महाराष्ट्राच्या विधानसभेत एका आमदारांनी चक्क पेट्रोल आणि लायटर नेऊन राडा केला होता
हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या ‘विधानगाथा’ या पुस्तकात त्यांनी त्यांच्या काही खास आठवणी लिहिल्या आहेत. त्यातला हा एक किस्सा
विधीमंडळाच्या अधिवेशन कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा होत असते. लोकप्रतिनिधी आपले प्रश्न पोटतिडकीने मांडत असतात. सभागृहाच्या संकेताप्रमाणे कोणत्याही सदस्याला बोलण्यालापूर्वी अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. अध्यक्षांनी परवानगी दिली तरच सदस्याला बोलण्याची परवानगी मिळते. अन्यथा त्याला बोलता येत नाही.
गुलाबराव गावंडे हे शिवसेनेकडून निवडून आलेले राज्यमंत्री होते. ते प्रत्येक अधिवेशनात सावकारी प्रथेच्या विरोधात भूमिका घ्यायचे. सावकार विरोधी कायदा आणलाच पाहिजे, अशी त्यांची आग्रही मागणी असायची.
एके दिवशी विधिमंडळ सभागृहामध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरु होता. प्रश्नोत्तरे सुरु असताना अचाकनपणे गुलाबराव गावंडे उभे राहिले व अध्यक्षांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करु लागले. पण अध्यक्षांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले.
गुलाबरावांचा पारा चढला.
सभागृह अध्यक्षांचे आपल्याकडे लक्ष नसल्याने गुलाबरावांचा पारा चढला. ते तडक वेलमध्ये (अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत) आले आणि मोठमोठ्याने घोषणा देऊ लागले. अध्यक्षांनी त्यांना तत्काळ त्यांच्या जागेवर बसण्याची सूचना केली, पण गावंडे यांनी अध्यक्षांच्या सूचनेचे पालन केले नाही.
गुलाबराव गावंडे यांचे व्यक्तिमत्व जरा हटके होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे दाढी वाढवलेली, कपाळावर भगवा टिळा आणि भगवा उपरणे असायचे. त्यावर जॅकेट परिधान केलेले असायचे.
त्यांनी जॅकेटच्या खिशात हात घालून दोन्ही बाटल्या बाहेर काढल्या. त्या दोन्ही बाटल्यांत पेट्रोल होतं.
गुलाबरावांकडे धाव घेतली
सभागृहातील कोणालाही काही अंदाज येण्यापूर्वी त्यांनी पेट्रोलच्या दोन्ही बाटल्या स्वत:च्या अंगावर ओतून घेतल्या आणि दुसऱ्या खिशातून लायटर बाहेर काढला.
गावंडे रागाच्या भरात होते. ते लायटर पेटवणार इतक्यात प्रसंगावधान व उद्भवणाऱ्या परिस्थितीचे भान हर्षवर्धन पाटील यांना आले. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ क्षणाचाही विलंब न करता गुलाबरावांकडे धाव घेतली.
हर्षवर्धन पाटील यांच्या धाडसीपणाने आणि प्रसंगावधानाने महाराष्ट्राचं विधिमंडळ जळण्यापासून वाचलं…!
हर्षवर्धन पाटील यांचं सर्व लक्ष गावंडे यांच्या लायटरकडे होते. त्यांनी पहिल्यांदा गावंडे यांच्या हातातील लायटर धरला आणि तो लायटर गावंडे यांच्या हातातून बाजूला करुन त्यांना घट्ट पडकले.सर्व सभागृहामध्ये पेट्रोलचा वास पसरला होता. त्यातच भर म्हणजे सभागृहामध्ये सर्व लाकडी फर्निचर होते. जर अशावेळी लायटर पेटला असता तर कोणालाही कसलाही अंदाज येण्याअगोदर सभागृह पेटले असते.
मोठा अपघात आणि अनर्थ टळला
त्यामुळे समाजामध्ये, राज्यामध्ये तसंच संपूर्ण देशामध्ये चुकीचा आणि नकारात्मक संदेश गेला असता. गुलाबरावांची ही कृती सत्ताधारी पक्षासहित विरोधी पक्षासाही आवडलेली नव्हती. या कारणामुळे सभागृह तहकूब करावे लागले. गुलाबरावांना पकडलेले पाहून सभागृहातील कर्मचारी मदतीला धावून आले. त्यांनी सोडवासोडव केली. गुलाबरावांना शांत केले. यामुळे मोठा अपघात आणि अनर्थ टळला.
सभागृहातील पेट्रोलचा वास काढण्यासाठी नानाविध उपाय करावे लागले. हर्षवर्धन पाटील यांच्याकडेही कपडे बदलण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. कारण पेट्रोलचा वास त्यांच्या अंगालाही लागला होता. तहकुबीनंतर सभागृहाचे कामकाज सुरु झाले. मग तावातावाने गुलाबराव गावंडेंच्या प्रकरणावर चर्चा सुरु झाली.
लायटर सभागृहात आलेच कसे
त्यामध्ये अनेक सदस्यांनी आपापली मतं मांडली. पेट्रोलच्या बाटल्या आणि लायटर सभागृहात आलेच कसे यावर चर्चा होऊन यातील चर्चा होऊन यातील सत्य शोधण्याासाठी समिती नेमली गेली आणि या चर्चेतून सभागृह सुरक्षिततेचे काही नियम केले पाहिजेत, यावर सर्वांमध्ये एकमत झाले.
अधिवेशकालापुरते त्यांचे निलंबन
गुलाबरावांची ही कृती अशोभनीय आणि सभागृहाच्या प्रतिमेला तडा जाणारी होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे भाग होते. काय कारवाई करावी, याबाबत मतमतांतरे होती. पण हर्षवर्धन पाटील यांनी संसदीय कार्यमंत्री म्हणून अधिवेशकालापुरते त्यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेतला. एवढंच नव्हे तर त्या निर्णयाची अंमलबजावणीही केली.
हर्षवर्धन पाटील यांनी धाडस केले. गुलाबरावांना मिठी मारली. जर का त्यांच्या हातातून लायटर सोडवला गेला नसता, तर अनर्थ ओढवला असता. हर्षवर्धन पाटील यांच्या प्रसंगावधानाने हा अनर्थ टळला आणि विधिमंडळ जळण्यापासून वाचले.
हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या ‘विधानगाथा’ या पुस्तकात त्यांनी त्यांच्या काही खास आठवणी लिहिल्या आहेत.
अशीच एक आठवण म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या धाडसीपणाने आणि प्रसंगावधानाने महाराष्ट्राचं विधिमंडळ जळण्यापासून वाचलं…!
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम