Take a fresh look at your lifestyle.

वसंतदादा म्हणायचे “छातीवर गोळ्या झेलणारे अनेक आहेत. मी पाठीवर गोळी झेलली”

जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी आपल्या एका लेखात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या काही खास आठवणी लिहिल्या आहेत. त्यातील काही खास किस्से

0

वसंतदादाचे शिक्षण कमी झाले होते पण त्यांना व्यवहार ज्ञान मोठे होते. त्यामुळे त्यांच्या हजरजबाबी पणाचे अनेक किस्से वाचायला मिळतील. त्यांचा असेच काही किस्से जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी आपल्या एका लेखात लिहिले आहेत. त्यातील काही किस्से

स्वातंत्र्यासाठी छातीवर गोळ्या झेलणारे अनेक आहेत. पण मी पाठीवर गोळी झेलली

वसंतदादा पाटील देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी होते. अनेक आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभागही नोंदवला. तेव्हा सातारा परिसरात (तेव्हा सांगली जिल्हा झाला नव्हता) क्रांतिसिंह नाना पाटील यांचे पत्री सरकार (प्रती सरकार) मोठ्या प्रमाणात सक्रीय होते.

वसंतदादा त्यात सहभागी झाले. क्रांतिसिंह नाना पाटील, नाथा लाड, बापू लाड, नागनाथ नायकवडी, पांडू मास्तर असे सगळे क्रांतिकारी सातारा जिल्हा घुसळून काढत होते.

ब्रिटीश सरकारने दादांना पकडायला बक्षीस होते. दादा पकडले गेले. पण मिरजेच्या तुरुंगातून दादा तुरुंग फोडून सटकले. तटावरून उड्या मारल्या. पोलिसांनी गोळीबार केला.

दादांचे साथीदार पांडू मास्तर गोळीबारात बळी पडले. दादांच्या पाठीत उजव्या बाजूने गोळी घुसली. शस्त्रक्रिया करून ती काढण्यात आली. दादा अनेक वर्षे सांगत असत, ‘स्वातंत्र्यासाठी छातीवर गोळ्या झेलणारे अनेक आहेत. मी पाठीवर गोळी झेलली आहे.’

दादांच्या पाठीवर आणि छातीवर दोन्ही बाजूला शस्त्रक्रियेच्या खुणा शेवटपर्यंत होत्या. दादांनी स्वातंत्र्यवीर असल्याचे कधीही भांडवल केले नाही.

टीएमसी सांगू नका, किती एकर भिजेल ते सांगा

वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना वसंतदादा राज्याचे पाटबंधारे खात्याचे मंत्री झाले. त्यावेळी चाफेकर नावाचे व्यक्ती पाटबंधारे खात्याचे चीफ इंजिनीअर होते. दादा त्यांना विचारायचे, “कुठल्या खो-यात किती पाणी आहे?”

चाफेकर सांगायचे, “अमूक टीएमसी आहे.”
त्यावर दादा म्हणायचे, “टीएमसी सांगू नका, किती एकर भिजेल ते सांगा..”

सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी कायदा

दादा मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर एका जिल्हा परिषदेतून दुसऱ्या जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्याची बदली होत नव्हती. एका स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलीचे लग्न ठरले. मुलगा पुण्यात, मुलगी औरंगाबाद जिल्हा परिषदेत. बदलीची मागणी झाली. बदली करता येत नाही, असे सांगण्यात आले.

विषय दादांपर्यंत गेला. दादांनी संबंधित खात्याच्या सचिवाला बोलावले.

सचिवाने सांगितले, “दादासाहेब, आपला नियम असा आहे की, एका जिल्हा परिषदेतून दुस-या जिल्हा परिषदेत बदली होत नाही.” दादा म्हणाले, म्हणून तर तुम्हाला बोलावले.

आजपासून एका ‘जिल्ह्यातून’ दुस-या ‘जिल्ह्यात’ बदली करता येईल, असा प्रस्ताव तयार करून माझ्याकडे आण आणि माझी सही घे.. त्याच दिवशी संध्याकाळी शासनाने तसा निर्णय जाहीर केला. जे करायचे ते सामान्य माणसाच्या हिताचे असेल तर लगेच करायचे. त्यात कोणतीही लाल फित दादांना आडवी आली नाही.

थेट मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

वसंतदादा राज्याचे मुख्यमंत्री असतानाचा प्रसंग. राजीव गांधी यांनी दादांना न विचारता प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदावर श्रीमती प्रभा राव यांची नियुक्ती केली. जेव्हा याची माहिती दादांना समजली तेव्हा दादा मुख्यमंत्री कार्यालयातून उठले. तडक राज्यपालांकडे गेले आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन घरी निघून गेले.

कोणाला काय झाले समजायच्या आत “वर्षा” हा सरकारी बंगला सोडून, मुख्यमंत्र्यांची सरकारी गाडी परत करून आपल्या बळीराम ड्रायव्हरला बोलावून दादा घरी गेलेसुद्धा.

बातमी वा-यासारखी पसरली. कार्यकर्त्यांची गर्दी जमली. रात्री राजीव गांधींचा फोन आला. राजीव गांधी समजावत होते. दादांनी स्पष्टपणे सांगितले, ‘मुख्यमंत्र्याला किमान अध्यक्षपदाचा बदल सांगून कराल की नाही? तुमची ही पद्धत मला मान्य नाही..’

सध्याच्या काळात साधे ग्रामपंचायतीचे सदस्यत्व कोणी सोडायला तयार होणार नाही. पण वसंत दादांनी मात्र मुख्यमंत्रीपद सहज सोडून दिले. नंतर राजीव गांधींनी त्यांना राजस्थानचे राज्यपाल केले. त्या राज्यपाल पदाच्या कोठडीत दादा रमले नाहीत. काही दिवसात त्यांनी राज्यपाल पदाचा देखील राजीनामा दिला.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.