वसंतराव नाईक म्हणायचे वेळ आली तर शिवसेना चोवीस तासांत बंद करेन
आजघडीला शिवसेना हा राज्यातील प्रमुख पक्ष आहे. उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख अर्थात मुख्यमंत्री आहेत. पण राज्यांचे असे एक मुख्यमंत्री होते, जे म्हणायचे “वेळ आली तर चोवीस तासांत त्यांना बंद करू शकेन”
मुख्यमंत्री वसंतराव नाईक
वसंतराव नाईक यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे. सुरुवातीच्या काळात कायद्याची पदवी घेऊन त्यांनी काही दिवस पुसद येथे वकिली केली. नंतर ते राजकारणात सक्रीय झाले. पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष झाले १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच वर्षी ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष आले.
पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले. (तेव्हा विदर्भ मध्य प्रदेश मध्ये होते) १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते. पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर १९६३ साली ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले.
शिवसेना म्हणजे वसंतसेना !
स्वातंत्र्यनंतर देशातील सर्वच क्षेत्रात कॉँग्रेसची सत्ता होती. पण नंतरच्या काळात अनेक क्षेत्रात कॉँग्रेसला स्पर्धक निर्माण होवू लागले. कामगार क्षेत्रात डाव्या पक्षांची ताकद वाढत होती. मुंबईतील कामगार देखील डाव्या आणि समाजवादी कामगार संघटनामध्ये सहभागी होवू लागले होते.
डाव्या संघटनाच्या वाढत्या प्रभावामुळे सत्ताधारी काँग्रेसपुढील डोकेदुखी होती. त्यावर कॉँग्रेसला उत्तरही सापडले. ते उत्तर म्हणजे शिवसेना.त्यावेळी 1966 मध्ये मुंबईत शिवसेनेची स्थापना केली होती.

अस म्हटल जात की, “शिवसेना डाव्या पक्षांना शह देईल म्हणून काँग्रेसही शिवसेनेला खतपाणी घालत राहिली.” त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते. डाव्या संघटनाच्या विरोधात मुख्यमंत्री वसंतराव नाईक उघडपणे शिवसेनेची पाठराखण करत होते. त्यामुळे शिवसेनेला ‘वसंत सेना’ म्हटलं गेलं.
24 तासात शिवसेना बंद करू शकतो
डाव्या कामगार संघटना आणि शिवसेना यांच्या संघर्षातून दिवसेदिवस शिवसेनेची ताकद वाढत चालली होती. त्यावर अनेक नेत्याकडून मुख्यमंत्री असलेल्या वसंतराव नाईक यांना विचारताच ते म्हणायचे
“तुम्ही त्यांचा उगीच बाऊ करता. वेळ आली तर चोवीस तासांत त्यांना बंद करू शकेन इतका पुरावा माझ्यापाशी आहे.”
जेष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकरांनी ‘हे सारे कोठून येते’ या पुस्तकात वसंतराव नाईक आणि शिवसेनेबाबत लिहिलंय की, ‘शिवसेनेचा विशेष दरारा होता त्या काळात खासगी बैठकांतून वसंतरावांना शिवसेनेविषयी बोलताना अनेकांनी ऐकले होते. वसंतराव पाइप झटकत म्हणत,
‘तुम्ही त्यांचा उगीच बाऊ करता. वेळ आली तर चोवीस तासांत त्यांना बंद करू शकेन इतका पुरावा माझ्यापाशी आहे.’ पण ही वेळ त्यांच्या कारकीर्दीत कधीच आली नाही किंवा त्यांनी ती आणली नाही. शिवसेनेचा वाघ त्यांनी चांगला सांभाळला. तो कम्युनिस्टांशी डरकाळ्या फोडीत हाणामारीचे मुकाबले करी आणि वसंतरावांचे अंग चाटी.’
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम