जेव्हा महमूद म्हणाला- अमिताभला नाही तर राजीवला चित्रपटात घ्या. तो जास्त स्मार्ट दिसतो
१९६९ साली अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट “सात हिंदुस्तानी” प्रदर्शित झाला. त्या चित्रपटानंतर देखील अमिताभ यांची लीड हिरो म्हणून फिल्मी कारकीर्द चांगली चालली नव्हती. तोपर्यंत इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या होत्या.
आता यामध्ये इंदिराजींचा उल्लेख का आला? त्याचं कारण म्हणजे अमिताभची आई तेजी बच्चन आणि इंदिरा या चांगल्या मैत्रिणी होत्या.
अमिताभ बच्चन यांचे फिल्मी करियर सांभाळण्यासाठी मग राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला. राजीव आणि अमिताभ हे बालपणीचे मित्र होते. राजीव गांधी अमिताभ यांना घेवून कॉमेडियन मेहमूद यांना भेटायला मुंबईला गेले. त्यावेळी महमूद “बॉम्बे टू गोवा” या चित्रपटाच्या कास्टिंगचे काम पाहत होते.
हनीफ जवेरीच्या ‘ए मॅन ऑफ मॅनी मूड्स’ या पुस्तकानुसार मेहमूदला ड्रग्स घेण्याचे व्यसन होते. या ड्रग्सचे नाव होते कॉम्पोस. हे एक टॅब्लेट होते. ज्याचा हार्ड डोस घेवून महमूद नशा करत असत.
राजीव आणि अमिताभ जेव्हा त्यांना भेटायला पोहोचले. तेव्हा महमूदचा लहान भाऊ असलेल्या अन्वरने या दोघांची ओळख करून दिली. पण नशा केलेली असल्यामुळे त्यावेळी महमूद काहीच समजू शकला नाही.
महमूदने पाच हजार रुपये काढून अन्वरला दिले. आणि ते पैसे अमिताभच्या मित्राला म्हणजे राजीव गांधी यांना देण्यास सांगितले. अन्वर अस्वस्थ झाला. त्याने पैशाचे कारण विचारले.
त्यावर महमूदनी उत्तर दिले,
“ये लड़का अमिताभ से ज्यादा गोरा और स्मार्ट है. ये आगे चलकर इंटरनेशनल स्टार बनेगा. इसको पैसे दो और साइन कर लो. अगली फिल्म में ये काम करेगा.”
त्यानंतर अन्वरला किस्सा समजला की नशेत असलेला महमुद राजीव गांधी यांना ओळखू शकला नाही. त्यामुळे अन्वर यांनी पुन्हा महमूद यांना सांगितले. की. हे राजीव गांधी आहेत, पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मुलगा आहे.
यानंतर महमूदला थोडीशी जाणीव झाली. यानंतर सर्वांनी आपापसात चर्चा केली. आणि अमिताभ बच्चन यांना “बॉम्बे टू गोवा” हा चित्रपट मिळाला. याच पिक्चर नंतर अमिताभ यांच्या चित्रपट कारकिर्दीनेही जोर धरला.
याच प्रसंगाबद्दल नंतर बोलताना अमिताभ म्हणाले होते, “महमूद बरोबर होता. राजीव गांधी यांच्या मध्ये एक आंतरराष्ट्रीय स्टार होता. पण तो चित्रपट पडद्यावर नाही तर राजकारणातला होता.”
राजीव गांधी यांचा हा किस्सा लेखक पत्रकार रशीद किदवई यांच्या “24 अकबर रोड” या पुस्तकातून घेतला आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम