प्रतिभाताई पाटील वयाच्या २७व्या वर्षी आमदार झाल्या होत्या
प्रसंग २००७ सालचा आहे. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते. डॉ. अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल समाप्त होणार होता. नवीन राष्ट्रपती कोण होणार ? या विषयावर सोनिया गांधी यांच्या घरी राष्ट्रपतीपदाची मिटिंग चालु होती.
अनेक नावावर चर्चा झाली. सहमती-असहमती होत असतानाच डाव्या आघाडीचे नेते डी. राजा म्हणाले की, “का एकाद्या महिलेला राष्ट्रपती बनवले जाऊ नये?
डी. राजा यांच्या या प्रस्तावावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी हेही तयार झाले आणि त्यांच्यासमोर प्रतिभा पाटील यांचे नाव आले. त्यावेळी प्रतिभा पाटील राजस्थानच्या राज्यपाल होत्या.
यूपीए आणि डाव्या आघाडीने प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उभे केले. पण महाराष्ट्राबाहेरील देशभरातील अनेक लोकांनी त्याच नावही ऐकलं नव्हतं.
प्रतिभा पाटील यांचे शालेय जीवन
स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नारायण राव होते. प्रतिभा पाटील यांचे वडील सरकारी वकील होते, त्यामुळे कुटुंबात मुलीच्या शिक्षणासाठी अनुकूल वातावरण होते. प्रतिभा पाटील यांनी नगरपालिकेच्या कन्या शाळेपासून प्राथमिक शिक्षण सुरू केले. त्या इयत्ता ४ थी पर्यंत त्याच शाळेत शिकल्या . त्यानंतर त्यांनी जळगावच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पाचवीत प्रवेश घेतला.
शालेय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण होताना प्रतिभा पाटील यांनी इतर उपक्रमांमध्ये भाग घेताना आपले व्यक्तिमत्त्वही विकसित केले. भाषणे, वादविवाद आणि क्रीडा उपक्रमांमध्येही प्रतिभा पाटील सहभागी होत असत .त्या केवळ शैक्षणिक पुस्तकांमध्येच गुंतलेल्या नव्हत्या , तर व्यक्तिमत्त्वाच्या सर्व पैलूंकडे ती लक्ष देत होत्या . प्रतिभा पाटील यांना शास्त्रीय संगीताचीही खूप आवड आहे . त्या टेबल टेनिसच्या एक यशस्वी खेळाडूही होत्या .
२७ व्या वर्षी राजकारणात
वयाच्या २७ व्या वर्षी प्रतिभा पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९६२ मध्ये त्यांना यदलाबाद भागातून विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिकीट मिळवले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
प्रतिभा पाटील १९६२ ते १९८५ या काळात पाच वेळा महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य होत्या. कॅबिनेट मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. त्यांनी अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी सांभाळलेली आहे .
प्रतिभा पाटील या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षही राहिलेल्या आहेत. त्यांनी राज्यसभेच्या उपसभापती म्हणूनही काम केले. श्रीमती पाटील यांची २००४ मध्ये राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. पण काँग्रेसच्या वतीने त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्यात आले तेव्हा प्रतिभा पाटील यांनी २००७ मध्ये राज्यपालपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रतिभा पाटील यांनी भैरवसिंह शेखावत यांचा सुमारे तीन लाख मतांनी पराभव झाला.
वादग्रस्त विधाने आणि आरोप
राजस्थानमधील महिलांचे मोगलांपासून संरक्षण करण्यासाठी पडद्याची प्रथा सुरू करण्यात आल्याचे प्रतिभा पाटील यांचे विधान तेव्हा खूप गाजले होते . इतिहासकारांनी तेव्हा सांगितले होते की, अध्यक्षपदासाठी दावेदार असलेल्या प्रतिभा पाटील यांना इतिहास बद्दल शून्य माहिती आहे . तर मुस्लिम लीगसारख्या पक्षांनीही या विधानाला विरोध केला. समाजवादी पक्षाने सांगितले होते की, प्रतिभा पाटील यांची विचारधारा मुस्लिमविरोधी आहे.
आणखी एका वादात धार्मिक संघटनेच्या एका कार्यक्रमात त्या बोलता बोलता म्हणाल्या की त्यांनी चक्क आपल्या गुरूंच्या आत्म्याशी संवाद केला असल्याचे सांगितले होते . प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांच्यावर शाळेतील शिक्षकाला जबरदस्तीने आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप झाले होते . खुनाच्या आरोपाखाली अडकलेल्या आपल्या भावाला वाचवण्यासाठी आपल्या राजकीय ओळखीचा पुरेपूर उपयोग केल्याचाही त्याच्यावर आरोप झाले होते .
महिला सक्षमीकरणाकडे दमदार पाऊल
प्रतिभादेवीसिंह पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या प्रवासामुळे हे सिद्ध होते की, घर सांभाळताना महिलाही देशाची जबाबदारी घेऊ शकतात. आज जेव्हा ती पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल होऊ शकते, तेव्हा राष्ट्रपती का नाही? प्रतिभा पाटील यांचा राष्ट्रपती भवनापर्यंतचा प्रवास हा महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी विषय आहे. भारतीय राजकारणाच्या इतिहासातील ही ऐतिहासिक घटना खरोखरच उल्लेखनीय आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम