आणि बाळासाहेब शरद पवारांना म्हणाले, “कमळाबाईची चिंता तुम्ही करू नका”
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे राजकीय मार्ग निराळे असले तरी त्या दोघांनी आपली मैत्री कठीण काळातही टिकवल्याचे काही किस्सेही आहेत. असेच काही महत्वाचे किस्से
सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. उद्धव ठाकरे सक्रीय राजकारणात येवून मुख्यमंत्री झाले आहेत. मागच्या वर्षभरात सरकारसमोर अनेक अडचणी आल्यात. पण जेव्हा जेव्हा सरकार अडचणीत येतेय अस दिसताच शरद पवार सरकारच्या मदतीला धावून जातात आणि सरकारची अडचण दूर करतात.
पण अश्याच एका राजकीय पेचप्रसंगात बाळासाहेब ठाकरे देखील पवारच्या मदतीला धावून गेले होते. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे राजकीय मार्ग निराळे असले तरी त्या दोघांनी आपली मैत्री कठीण काळातही टिकवल्याचे काही किस्सेही आहेत. असेच काही महत्वाचे किस्से
शिवसेना-काँग्रेसची मैत्री
वैभव पुरंदरे यांच्या ‘बाल ठाकरे एंड द राइज ऑफ शिवसेना’ या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे की, शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्याला काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते रामराव आदिक उपस्थित होते. रामराव आणि बाळासाहेब ठाकरे हे जुने मित्र होते.
याच पुस्तकानुसार, कम्युनिस्टांचा पराभव करण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असेही बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी काँग्रेस-शिवसेना युतीवर म्हटले होते. एप्रिल २००४ मध्ये सुहास पळशीकर यांनी ‘शिवसेना : अ टाइगर विथ मेनी फेसेस?’ या मध्ये याचा उल्लेख केला होता.
शिवसेना म्हणजे ‘वसंतसेना’ ?
१९६६ मध्ये बाळ ठाकरे यांनी शिवसेना नावाच्या पक्षाची स्थापना केली. असं म्हटलं जात, त्यावेळी शिवसेनेच्या स्थापनेला तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पाठिंबा होता. नंतरच्या अनेक प्रसंगातही वसंतराव नाईक शिवसेनेच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे शिवसेना वसंत सेना म्हणून ओळखली जाऊ लागली. १९७१ साली शिवसेनेने कामराज यांच्या काँग्रेस सिंडिकेटबरोबर पहिली निवडणूक देखील लढली.
आणीबाणीचे समर्थन
‘बाल ठाकरे एंड द राइज ऑफ शिवसेना’ या पुस्तकात असे म्हंटले आहे की, आणीबाणीला उघडपणे पाठिंबा देणारे बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेते होते.
बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, माझा लोकशाहीवर नव्हे तर ठोकशाहीवर विश्वास आहे.
थॉमस हेन्सन यांच्या ‘वेजेस ऑफ वायलेंस : नेमिंग एंड आइडेंटिटी इन पोस्टकोलोनियल बॉम्बे’ या पुस्तकानुसार ठाकरे यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता आणि म्हटले होते की, इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादली कारण देशातील अस्थिरतेचा सामना करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदा शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला
वैभव पुरंदरे यांच्या पुस्तकानुसार १९७७ मध्ये बाळासाहेबांनी बीएमसी निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मुरली देवरा यांना पाठिंबा दिला. त्याच वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसैनिकांनी काँग्रेसचा प्रचार केला.
१९८० मध्ये इंदिरा गांधींनी पंतप्रधान झाल्यावर महाराष्ट्र सरकार बरखास्त केले आणि येथे पुन्हा निवडणुका घेतल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने अब्दुल रहमान अंतुले यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनवले होते. अंतुले आणि बाळासाहेब चांगले मित्र होते. त्यामुळे ठाकरे यांनी निवडणुकीत आपले उमेदवार उतरवले नाहीत आणि काँग्रेसला पाठिंबा दिला.
सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीला पाठींबा
बाळासाहेब ठाकरे यांचे केवळ काँग्रेसमधील अनेक नेत्यांसोबत शरद पवार यांच्याशीही चांगले संबंध होते. पवारांशी त्यांची मैत्री इतकी होती की बाळासाहेबांनी शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपला उमेदवारही उभा केला नव्हता.
खरे तर सप्टेंबर २००६ मध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की,
‘बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना फोन केला आणि म्हणाले, “सुप्रिया निवडणूक लढवणार आहे आणि तू मला सांगितलं नाहीस. मला ही बातमी इतरांकडून का मिळत आहे?”
त्यावर पवार त्यांना म्हणाले, “शिवसेना-भाजप युतीने त्यांच्या विरोधात आपला उमेदवार आधीच जाहीर केला आहे.
त्यानंतर ठाकरे त्यांना म्हणाले, “माझा एकही उमेदवार सुप्रिया यांच्या विरोधात लढणार नाही. तुझी मुलगी म्हणजे माझी मुलगी आहे.”
मग पवार म्हणाले, “भाजप काय करेल?” ते म्हणाले, “कमळाबाईंची (भाजप) चिंता करू नकोस. मी जे म्हणेन ते ते करतील . ” अश्याप्रकारे सुप्रिया सुळे यांच्या विरोधांत एकही उमदेवार बाळासाहेबांनी त्यावेली दिला नव्हता.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम