या पठ्ठयाने चक्क अजित पवारांचा रेकॉर्ड मोडला!
उत्तर प्रदेशची सत्ता काबीज करण्यासाठी अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय लढाईचा निकाल आता तुमच्या डोळ्यांसमोर आहे. सपाच्या प्रयत्नांनंतरही यूपीमध्ये भाजपचा झेंडा पुन्हा फडकत आहे. या निकालावरून हे स्पष्ट झाले आहे की लोकांना यूपीमधील डबल इंजिन सरकार खरोखरच आवडले आहे आणि मुख्यमंत्री योगी आणि पीएम मोदी यांच्या जोडीसमोर कोणीही टिकू शकत नाही.
उत्तर प्रदेशात आज भाजपच्या विजयोत्सवात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण आली आहे. नोएडा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांनी ऐतिहासीक विजयाची नोंद केली.
विधानसभा निवडणुकीत यापूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार यांनी सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवला होता. अजित पवार यांनी १ लाख ६५ हजार इतक्या प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला होता. मात्र हा रेकाॅर्ड आज पंकज सिंह यांनी तोडला.
रेकॉर्ड उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर जमा
विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवण्याचा रेकॉर्ड उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर जमा आहे. अजित पवारांच्या नावावर 1 लाख 65 हजार मताधिक्यांनी विजयाचा विक्रम जमा होता. हा विक्रम पंकज सिंह यांनी मोडला आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता पंकज सिंह यांना 2 लाख 44 हजार 91 मत मिळालेली असून सपाच्या सुनील चौधरी यांना 62 हजार 722 मतं मिळाली आहेत.
डिपॉझिटही जप्त झाले होते
अजित पवार यांनी 1995 मध्ये बारामती मतदारसंघातून सर्वात आधी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे अजित पवारांनी त्यावेळी आपल्या प्रतिस्पर्ध्य्यांना निवडणुकीत एवढा मोठा झटका दिलेला की त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. त्यावेळी ते 91 हजार 443 मताधिक्यांनी जिंकून आले होते.
त्यानंतर 1999 ला झालेल्या निवडणुकीतही अजित पवारांनी त्यांचा जुना रेकॉर्ड मोडत नवा विक्रम बनवला होता. त्यावेळी ते 96 हजार 302 मताधिक्यांनी निवडून आले होते. त्यानंतर अजित पवार 2009 मध्ये 1 लाख 28 हजार 544 मताधिक्यांनी विजय मिळवला होता. यावेळी देखील इतर पक्षाच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.
अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही
नोएडा विधानसभेच्या जागेवर पंकज सिंह यांना तब्बल ७०.८४ टक्के मतं मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला १६.४२ टक्के मतं मिळाली. काँग्रेस उमेदवाराला ४.३६ टक्के आणि बसपा उमेदवाराला ५.०४ टक्के मतें मिळाली आहेत. मात्र निवडणूक आयोगाकडून पंकज सिंह यांच्या विजयाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
अजित पवारांची चर्चा
नोएडा विधानसभा मतदारसंघ हा उत्तर प्रदेशातला महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. 2017 साली झालेल्या निवडणुकीत पंकज सिंह यांना बहुमत मिळालं होतं. त्या निवडणुकीत पंकज सिंह यांना 1 लाख 62 हजार मतं मिळाली होती. गेल्या पाच वर्षांत पंकज सिंह यांनी मतदारसंघावर पकड मजबूत ठेवल्यामुळे त्यांना या निवडणुकीत मोठा फायदा होताना दिसला आहे. त्यामुळे आजच्या निवडणुकीत भाजपच्या विजयासोबत अजित पवारांची चर्चा रंगते आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम