म्हणून आज साजरा केला परिचारिका दिन
आज संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विळख्यात आहे. या काळात सर्व डॉक्टर आपलं कर्तव्य जबाबदारीने निभावत आहेत. अश्या वेळी डॉक्टर्सना साथ देत आहेत नर्स. अशा कठीण काळातही नर्स आपल्या जीवावर उदार होत. आपली भूमिका पार पाडत आहेत.
जागतिक परिचारिका (नर्स) दिनानिमित्त परिचारिकांच्या कार्याला सलाम करण्याचा आमचा हा प्रयत्न.
का साजरा केला जातो परिचारिका दिन ?
1853-54 मध्ये झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करत फ्लॉरेन्स नाइटिंगेल फिरत होत्या. तर फ्लॉरेन्स नाइटिंगेल या आधुनिक शु्श्रूषा शास्त्राच्या संस्थापिका समजल्या जातात. आद्य परिचारिका (नर्स) समजल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा १२ मे हा जन्मदिवस परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.
कोरोनाच्या काळात नर्सची भूमिका महत्वाची
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे जगभरात लाखो लोकांना याचा संसर्ग झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक देशांतील सत्ताधारी, नोकरशाही, लोकप्रतिनिधी, पोलिस, डॉक्टर्स असे सर्वच जण या विरोधात लढा देत आहेत. यात पोलिस आणि डॉक्टरांबरोबर लाखो परिचारिकांचा सहभाग सर्वांत महत्त्वाचा आहे. या लढ्यात कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या या परिचारिका योद्ध्याची भूमिका बजावत आहेत.
आजघडीला अनेक परिचारिका घरापेक्षा रुग्णांची अधिक काळजी घेत आहेत. त्या सलग किती तास काम करतात, त्यांना आराम करायला वेळ मिळतो का, जेवण वेळेवर घेता येतेय का, या प्रश्नांची उत्तरे त्यांनाच माहित आहेत. पण तरीही ते लढत आहेत. त्यातच काही डॉक्टर, परिचारिकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे प्रकार घडले. त्यांना क्वारंटाईन सारखे उपाय स्वतःवर करावे लागले आहेत. अशा परिस्थितीमध्ये रुग्णांची सुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांची धावपळ, सेवावृत्ती पाहिल्यावर प्रश्न पडतो तो त्यांच्या जीवाच्या सुरक्षिततेचा. त्यासाठी काळजी घेतली जात असेलही, सरकारने विमा संरक्षणासारखे काही निर्णयही जाहीर केले आहेत. पण अशा निर्णयाचा कितपत फायदा होतो, हाही प्रश्न महत्वाचा आहे.
सध्या सोशल मीडियात सलग 15 ते 20 दिवस काम करून एक-दोन दिवसांसाठी घरी जाणाऱ्या या रुग्णसेविकांचे औक्षण करून, फुले उधळून स्वागतही करण्यात येत आहे. यामुळे त्या सुखावतही असतील, पण रुग्णशय्येवर असलेल्यांची आयुष्यभर सेवा करणाऱ्या परिचारिकांसाठी केवळ हे स्वागत पुरेसे नाही. कोरोनाच्या संकटाच्या निमित्ताने रुग्णसेवेसाठी कटिबद्ध असलेल्या परिचारिकांचा सरकारने कायमस्वरुपी उचित सन्मान केला पाहिजे.
जखमी सैनिकांची सेवा करणाऱ्या आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल्स यांचे कार्य महान आहेच. मात्र, कोरोनाला हरवण्यासाठी सध्या योद्ध्याची भूमिका बजावत असलेल्या जगभरातील परिचारिकांचे कामही तितकेच वंदनीय आहे. आमचा या सगळ्या परिचारिकांना सलाम !!
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम