एका मराठी कुटुंबातील मुलगा उत्तर प्रदेशाचा पहिला मुख्यमंत्री झाला
मराठी लोकांना उत्तर भारतीय लोक स्वीकारत नाहीत, असं नेहमी म्हटलं जात. पण या गोष्टीला एक व्यक्ती मात्र अपवाद म्हणावा लागेल, ते म्हणजे गोविंद वल्लभ पंत
मुळचे महाराष्ट्रातील असलेल्या पंत घराण्यातील गोविंद वल्लभ पंत उत्तर प्रदेश चे पहिले मुख्यमंत्री झाले. पुढे देशाचे गृहमंत्री झाले.
पंडित गोविंद बल्लभ पंत यांचा जन्म १० सप्टेंबर १८८७ रोजी अल्मोडा जिल्ह्यातील श्यामली पर्वत क्षेत्रातील खुंट गावात झाला. त्याचे घराणे मुळचे मराठी ब्राम्हण होते. त्याचे पूर्वज महाराष्ट्रातून अल्मोंडा जिल्ह्यात येवून स्थायिक झाले होते. ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे आजोबांनी त्यांचे पालनपोषण केले.
अल्मोडा सोडून अलाहाबाद
१९०५ मध्ये ते अल्मोडा सोडून अलाहाबादला आलो. म्योर सेंट्रल कॉलेजमध्ये गणित, साहित्य आणि राज्यशास्त्र विषयात ते अव्वल होते. याच काळात अभ्यासाबरोबरच ते कॉंग्रेसमध्येही सक्रीय झाले. त्यांनी १९०७ साली बीए आणि १९०९ मध्ये कायद्याची पदवी चांगल्या गुणांसह प्राप्त केली. त्याबद्दल त्यांना महाविद्यालयाकडून त्यांना “लैम्सडेन पुरस्कार” मिळाला होता.
शिक्षण आणि साहित्याबद्दल जागरूकता
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते १९१० साली ते पुन्हा अल्मोडाला परत गेले. तिथेच त्यांनी वकिली सुरू केली. वकिलीच्या कारणास्तव ते पहिल्यांदा रानीखेत आणि नंतर काशीपुरात गेले.
तिथे त्यांनी शिक्षण आणि साहित्य याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रेमसभा नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेचे काम इतक्या प्रमाणात वाढले कि काशिपूरमधून ब्रिटीश शाळा बंद कराव्या लागल्या होत्या.
स्वातंत्र्यलढ्यात सहभाग
महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत डिसेंबर १९२१ मध्ये गोविंद वल्लभ पंत यांनी असहकार चळवळीच्या निमित्ताने पंत राजकारणात सहभागी झाले. ९ ऑगस्ट १९२५ रोजी उत्तर प्रदेशमधील काही तरुणांनी काकोरी येथील सरकारी खजाना लुटला. त्यावेळी त्या तरुणांसाठी गोविंद वल्लभ पंत यांनी कोर्टात खटला लढला. याच काळात ते नैनीतालहून स्वराज पक्षाच्या तिकिटावर विधानपरिषदेचे सदस्यही होते.
मुख्यमंत्री ते देशाच्या गृहमंत्री पदापर्यंतचा प्रवास
१७ जुलै १९३७ रोजी गोविंद वल्लभ पंत पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. या काळात ते २ नोव्हेंबर १९३९ पर्यंत ब्रिटिश भारतात संयुक्त प्रांतांचे (उत्तर प्रदेश) पहिले मुख्यमंत्री झाले.
यानंतर पुन्हा १ एप्रिल १९४६ ते १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत ते पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही 26 जानेवारी १९५० ते २७ डिसेंबर १९५४ या काळात ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होते.
त्यानंतर त्यांना केंद्र सरकार मध्ये गृहमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. भारताचे गृहमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ १९५५ ते १९६१ पर्यंतचा होता.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम