Take a fresh look at your lifestyle.

सांगलीच्या येडेमच्छिंद्रचे नाना पाटील “क्रांतिसिंह” झाले त्याची गोष्ट

नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या आशयाच्या कहाण्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रसिद्ध होत्या. म्हणूनच नाना पाटलांच्या "प्रतिसरकार"ला लोक "पत्रीसरकार" म्हणत.

0

देशात ब्रिटीश शासन असताना तब्बल दीड हजार गावात प्रतिसरकार चालवणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे अनेक किस्से मानदेशात प्रसिद्ध आहेत. नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या आशयाच्या कहाण्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रसिद्ध होत्या. म्हणूनच नाना पाटलांच्या “प्रतिसरकार”ला लोक “पत्रीसरकार” म्हणत.

नाना पाटील यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील येडेमछिंद्र. पण त्यांचा जन्म त्यांच्या आजोळी बहेबोरगाव येथे 3 ऑगस्ट 1900 रोजी झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीच्या काळी काळ तलाठ्याची नोकरी केली. पण नोकरीत मन न रमल्याने नोकरी सोडून स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास यासाठी त्यांनी राजकीय व सामाजिक कार्य सुरू केले.

असहकार आंदोलन आणि प्रतिसरकार

महात्मा गांधी यांच्यामुळे ते 1930 साली असहकार चळवळीत सहभागी झाले. पुढे ते कॉंग्रेसमध्ये सहभागी झाले आणि महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीवर निवडून देखील आले. सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.

त्यांनी सातारा, सांगली व कोल्हापूर भागात प्रतिसरकार स्थापन करून समांतर शासनव्यवस्था उभी केली. असं सांगितले जाते त्याकाळी तब्बल दीड हजाराहून अधिक गावात त्यांनी प्रतिसरकारे स्थापन केली होती.

गावात प्रतिसरकारच्या माध्यमातून नाना पाटील लोकन्यायालये, अन्नधान्यपुरवठा, बाजारव्यवस्था अश्या लोकांच्या अडचणी सोडविण्यास सुरुवात केली. नाना पाटील यांनी लोकांच्या अडचणी सोडवण्याबरोबरच गावातील सावकार, समाजकंटक यांच्यावरही वचक बसविला.

सावकार, समाजकंटक याच्यावर वचक बसवण्यासाठी त्यांनी “तुफानी सेना” नावाची स्वतंत्र सेनाही स्थापन केली.

तुफानी सेनेच्या माधमातून नाना पाटील यांनी तेव्हाच्या ब्रिटिश सरकारच्या रेल्वे, पोस्ट तसेच खजिन्यावर हल्ले करून सरकारला थेट आव्हान दिले. त्यामुळे ब्रिटीश शासनव्यवस्था थेट उद्धवस्त करण्याचे तंत्र नाना पाटील यांनी तुफानी सेनेच्या माध्यमातून राबवले.1920 ते 1942 या काळात नाना पाटील यांना 8-10 वेळा तुरुंगवास पत्करावा लागला. वर्ष 1942 ते 46 या काळात ते भूमिगतच होते

नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो गावात प्रतिसरकारे स्थापन झाली. गावातील सावकार, गावगुंडांचा बीमोड केला. सावकारशाही मोडून काढली. स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटीश सत्तेला सळो की पळो करून सोडणारे नाना पाटील म्हणजे धगधगती मशाल.

असे असले तरी 1946 पर्यंत नाना पाटील व त्यांच्या सहकार्याचे कार्य उपेक्षितच राहिले होते. त्यांच्या विरोधात अपप्रचार करणारे अनेकजण सक्रिय होते. पण नाना पाटील यांच्या कार्याची दखल ज्येष्ठ पत्रकार “मराठा”कार प्र. के. अत्रे यांनी घेतली.

26 मे 1946च्या दिवशी मुंबई मधील शिवाजी पार्कवर प्रतिसरकारमधील सहकाऱ्यांचा भव्य सत्कार आयोजित केला गेला, खुल्या ट्रक मधून त्यांची मिरवणूक काढली. चित्रपट निर्माते व दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी व्यासपीठाची रचना व सजावट केली केली होती. ज्या ट्रकमधून नाना पाटील व सहकाऱ्यांची मिरवणूक काढली त्याची सजावटपण शांतारामबापूंनी केली होती.

आचार्य अत्रे यांनी मुंबईत ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मावळत्या सूर्याच्या साक्षीने नाना पाटील यांचा सत्कार केला. याच सत्कार कार्यक्रमात आचार्य अत्रे यांनी नाना पाटील यांना “क्रांतिसिंह’ ही पदवी बहाल केली.

सांगलीच्या येडेमच्छिंद्रचे नाना पाटील “क्रांतिसिंह नाना पाटील” झाले.

एवढंच नाही तर अत्रे यांनी नाना पाटील यांच्यासह प्रतिसरकारमधील सहकाऱ्यांना क्रांतिवीर म्हणून संबोधले. त्यांचाही उचित गौरव व सत्कारही केला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्यांनी कॉंग्रेसबरोबर फारकत घेऊन डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्ट चळवळीत प्रवेश केला. शेतकरी कामगार पक्षातही ते सक्रिय झाले.

1957 च्या लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले. 1967च्या निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. पुढे 6 डिसेंबर 1976 रोजी त्यांचे मिरज येथे निधन झाले.

संसदेमध्ये मराठीतून भाषण करणारे पहिले खासदार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो व इंग्रजांचे राजवटीत दीड हजार गावांत प्रतिसरकार चालविणारे क्रांतिसिंह नाना रामचंद्र पाटील यांची आज जयंती. क्रांतिसिंह नाना पाटील यांना विनम्र अभिवादन

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.