दिल्लीत दोन पिढ्या
१९४७ ला भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताच्या पहिल्याच मंत्रीमंडळात काकासाहेब गाडगीळ केंद्रीय मंत्री होते. पुढे ते (त्यावेळच्या अविभक्त) पंजाबचे राज्यपाल देखील झाले. काकासाहेब गाडगीळ यांचे पुत्र विठ्ठलराव गाडगीळ देखील केंद्रीय मंत्री झाले. गाडगीळांच्या दोन पिढ्यानी दिल्लीत महाराष्ट्राचा ठसा उमठवला. याच्याच काही आठवणी सांगत आहे काकासाहेब गाडगीळ यांचे नातू आणि विठ्ठलराव गाडगीळ यांचे पुत्र आमदार अनंतराव गाडगीळ.
१९२९ साली दिल्लीत आराम बाग भागात एक मराठी शाळा सुरु झाली. “नूतन मराठी विद्यालय” असे या शाळेचे नाव. आज देखील हि शाळा चालू आहे. दिल्लीत, देशाच्या राजधानीत एखादी मराठी शाळा सुरु करणे. ती इतक्या वर्ष अविरत पणे चालणे. हे सबंध मराठी जणांना अभिमानास्पदच आहे. कारण काकासाहेबाचेच त्यावेळच गाजलेलं वाक्य आहे,
१९२९ साली हि शाळा सुरु करण्यामागे काकासाहेब गाडगीळ यांचा मुख्य पुढाकार होता. १९२९ पासून आजवर हि शाळा दिल्लीत देखील आपला मराठी ठसा टिकवून आहे.
काकासाहेब गाडगीळ यांनी मंत्री असताना केलेले एक महत्वाचे काम म्हणून एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागतो, ते म्हणजे गुजरात मध्ये जे सोरटी सोमनाथाचे जे मंदिर आहे. त्याचा जीर्णोद्धार करण्यामध्ये काकासाहेब गाडगीळ महत्त्वाची भूमिका होती. त्याचा प्रसंग असा सांगतात कि कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन गुजरात मध्ये चालू होते. अधिवेशनाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आणि काकासाहेब गाडगीळ समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना सोरटी सोमनाथाच्या मंदिराची अवस्था पाहुन सरदार पटेल म्हणाले, या मंदिराचा जीर्णोद्धार व्हायला पाहिजे !. सरदार पटेलांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराची जबाबदारी काकासाहेब गाडगीळ यांच्याकडे सोपविली. पुढे काकासाहेबांनी मुन्शी यांच्या मदतीने काम पूर्ण केले. आज गुजरात मध्ये जे सोरटी सोमनाथ जे मंदिर उभे आहे. त्याचे पुर्निर्माण काकासाहेबानीच पूर्ण केले आहे.
काकासाहेब गाडगीळ केंद्रात बांधकाम खात्याचे मंत्री असताना त्यांनी त्यावेळी भारत – पाकिस्तान सीमेवर अनेक ठिकाणी रस्त्याची कामे पूर्ण केली होती. १९६५ च्या भारत पाक युद्धाचा वेळी या रस्त्याचा खूप फायदा झाला. असे मत दिल्लीतील एका चर्चा सत्रात सैन्यातील काही अधिकाऱ्यांनी सांगितले होते. केंद्रीय बांधकाम मंत्री म्हणून त्यांचे आणखी एक विशेष काम म्हणजे भाक्रा नांगल धरण. कि ज्याच्या निर्मितीनंतर पंजाब सुजलाम सुफलाम झाला असे म्हटले जाते.
काकासाहेब राज्यपाल असतानाचा असाच एक किस्सा घडला होता, एक कार्यक्रम संपवून काकासाहेब राजभवनाकडे निघाले होते. त्यावेळी चंडीगड बसस्थानकावर अचानक काकासाहेबांना काही पायजमा घातलेली माणसे आणि नऊवारी साड्या घातलेल्या बायका दिसून आल्या. त्यावरून ते लोक महाराष्ट्रातील असल्याचे दिसत होते. त्यांच्याकडे पाहिल्यावर ते लोक घाबरलेल्या अवस्थेत दिसले. काकासाहेबांनी गाडी थांबविली, त्यांची विचारपूस करता कळले कि ते एका ट्रॅव्हल कंपनी सोबत फिरायला पंजाब मध्ये हि मंडळी आले होते पण पैसे संपल्यामुळे अचानक त्या ट्रॅव्हल कंपनीचा एजंट पळून गेला त्यामुळे ते अनोळखी प्रदेशात एकाकी पडले. काकासाहेबांना त्यांची अडचण कळाली. काकासाहेबांनी त्यांना तिथेच थांबायला सांगितले. अवघ्या काही वेळातच राजभवनातल्या गाड्यांचा ताफा तिथे पोहचला. त्या सगळ्या व्यक्तींना काकासाहेबांनी राजभवनात नेले. एक दिवस त्यांना राजभवनाचा पाहुणचार दिला आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांची तिकिटे काढून त्यांची पुण्याला परतण्याची त्यांची सोय केली.
कालांतराने काकासाहेबांनी राजकारणातून रिटायर्डमेंट घेतली, तेव्हा ते दिल्लीच्या किंवा पुण्याच्या रस्त्यावरून चालत फिरायचे. असेच एक दिवशी ते दिल्लीत चालत चालले असताना. त्याच रस्त्यावरून पंतप्रधान नेहरू चालले होते. (तेव्हा आजच्या सारखे पंतप्रधानासाठी पूर्ण रस्ता बंद करत नसत) काकासाहेबांना चालत जाताना पाहून नेहरू बैचेन झाले. दुसऱ्या दिवशी त्यांनी काकांना बोलावून घेतले. “सत्तेची राजवस्त्रे मी आता सोडून दिली आहेत ! असे उद्गार नेहरुंना भेटताच काकासाहेबन्नी काढले. परंतु पंडित नेहरूंना ते रुचले नाही. लगेचच पंडित नेहरूंनी काकासाहेबाच्या हातात एक कागद देत , “तुमच्या गाडीची सोय केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया च्या डेप्युटी गव्हर्नर पदी मी तुमची नेमणूक केली आहे.” (आता या पदाला चेअरमन म्हणतात)
विठ्ठलराव गाडगीळ पुण्यातून खासदार म्हणून निवडून आले. ते देखील केंद्रात मंत्री झाले. माहिती प्रसारण खात्याचे मंत्री असताना त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. तेव्हा टी.व्ही. नुकतेच येवू लागले होते. पण रेंज नसल्यामुळे अनेक ठिकाणी टी.व्ही. दिसत नव्हते. १९८६ साली मंत्री झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील सिंहगडावर टॉवर उभा केला. त्याचा परिणाम म्हणजे पुण्याच्या पलीकडील सर्व जिल्हात टी. व्ही. दिसू लागला. त्याच काळात त्यांनी केलेले अजून एक काम म्हणजे पुणे शहरातील अत्याधुनिक टेलिफोन एक्स्चेंज. आज मोबाईलच्या जमान्यात कोणाकडेही मोबाईल दिसतात. ८० च्या दशकात तशी परिस्थिती नव्हती. त्या काळात लॅन्डलाईन मिळायला पाच पाच वर्षे लागायची ! त्या काळात अत्याधुनिक टेलिफोन एक्स्चेंज उभे केल्यामुळे पुण्यात टेलीफोनचे जाळे उभे राहिले.
विठ्ठलराव गाडगीळ दिल्लीत असताना त्यांनी पुण्यातल्या अनेक शैक्षणिक संस्था, उद्योग उभा करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. आजच्या पुण्यातील एम आय टी, पुणे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटींग टेक्नॉलॉजी अश्या अनेक संस्था उभा करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
विठ्ठलराव गाडगीळ दिल्लीत दीर्घकाळ कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते राहिले. त्यांच्या अभ्यासू मांडणीने त्यांनी दिल्लीत आपली प्रतिमा निर्माण केली. पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना ते कोणताच निर्णय घेत नाहीत, अशी टीका कायम पत्रकाराकडून केली जायची. एकदा एका पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी यावर विठ्ठलराव गाडगीळ यांना विचारले असता, त्यांनी त्याला उत्तर दिले. “नो डिसिजन, इज गुड डिसिजन”
असाच आणखी एक किस्सा आहे. सीताराम केसरी अध्यक्ष असताना दिल्लीच्या कॉंग्रेस मुख्यालयात विठ्ठलराव गाडगीळ यांची पत्रकार परिषद चालू होती. त्यावेळी मुख्यालयात सीताराम केसरी देखील आपल्या कार्यालयात बसले होते. त्या पत्रकार परिषदेमध्ये विठ्ठलरावांनी घोषणा केली, “सोनिया गांधी राजकारणात उतरणार.” कॉंगेस मुख्यालयात उपस्थित असलेल्या अध्यक्ष केसरी यांना पत्रकारांनी विचारले असता, केसरी म्हणाले “त्या राजकारणात येणार नाहीत” पुढे सोनिया गांधी राजकारणात आल्या. पण यावरून विठ्ठलराव गाडगीळ यांची गांधी घराण्याशी असलेली जवळीक दिसून येते.
अनंतराव गाडगीळ (लेखक विधानपरिषद सदस्य आणि कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत)
( शब्दांकन – प्रविण काळे)
पूर्वप्रकाशन – सदर लेख यापूर्वी पारंबी दिवाळी अंक २०१९ मध्ये आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम