Take a fresh look at your lifestyle.

महापुरुषांचा विचार मिरवला नाहीतर तो विचार आपल्या कारकिर्दीत जगून दाखवला

0

महाराष्ट्राला गौरवशाली महापुरुषांचा वारसा लाभला आहे. आजही महाराष्ट्राची घौडदौड त्यांच्याच विचारांवर चालू आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणुकीत महापुरुषांची नावे घेऊन मते मागण्याची पद्धतच रूढ झाली आहे. निवडणुकीपुरता महापुरुषांचा वारसा मिरवायचा, निवडून यायचं अन सत्तेची खुर्ची मिळताच सोईस्करपणे महापुरुषांना, समाजसुधारकांना विसरायचं हा जणू पायंडाच महाराष्ट्राच्या सत्ताकरणात पडलेला होता.

या पद्धतीला आपल्यापरीने छेद देण्याचा प्रयत्न केला; तो  विजयसिंह मोहिते पाटीलांनी. विजयसिंह मोहिते पाटीलांनी फक्त महापुरुषांचा विचार मिरवला नाहीतर तो विचार आपल्या कारकिर्दीत जगून दाखवला.

पर्यटनमंत्री म्हणून पदभार स्वीकारला

२००४ ला महाराष्ट्राच्या निवडणूका झाल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी स्व.विलासराव देशमुख साहेब विराजमान झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांना ग्रामविकास व पर्यटनमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.

कोणतही खातं आपल्या वाट्याला आलं की; त्या खात्यावर आपल्या कामाची छाप पाडण्यात विजयदादांचा हातखंडाच होता. पर्यटन खात्याची धुरा हाती येताच विजयदादांनी समाजाला कायम प्रेरणा देणाऱ्या महापुरुषांची प्रेरणास्थळ निर्माण करण्याचा मनोदय केला. त्यासाठी त्यांनी प्रथम मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यटन खात्याच्या वाट्याला येणाऱ्या तुटपुंज्या निधीत भरीव तरतूद करून घेतली.

 शिल्पसृष्टी उभारण्याचा शुभारंभ

विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली २००४ साली पर्यटन विभागाने महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या महापुरुषांच्या स्मृती कायम जिवंत ठेवण्यासाठी शिल्पसृष्टी उभारण्याचा शुभारंभ केला.

अकलूज येथील भुईकोट किल्ल्यात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतच्या विविध ऐतिहासिक घटनांची अतिशय विलोभनीय शिल्पसृष्टी साकारण्यात आली.

ते  एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी  शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवनेरी, रायगड, सिंहगड व पुरंदर या किल्ल्याची डागडुजी व किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध सोईसुविधा निर्माण केल्या.

चौंडीचे स्मारक

महाराष्ट्राची थोर सुपुत्री व मध्यप्रदेशतील होळकर संस्थांनाची कर्तव्यदक्ष राणी अहिल्यादेवी होळकर, ज्यांनी काशी विश्वेश्वरासहित अनेक मंदिरांचा व नदीघाटांचा जीर्णोद्धार केला; त्या अहिल्यादेवींची त्यांच्या कर्तुत्वाला साजेशी शिल्पसृष्टी त्यांच्या जन्मगावी चौंडी ता.कर्जत जामखेड येथे  विजयदादांनी तेवढ्याच दिमाखात उभा केली.

आज लाखो समाजबांधव तेथे नतमस्तक होऊन प्रेरणा घेऊन जातात. तसेच विजयदादांनी, गोरगरीब व वंचितांच्या मुलांमुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून समाजाला अज्ञानाच्या गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या व महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणाची वीट रचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचीसुद्धा शिल्पसृष्टी त्यांच्या जन्मगावी नायगाव ता. खंडाळा येथे साकारली.

अण्णा भाऊ साठे यांची शिल्पसृष्टी

१९५० च्या दशकात सयुंक्त महाराष्ट्राची चळवळ ज्यांच्या शाहिरीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली; अश्या लेखक, विचारवंत आण्णाभाऊ साठे यांची शिल्पसृष्टी त्यांच्या जन्मगावी वाटेगाव ता. वाळवा येथे उभा केली.

विजयसिंह मोहिते पाटील फक्त शिल्पसृष्टी उभा करून थांबले नाही तर त्यांनी महाराष्ट्रातील सर्वधर्मीय तिर्थक्षेत्रांना “तिर्थस्थळ विकास निधीच्या” माध्यमातून भरीव निधी दिला. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मंदिरांना निधी मिळाला व त्यातून मंदिराचा जिर्णोद्धार झाला तसेच येणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवास व इतर सोईसुविधा निर्माण  झाल्या.

“पर्यटन महोत्सव” 

विजयसिंह मोहिते पाटील  यांनी महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात “पर्यटन महोत्सव” सुरू केला. महाराष्ट्रात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विजयदादांनी कोकणात तारकर्ली येथे स्कुबा ड्रायव्हिंग व स्नॉरकलिंग हे हौशी जलक्रीडाप्रकार सुरू केले व औरंगाबाद येथे “शिल्पकला व हस्तकलासाठी कलाग्रामची” निर्मिती केली. सोलापूर येथे “कॅटरिंग कॉलेज” चालू केले.

आपल्या २००४ ते २००९ पर्यंतच्या पर्यटन मंत्रिपदाचा कालावधीत महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा जतन करण्याबरोबरच पर्यटन क्षेत्र समृद्ध  करण्याचा प्रयत्न केला.

आपल्या पाच वर्षांच्या कार्यकिर्दीत नवसंकल्पना, दूरदृष्टी व ऐतिहासिक कार्यातून  विजयसिंह मोहिते पाटील यांनी पर्यटन खात्यावर आपली कायमची छाप सोडली.

  • मिलिंद पाटील (विजयगाथा)

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.