनेमे आले. काही सायकोलोजिकल थ्रिलर असतील तर काही क्राईम जॉनर ची छटा असणारे असे आले  पण त्यांच्या रचांनाचा अभ्यास केला तर मात्र ते न्वार च असल्याचं आपल्या लक्षात येतं. त्या अनेकांपैकी लक्षात राहतो तो प्रवल रमणचा ४०४ .. खरं सायकोलोजीकल थ्रिलर म्हणून गणाला गेलेला हा सिनेमा मुळात रचनेच्या स्थरावर निओ न्वार आहे. कथा पटकथेची मांडणी असेल किंवा मग पात्रांची रचना असेल, त्यांचा ग्रे शेड वरचं लाक्षणिक प्रभाव किंवा मग धक्का तंत्राचा वापर सगळं मुळ न्वार सारखाच.  त्यामुळे त्याला किंवा त्या टाईप्स च्या सिनेमांना न्वार न म्हणणं चूक ठरतं असं प्रस्तुत  लेखकाचं प्रांजळ मत आहे.

वर आलेली उदाहरणे ही फक्त हिंदी भाषेतली आहेत कारण ती जवळपास संपूर्ण देशात पहिली जातात. याचा अर्थ प्रादेशिक सिनेमात न्वार रुजला नाही असं म्हणणं चूक ठरेल. आपण मराठी पुरता तरी विचार केला तर त्यात बरेच सिनेमे सापडतील. आता पुरता उदाहरणादाखल निखिल महाजन दिग्दर्शित ‘पुणे ५२ हा सिनेमा घ्यायला हरकत नाही. तोही थोडा हार्ड न्वार आहेच पण मराठीतल्या उत्कृष्ट न्वार सिनेमांपैकी  एक आहे हे महत्त्वाचं. त्यात असणाऱ्या प्रत्येक पात्राला ग्रे रंगाची धार आहे. कथा देखील तशीच आडमार्गी  फिरते. त्यानंतर फार प्रसिद्ध नसलेला पण बरा चित्रपट असा ‘ रोशन विला सुद्धा न्वारची झलक दाखवतो.

आता पर्यंतच्या प्रवासात न्वार अनेक अंगांनी बदलला, वाढला. भविष्यात अजून नवीन रुपात येईल सुद्धा. पण आज ‘मनोरमा’ च्या निमित्ताने न्वार ची झालेली उकल कदाचित सिनेमाप्रेमी लोकांना सिनेमाच्या अजुन जवळ जाण्यास मदत करेल हे नक्की.

  • अनिरुद्ध प्रभू –

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.