आजोबा विरुद्ध नातू : या निवडणुकीची देशभर चर्चा झाली होती
राजकारणात काका विरुद्ध पुतण्या, भाऊ-भाऊ आमने सामने अश्या अनेक निवडणुका तुम्ही पाहिल्या असतील, पण महाराष्ट्राच्या राजकारणात एक निवडणूक अशी झाली होती, ती म्हणजे आजोबा विरुद्ध नातू.
या आजोबा विरुद्ध नातू यातील आजोबा म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि नातू म्हणजे माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर
मराठवाड्यातील निलंगा हे निलंगेकर यांचे गाव. शिवाजीराव निलंगेकर शाळेत शिकत असतानाच ते स्वतंत्रसमरात सहभागी झाले होते. पुढे सेवादलात सक्रीय होवून काम करू लागले. उच्च शिक्षणासाठी ते हैद्राबाद ला गेले. वकिलीची पदवी घेवून परत आले. राजकारणात सक्रीय झाले. आमदार झाले, मंत्री झाले. मुख्यमंत्री देखील झाले.
मुख्यमंत्री पदाची लॉटरी
शिवाजीराव निलंगेकर यांनी १९५७ साली पहिली विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली पण त्यात त्यांना अपयश आले. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ते निलंगा मतदारसंघातून आमदार झाले. जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले. वसंतराव नाईक सरकार मध्ये पुनर्वसन खात्याचे मंत्री झाले. त्यानंतरच्या काळात ते अंतुले सरकारमध्ये बांधकाम, शिक्षण, वसंतदादा पाटील यांच्या सरकार मध्ये आरोग्य तर बाबासाहेब भोसले यांच्या सरकार मध्ये पाटबंधारे खात्याचे मंत्री राहिले.
१९८५ कॉंग्रेसच्या पक्षातील अंतर्गत वादात मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि अचानकपणे शिवाजीराव निलंगेकर यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली. लॉटरी लागली असे यासाठी, कारण जेव्हा त्यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाली. तेव्हा ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते.
३ जून १९८५ रोजी शिवाजीराव निलंगेकर यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसा निलंगेकर यांचा कार्यकाल देखील खूपच अल्पकालीन राहिला कारण त्यांना जवळपास फक्त ११ महिनेच मुख्यमंत्री पद मिळाले. कारण ते मुख्यमंत्री असतानाच मुलीच्या वैद्यकीय प्रवेशासाठी गुण वाढवण्यासाठी त्यांनी हस्तक्षेप केला, असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आणि याच प्रकरणामुळे त्यांना अवघ्या ११ महिन्यात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे या प्रकरणात त्यांचा सहभाग नव्हता हे सिद्ध झाले. पण त्यांना आपले पद गमवावे लागले.
आजोबा विरुद्ध नातू
पुढे १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र शिवाजीराव निलंगेकर यांना पराभवाचा धक्का बसला. पण ते खचले नाहीत. १९९९ च्या निवडणुकीत पुन्हा उभा राहिले आणि निवडूनही आले. पण त्यानंतरच्याच २००४ च्या निवडणुकीत शिवाजीराव निलंगेकर मोठ्या खिंडीत सापडले. त्यांच्या विरोधात त्यांचा तरूण नातू उभा राहिला.
नातू विरुद्ध आजोबा अशी निवडणूक देशभर गाजली. पण या निवडणुकीत नातवाकडून आजोबा शिवाजीराव निलंगेकर यांना पराभव स्वीकारावा लागला. पण गोष्ट इथे संपत नाही. २००९ च्या निवडणुकीत पुन्हा आजोबा नातू आमने सामने आले. या निवडणुकीत मात्र शिवाजीराव निलंगेकर यांनी नातू संभाजीराव निलंगेकर यांचा पराभव केला. हा शिवाजीराव निलंगेकर यांचा लढवय्या स्वभाव होता.
२०१४ साली मात्र विधानसभा निवडणुकीला शिवाजीराव निलंगेकर यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अशोकराव निलंगेकर उभे राहिले. यावेळी झालेल्या काका-पुतण्या निवडणुकीत मात्र पुतण्या संभाजीराव निलंगेकर यांनी बाजी मारली. संभाजीराव निलंगेकर विधानसभेत निवडून गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात त्यांना मंत्री म्हणूनही संधी मिळाली.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम