गुजरातच्या हरेन पंड्या यांचे नाव घेऊन राऊत मोदींवर निशाणा साधत आहेत
२००२ मधील गुजरात दंगलीचा बदला घेण्यासाठी पांड्या यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप सीबीआयच्या आरोपपत्रात ठेवण्यात आला होता.
1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्यात शिवसेना नेते संजय राऊत यांची ईडीने संपत्ती जप्त करतात संजय राऊत यांना नवी दिल्लीतल्या आपल्या घरातून माध्यमांशी बोलताना राऊत यांना महात्मा गांधी आठवले.
एवढेच नाही, तर त्यांना गुजरात भाजपचे नेते आणि गुजरातचे गृहराज्यमंत्री हरेन पंड्या हे देखील आठवले…!
संजय राऊत यांनी उल्लेख केलेले हरेन पांड्या होते तरी कोण? त्यांचा उल्लेख करून संजय राऊत यांनी कोणावर निशाणा साधलाय, याची चर्चा सुरू झाली आहे.
गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये हरेन पांड्या गृहमंत्री होते. त्यांची २६ मार्च २००३ रोजी अहमदाबादमधील लॉ गार्डन भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. २००२ मधील गुजरात दंगलीचा बदला घेण्यासाठी पांड्या यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप सीबीआयच्या आरोपपत्रात ठेवण्यात आला होता.
हा खटला विशेष पोटा न्यायालयात चालला आणि न्यायालयाने सर्व १२ आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
या शिक्षेला आरोपींच्या वतीने उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. तिथे पोटा न्यायालयाचा निकाल रद्द ठरवून उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सीबीआयने २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यासह आणखीही काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर सात वर्षांनंतर निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने पोटा न्यायालयाचा निकाल कायम ठेवला व १२ पैकी ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
इंजिनिअर असलेले हरेन पांड्या हे गुजरात भाजपमधील ९० च्या दशकात एक युवा नेतृत्व म्हणून समोर आले होते. ४२ हजाराहून अधिक मताधिक्क्याने पांड्या यांनी एलिसब्रिज विधानसभा मतदार संघातून विजय मिळविला होता. पांड्या थोड्याच दिवसात मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या जवळ गेले आणि गृहमंत्रीपद मिळविले होते.
नरेंद्र मोदी आपल्या पहिल्या निवडणुकीसाठी सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात होते
नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले तेव्हा ते आमदार नव्हते. त्यामुळे सहा महिन्यात त्यांना विधानसभेवर निवडून जाणे आवश्यक होते. नरेंद्र मोदी आपल्या पहिल्या निवडणुकीसाठी सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात होते.
त्यावेळी त्यांचे लक्ष हरेन पांड्या यांच्या मतदारसंघावर गेले. पांड्या यांनी मोदींसाठी हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला होता.
यावरून दोन्ही नेत्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली असल्याचे ‘कारवान’ या मासिकाने भाजप नेत्याच्या हवाल्याने आपल्या एका वृत्तात नमूद केले होते. डिसेंबर 2002 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानही या दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरू होता.
मृतदेह उघड्या ट्रकमधून अहमदाबादला हलवण्यास विरोध केला
गुजरातमध्ये 2002 मध्ये मोठी धार्मिक दंगल उसळली होती. सन 2002 च्या गोध्रा घटनेनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हरेन पंड्या यांनीच कारसेवकांचे मृतदेह उघड्या ट्रकमधून अहमदाबादला हलवण्यास विरोध केला होता. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि नंतर तेच झाले.
हरेन पांड्या हे पीडित कुटुंब आणि मुस्लिम नेत्यांना एकाच मंचावर आणून शांततेची चर्चा करू शकले असते. तेवढी त्यांची क्षमता होती अशी चर्चा होती. काहींनी दावेही केले आहेत. मात्र, त्यावेळी गुजरात सरकारकडून त्यांना बैठकीत गप्प बसवण्यात आले.
हरेन पांड्या यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की,
27 फेब्रुवारी 2002 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी एक मीटिंग घेत पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांना दंगलीत न पडण्याचा आणि लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करू द्या.
असा आदेश दिला असल्याचे म्हटले होते.
त्यांचा मृतदेह दोन तास त्यांच्या कारमध्ये तसाच होता
पांड्या यांना राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य म्हणून नियुक्तीचे पत्र २५ मार्च २००३ रोजी मिळाले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 26 मार्च 2003 रोजी सकाळी 07:40 वाजता गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
अहमदाबादमध्ये सकाळी मॉर्निंग वॉक करताना त्यांच्या अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. हल्ला झाल्यानंतरही त्यांचा मृतदेह दोन तास त्यांच्या कारमध्ये तसाच होता. या हत्येच्या संशयाची सुई मोदींसह अनेकांच्या दिशेने गेली होती. त्यामुळे संजय राऊत यांनी हेतूतः हरेन पंड्या यांच्या हत्येचा उल्लेख आपल्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर केला आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम