गोपीनाथ नाव आवडत नव्हतं म्हणून रडायचे गोपीनाथ मुंडे
महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे हे नाव माहित नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. खरंतर गोपीनाथ मुंडे हे नाव राज्यातील लाखो लोकांच्या हृदयात कोरलेले आहे. पण हेच गोपीनाथ नाव आवडत नाही म्हणून लहानपणी गोपीनाथ मुंडे रडायचे.
गोपीनाथरावांचा हा किस्सा त्यांच्या मातोश्री लिंबाबाई यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितला होता.
नाव आवडत नव्हतं म्हणून रडायचे गोपीनाथराव
एका मुलाखतीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या मातोश्री लिंबाबाई मुंडे यांनी गोपीनाथरावांच्या बालपणाच्या काही खास गोष्टींचा खुलासा केला होता, गोपीनाथ मुंडे बालपणी खूप खोडकर आणि हट्टी होते. ‘माझं नाव ‘गोपीनाथ’ का? मला आवडत नाही,’ असे म्हणून गोपीनाथराव लहानपणी तासनतास रडायचे. वडिलांनी मात्र त्यांचे खूप लाड केले. अशा अनेक आठवणी लिंबाबाई यांनी सांगितल्या होत्या.
‘बघा, आय झोपलीय, गाय रस पिऊन गेली.’
एका आठवणीत लिंबाबाई म्हणतात, एकदा मी दुपारी स्वयंपाक आटोपून झोपले होते. आमरस करून माठाखाली ठेवला. स्वयंपाकघराच्या बाहेरून कडी घातली. 5-6 वर्षांचा गोपीनाथ आला. मी झोपू नये असे त्याला वाटे. मला झोपलेली पाहून रागावला. गोठ्यातून गाय आणली, कडी उघडली. आमरस गाईला दिला आणि पळत जाऊन ‘दादांना’ आणलं. ‘बघा, आय झोपलीय, गाय रस पिऊन गेली.’ मी घाबरून उठले. म्हणाले, ‘गाय रस पिते आहे, पण लबाडा, गाय कवाड काढून कशी आली रे? आणि माठाखालचा रस हाताने घेतला कारे तिनं?’
अभिनेता राजेश खन्नाचे चाहते होते गोपीनाथराव
गोपीनाथ मुंडे हे सुपरस्टार राजेश खन्नायांचे मोठे चाहते होते आणि पहिल्या दिवशी त्यांनी पाहिलेल्या प्रत्येक सिनेमाचे प्रदर्शन असायचे त्याच दिवशी तो चित्रपट ते बघायचे .
दो हंसो का जोडा
विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात खास मैत्री होती.विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीत आणि राजकीय वाटचालीत अनेक सारख्या गोष्टी पाहायला मिळतात. दोघांनीही सामान्य कुटुंबातून येऊन राज्य व देशाच्या राजकारणात आपला एक वेगळा ठसा निर्माण केला. दोघेही लोकनेते होते. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांची मैत्री राहिली.
1980 च्या दशकात दोघेही आमदार म्हणून एकाच वेळी विधानसभेवर गेले. दिवंगत देशमुख हे राज्यसभेवर गेले, तर दिवंगत मुंडे हे लोकसभेवर गेले. दिल्लीचे राजकारणही दोघांनी एकदाच सुरू केले. दोघेही ग्रामीण भागातून पुढे आल्याने त्यांना ग्रामीण विकासाची जाण होती. त्यामुळे केंद्रात गेल्यानंतर दिवंगत देशमुख यांना ग्रामीण विकास खात्याचा केंद्रीय मंत्री होता आले. ग्रामीण भागातील सक्षम नेतृत्व असल्याने पक्ष नेतृत्वाने दोघांच्या खांद्यावर ग्रामीण विकास खात्याचीच धुरा दिली हा एक योगायोग होता. या खात्याचाच कारभार करीत असतानाच दोघांचंही निधन झाले.
हा एक विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम