खरंच… बच्चु आहेस तु !
बच्चु… नाव ऐकलं तर वेगळंच काहीसं. पण नावाप्रमाणे खरंच लहान मुलासारखं प्रेमळ, स्वच्छ आणि निर्मळ मन. लहान मुलांना खोटारडेपणा, अन्याय, लबाडी अन् चोरी कधीच खपत नाही. तडकाफडकी बोलुन मोकळं होणं. लयच डोक्यावरुन चाललं तर एखादी मुस्काडात लगावणं हेच त्याच कौशल्य. अगदी याच प्रमाणे बच्चु तुझा स्वभाव.
लहानपणापासूनच चळवळीतला तु
अन्याय हा तर तुझ्या मस्तकातला किडा. अन्याय करायचा नाही अन् खपवुन तर मुळीच घ्यायचा नाही ही प्रेरणा तुझ्यामुळेच मिळाली. महाराष्ट्रातील अंधाचे डोळे तर अंपगांच्या कुबड्या बनलास तु. साक्षात विठुराया झालास तु या लोकांसाठी. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्रभर फिरुन हजारो मैलांचा प्रवास करुन त्यांच्या हक्कासाठी लढतोय तु. तुझ्या लढण्याने शेतकऱ्यांना प्राण आला.
कुणीतरी आपला माणुस आपल्या हक्कांसाठी लढतंय हे त्या बळीराजाला कळालं असल्याने शेतकऱ्यांचा वाली झालास तु.
बच्चु तुझी राहणी कुणालाही सहज लाजवेल. अचलपुर सारख्या मतदारसंघातुन सलग तीन वेळा अपक्ष निवडून येवुन इतिहास रचला. मात्र आमदारकीचा थाट कधीच मिरवला नाही. पांढरी खादी तर तु कधीच घातली नसावी. कारण या खादीतला ढोंगीपणा तुझ्या रक्तातच नाही.
‘मी आमदार बोलतोय’ असं आजपर्यंत एकदाही ऐकलं नाही तुझ्या तोंडुन. कारण बच्चु नावातच दम आहे. विधानभवनातील आणि विधानपरिषदेतील शेकडो आमदार ‘बच्चु’ नावापुढे फिके पडत असावे हे लिहताना सुद्धा मला गर्व वाटतोय. कारण ‘आम्हाला काय कमीय, आम्ही काय भिक लागली का…? निराधार, अंध-अपंगांना पगारी वाढवा’ असा एल्गार पुकारणारा अन् सगळ्यांना भिडणारा एकटा तुच होता.
साधी राहणी अन् उच्च विचारसरणी या उक्ती फक्त ऐकुन होतो. ती तुझ्याकडे पाहिल्यावर पुर्ण झाल्यासारखी वाटते. आमदारकीचा लवलेशही तुला कधी शिवुन जात नाही. लाखो-करोडोंच्या गाड्या, बंगला, ए.सी. हे तुला कधी जमलंच नाही. विहिरीत पोहणे, हैदावर अंघोळ करणे, पेपर टाकुन झोपणे, मातीवर बसुन कांदा – भाकरीने पोट भरणे हे फक्त तुच करो जाणं.
बच्चु, तुझा प्रहार हा शासन कर्त्यांना आणि मदमस्त होवुन गेंड्याची कातडी पांघरुन झोपलेल्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणतो. तुझ्यामुळे आज कित्येक जीवांना न्याय मिळतोय याची कल्पना देखील नसेल तुला. प्रहार चे तर तुझे कार्यकर्ते असतीलच पण स्वाभिमानी मनाचे सर्वच पक्षातील कार्यकर्ते तुला देव मानतात. कारण तुझ्या कार्याला कुठलाच राजकारणी बगळा तोड देवु शकत नाही.
बच्चु… आज तुझा वाढदिवस. बच्चु या नावाला शुभेच्छा द्याव्या वाटतात कारण आमदार पेक्षा या नावात खुप मोठी ताकत आणि सामर्थ्य आहे. आणि तुझ्या आई-वडीलांनी ॐ आणि प्रकाश या नावाला बच्चु हे टोपण नाव दिलं. हे छोटंसं वाटणारं, लहान मुलाप्रमाणे असणारं बच्चु नाव खुप ‘प्रकाशमय केलंस.
तर आडनावाप्रमाणे तु भ्रष्टाचारवादी, लुच्च्या अन् लफंग्यासाठी कडु आहेस. शिवाय आमच्या भागात एखादा व्यक्ती एखाद्या कौशल्यात खुप पारंगत असला तर कुणीही सहज बोलुन जातं ‘लय कडुय लगा हे’ तसं तु अंध, अपंग, निराधार, विधवा अन् शेतकऱ्यांसाठी शाहु-फुले-आंबेडकर यांचा वारसा जपणारा ‘कडु’ आहेस. आणि म्हणूनच म्हणावसं वाटतं.. खरंच… बच्चु आहेस तु !
सुहास घोडके
मो : ९४२३ ५९७ ४९८
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम