इंदिरा गांधींचा अस्थिकलश पळवणारे वसंत साठे
महाराष्ट्रातून प्रत्येक पाच वर्षाला खासदार दिल्लीत निवडून जातात. आपल्या कार्य कर्तुत्वाने अनेक खासदारांनी दिल्लीत आपली प्रतिमा निर्माण केली. “दिल्लीतला महाराष्ट्र” अशा बाबतीत विचार करताना राज्यातून दिल्लीत निवडून गेलेल्या अश्याच काही खासदारांचे किस्से
इंदिरा गांधींचा अस्थिकलश पळवणारे वसंत साठे
इंदिरा गांधी यांचा खून झाल्यानंतर त्यांचे अस्थिकलश देशभरात पाठवले जाणार होते. साधारणपणे प्रत्येक राज्याचे कलश राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल यांच्याकडे सुपूर्त केले जाणार होते . तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील. पण इंदिराजीच्या निधनामुळे मुंबई मध्ये परिस्थिती बिघडू नये, म्हणून मुख्यमंत्री वसंतदादा रात्रीच मुंबईमध्ये परत आले आणि अस्थिकलश आणण्याची जबाबदारी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर सोपवली.
दुसऱ्या दिवशी सर्व राज्याचे अस्थिकलश रवाना झाले. सोबत महाराष्ट्राचा अस्थिकलश देखील रवाना झाला. पण तो स्वीकारला सुशीलकुमार शिंदे यांनी नाही, तर तो स्वीकारला वसंत साठे यांनी. प्रसंग असा होता झाला कि दिल्लीत तीनमुर्ती भवनात एका झाडाखाली सगळे अस्थिकलश ठेवले होते. प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल ते स्वीकारत होते. तिथे वसंत साठे पोहचले आणि आपली पाळी येताच महाराष्ट्राचा कलश द्या, असे म्हणाले. आणि कलश घेऊन ते थेट विमानतळाकडे निघाले.
तेवढ्यात तिथे सुशीलकुमार शिंदे पोहचले. वसंत साठे कलश घेऊन गेल्याचे कळताच त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचा पाठलाग करून विमानतळावर वसंत साठे यांना गाठले. परिस्थिती वाद घालण्यासारखी नव्हती आणि त्यातही वसंत साठे सुशीलकुमार शिंदे यांना सिनिअर होते. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनी वसंत साठे यांना विंनती केली कि “अहो, मी कलश घेऊन येणार असं मुंबई मध्ये सगळ्यांना सांगितलं आहे. त्यामुळे निदान मुंबईमध्ये उतरताना तरी मला कलशाला हात लावू द्या. दोघे मिळून खाली उतरू.” आणि वसंत साठे यांनी त्याला संमती दिली.
त्यावेळी इंदिरा गांधी यांचा अस्थिकलश हा भावनिक मुद्दा होता. त्यामुळे याचा फायदा येत्या निवडणुकीत अशी अपेक्षा ठेवून वसंत साठे यांनी हा प्रकार केल्याचेही बोलले गेले. नंतर या कलश अपहरणाच्या बातम्याही वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्या. वसंत साठे १९७१ आणि १९७७ साली अकोला मतदारसंघातून निवडून आले होते. तर १९८०, १९८४ आणि १९८९ साली वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. केंद्रीय मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पहिले.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम