महात्मा गांधीपासून आजपर्यंत भारताच्या राजकारणात पदयात्रांचा मोठा इतिहास आहे
माजी पंतप्रधान चंद्रशेखर, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, आंध्रचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी व एन. टी. रामाराव, विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नेत्यांच्या यात्रांमुळे पक्षाला किंवा नेत्याला फायदा झाला होता.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला कन्याकुमारीमधून आज सुरुवात होत आहे. १५० दिवस चालणारी ही यात्रा १२ राज्यांमधून जाणार असून, ३५०० किमी अंतर पार करणार आहे.
आपल्या देशाच्या राजकारणात आजवर अनेक दिग्गज नेत्यांनी अशा मोठ्या पदयात्रा काढल्या आहेत. त्याचा त्यांना मोठा राजकीय फायदा देखील झाल्याचे पाहायला मिळते.
माजी पंतप्रधान चंद्रशेखर, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, आंध्रचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी व एन. टी. रामाराव, विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नेत्यांच्या यात्रांमुळे पक्षाला किंवा नेत्याला फायदा झाला होता.
महात्मा गांधी यांची दांडी यात्रा
स्वातंत्रपूर्व काळात 12 मार्च 1930 च्या दिवशी महात्मा गांधीनी दांडी यात्रा काढली होती. इंग्रजांनी बनवलेला ‘मिठाचा कायदा मोडणे’ हा त्याचा मुख्य उद्देश होता. 78 सत्याग्रहींसह सुरु केलेल्या या दांडीयात्रेला पुढे मोठा प्रतिसाद मिळाला.
6 एप्रिल 1930 रोजी दांडीला पोहोचल्यानंतर सुमारे 25 दिवसांनी त्यांनी समुद्रकिनारी मिठाचा कायदा मोडला.
दांडी यात्रेदरम्यान सुरत, दिंडोरी, वांज, धामण नंतर यात्रेच्या शेवटच्या दिवसात महात्मा गांधींनी नवसारीला आपला मुक्काम केला. येथून कराडी व दांडीची यात्रा पूर्ण झाली. तेव्हा चहा, कापड आणि मीठ यासारख्या गोष्टींवर ब्रिटिश सरकारची मक्तेदारी होती.
ब्रिटीश राजवटीत भारतीयांना मीठ बनवण्याचा अधिकार नव्हता, पण इंग्लंडमधून येणाऱ्या मिठासाठी त्यांना कितीतरी पट जास्त पैसे मोजावे लागले. दांडी मार्चनंतरच्या काही महिन्यांत 80,000 भारतीयांना अटक करण्यात आली. यामुळे एक ठिणगी पेटली जी पुढे ‘सविनय कायदेभंग चळवळ’ मध्ये बदलली. त्याचा इंग्रज राजवटीला धक्का बसला होता.
चंद्रशेखर यांची भारत यात्रा
जनता पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रशेखर यांनी १९८३साली कन्याकुमारी पासून दिल्लीत महात्मा गांधी यांची समाधी असलेल्या राजघाटपर्यंत ‘भारत यात्रा’ काढली होती.
सुमारे सहा महिन्यांच्या कालावधीत चंद्रशेखर यांनी चार हजार कि.मी.पेक्षा अधिक अंतर कापले होते. पुढे १९९१मध्ये अल्प काळासाठी चंद्रशेखर यांना पंतप्रधानपद भूषविण्याची संधी मिळाली होती.
लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा
भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अयोध्या आंदोलनाच्या प्रसारासाठी रथयात्रा काढली होती. या रथयात्रेमुळे देशाच्या राजकारणाचा सारा पोत बदलला. देशामध्ये हिंदुत्वाचे वारे निर्माण झाले.
अडवाणी यांची यात्रा बिहारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडविली व अडवाणी यांना अटक केली होती. त्यातून देशाच्या विविध भागांमध्ये हिंसाचार उसळला होता.
अडवाणी यांच्या अटकेनंतर भाजपने व्ही. पी. सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि ते सरकार कोसळले होते. या रथयात्रेचा भाजपला राजकीय लाभ मिळाला आणि त्यांनतर भाजप सत्तेत आली. अडवाणी यांच्या रथयात्रेमुळेच रामजन्मभूमीचा मुद्दा अधिक तीव्र झाला.
आंध्र मधील वाय. एस. आर. आणि जगमोहन रेड्डी
आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांची सत्ता असताना हैदराबाद व माहिती तंत्रज्ञानाच्या विकासाकडे त्यांनी अधिक लक्ष दिले होते. तेलुगू देशम सरकारचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करीत वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी राज्यभर यात्रा काढली होती.
त्याचा राजशेखर रेड्डी यांना फायदा झाला आणि काँग्रेसला सत्ता मिळाली होती. राजशेखर रेड्डी यांच्या यात्रेवर आधारित ‘यात्रा’ हा चित्रपट तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला होता व या चित्रपटाला चांगला प्रतिसादही मिळाला होता.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशात वाय. एस. आर. यांचे पुत्र असलेल्या जनगमोहन रेड्डी यांनी पदयात्रा काढली होती. त्याला राज्यभर मोठा प्रतिसाद मिळाला होता. निवडणुकीत जगनमोहन यांच्या पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळाले होते.
सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. लवकरच बिहारमध्ये प्रशांत किशोर देखील आपली यात्रा सुरु करणार आहेत. या साऱ्याचा देशाच्या राजकारणावर काय फरक पडतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम