२०१४ च्या मोदी लाटेतही राजीव सातव यांनी काँग्रेस कडून विजय मिळवला होता
कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा राजीव सातव यांची प्रकृती नाजूक बनली होती.
त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला होता आणि शरीरात या विषाणूचा संसर्ग झाला होता. अखेर आज सकाळी त्यांचे वयाच्या 47 व्या वर्षी निधन झालं आहे.
राजीव सातव हे सध्या कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्याकडे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं गुजरात प्रभारी पदही होतं. तसंच काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे ते निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार आणि राज्यसभेच्या खासदार होत्या.
राजीव सातव यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी लाटेतही विजय मिळवण्याची कामगिरी केली होती. त्यांनी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पराभूत केलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.
काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्यावर असलेल्या निष्ठेमुळे त्यांचं पक्षात वजन होतं. याशिवाय ते थेट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी कोणत्याही मुद्द्यांवर बोलत असायचे.
राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पुढे 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान सातव यांच्यावर गुजरात प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्या निवडणुकीत काँग्रेसने चांगलं यश मिळवलं.पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली होती.
कॉंग्रेस आणि गांधी घराण्याशी असलेल्या निष्ठेमुळे त्यांच्यावर गुजरातच्या कॉंग्रेस प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. युथ कॉंग्रेसचे अध्यक्षपद देखील त्यांच्याकडे होते.
चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार
हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
सोळाव्या लोकसभेत प्रथमच निवडून येणाऱ्या खासदारांमध्ये अष्टपलू कामगिरी केल्याबद्दल राजीव सातव यांना संसदरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आयआयटी, चेन्नईच्या प्राईम पॉइंट फाउंडेशनच्या वतीने रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. सी. रंगराजन यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला होता.
सातव यांचा देशपातळीवर सहभाग
राहूल ब्रिगेडचे विश्वासू व्यक्तीमत्व म्हणून खासदार ॲड. सातव यांच्याकडे बघितले जात होते. काँग्रेसच्या वरिष्ठांच्या बैठकीतील धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग होता. काँग्रेसच्या देशपातळीवरील बैठकांमध्ये त्यांचा सहभाग होता.
खासदार राजीव सातव अल्प परिचय
- खासदार ॲड. राजीव शंकरराव सातव
- जन्म- ता. २१ सप्टेंबर १९७४
- मुळ गाव- मसोड (ता.कळमनुरी, जि. हिंगोली)
- शिक्षण- बीएस्सी एमए एलएलबी (पुणे)
भुषविलेली पदे
- मसोड पंचायत समिती पंचायत समिती गणाचे सदस्य
- हिंगोली जिल्हा परिषद सदस्य
- कळमनुरी विधानसभा आमदार
- युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
- अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष
- हिंगोली लोकसभेचे खासदार
- राज्यसभा सदस्य
- प्रभारी गुजरात काँग्रेस.
हिंगोलीकर निशब्द
मागील २३ दिवसांपासून हिंगोलीकरांचे लक्ष पुणे येथील जहांगीर हॉस्पीटलकडे लक्ष लागले होते. त्या ठिकाणावरून काय निरोप येईल याकडे हिंगोलीकर कानटवकारून बसले होते. खासदार सातवांची प्रकृती चांगली होईल या आपेक्षेवर जनता होती. मात्र आत नियती जिंकली अन सातव कोरोना अन त्यानंतरची लढाई हरले. आज ते गेल्याचे निरोप मिळाले अन सारे हिंगोलीकर निशब्द झाले.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम