क्रिकेटच्या पिचवर फ्लॉप ठरलेले तेजस्वी राजकारणाच्या पिचवर जिंकणार का ?
देशाच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत जर कोणी असेल तर ते आहेत तेजस्वी यादव. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल कोणताही लागो मात्र, येथील स्थानिकांनी तेजस्वी यादव यांना आरजेडी पक्षाचं भविष्य मानलं आहे.
लालू प्रसाद यादव यांच्या सभांपेक्षा जास्त गर्दी
लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात प्रवेश करणाऱ्या तेजस्वी यादव यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं बिहारच्या राजकारणात आपला ठसा उमटवला. बिहार विधानसभा निवडणूक प्रचारात तेजस्वी यादव यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या सभांपेक्षा जास्त गर्दी खेचण्यात त्यांना यश आलं आहे. तेजस्वी यादव यांनी बिहारच्या विरोधी पक्ष नेत्याचीही भूमिका संपूर्ण ताकदीनं पार पाडली आहे.
या निवडणुकीत तेजस्वी यादव यांची तरुणाईमध्ये क्रेझ असल्याचं दिसतेय.
तेजस्वी यांनी आयपीएल खेळली आहे
लालूप्रसाद यादव यांचे पूत्र असलेले तेजस्वी यादव यांचा राजकारणातला प्रवास तसा रंजक आहे. राजकारणामध्ये प्रवेश मिळवण्याआधी तेजस्वी यादव यांनी क्रिकेटमध्येही त्यांचं नशीब आजमावलं होतं.
आयपीएल मध्ये तेजस्वी यादव दिल्ली डेयरडेव्हिल्स टीमसोबत होते. 2009 ते 2012 या कालावधीमध्ये दिल्लीच्या टीमसोबत असूनही त्यांना एकदाही खेळायची संधी मिळाली नाही.
राष्ट्रीय स्तरावर अंडर-19 क्रिकेट खेळल्यानंतर तेजस्वी यादव यांच्यासोबत दिल्लीच्या टीमने 2009 साली करार केला. त्यावेळी लालूप्रसाद यादव देशाचे रेल्वेमंत्री होते. 2009 ते 2012 या कालावधीमध्ये बेंचवर बसून राहिलेल्या तेजस्वी यादव यांना दिल्लीच्या टीमने 30-40 लाख रुपये दिल्याचं सांगितलं जातं.
क्रिकेटच्या मैदानातून राजकीय रिंगणात
आयपीएल स्पर्धेत चार वर्ष संधीच्या प्रतीक्षेत घालवल्यानंतर तेजस्वी यांचे वडील लालूप्रसाद यांनी निर्णय घेतला. क्रिकेटसाठी तेजस्वी यांनी शाळा अर्धवट सोडली. त्यानंतर व्यावसायिक क्रिकेटपटू होण्यासाठी उमेदवारी केली. मात्र क्रिकेटमधल्या कारकीर्दीचं स्वप्न प्रत्यक्षात साकारताना दिसेना. लालूप्रसाद यादव चारा घोटाळ्यात दोषी आढळले आणि त्यांना शिक्षाही झाली. यामुळे तेजस्वी यांना क्रिकेटच्या मैदानातून राजकीय रिंगणात उतरावं लागलं. आरजेडीचा ते चेहरा झाले.
आरजेडी पक्षाची जबाबदारी
२०१५ मध्ये विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांना मोठा विजय मिळाला होता. नितीश कुमार सरकारमध्ये वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. सीबीआयनं २००६ मधील एका प्रकरणात तेजस्वी यांचं नाव घेतलं. नितीश कुमार यांनी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर युती तोडत भाजपाशी हात मिळवला. यादरम्यान, चारा घोटाळ्याचा निकाल लागला आणि जामिनावर बाहेर असलेले लालूप्रसाद यादव पुन्हा तुरुंगात गेले. आरजेडी पक्षाची जबाबदारी तेजस्वी यांच्या खांद्यावर येऊन पडली.
सभांचा विक्रम मोडला
तेजस्वी यादव पायाला भिंगरी लावून राज्य पिंजून काढत होते. त्यांच्या सभांना होणारी गर्दी हाही चर्चेचा विषय ठरत होती. लालू प्रसाद यादव यांनी एका दिवसात १६ प्रचारसभा केल्याचा विक्रम आहे. त्यांचा हा विक्रम तेजस्वी यादवांनी शनिवारी मोडला. तेजस्वी यादवांनी शनिवारी १७ प्रचारसभा आणि दोन रोड शो करत एका दिवसात तब्बल १९ प्रचारसभा घेतल्या.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम