भारत जोडो यात्रेच्या आधीही अनेकदा शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा दिला आहे
राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यांनतर पहिल्यांदाच शिवसेना काँग्रेस जाहीरपणे सोबत आले पण त्यापूर्वी अनेकदा शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्याचाच हा आढावा
शिवसेना नेते आदित्य ठाकरे काँग्रेसच्याराहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. राज्यातल्या महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे असले तरी राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदाच जाहीरपणे एकत्र दिसणार आहेत.
दोन वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडी स्थापन होताना अनेकांना काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येतील याची खात्री अनेकांना नव्हती. कारण, काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांवर यथेच्छ तोंडसुख घेणारी शिवसेना आता काँग्रेसबरोबर कसं सरकार स्थापन करेल कशी ? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली.
राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यांनतर पहिल्यांदाच शिवसेना काँग्रेस जाहीरपणे सोबत आले पण त्यापूर्वी अनेकदा शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्याचाच हा आढावा
शिवसेनेच्या पहिल्या निवडणूक सभेत काँग्रेस नेते सहभागी झाले होते
शिवसेनेच्या पहिल्या निवडणूक सभेत त्या काळातील काँग्रेसचे मोठे नेते रामाराव अदिक सहभागी झाले होते. रामाराव आदिक आणि ठाकरे यांची मैत्री जुनी आहे. ‘बाळ ठाकरे अॅण्ड द राइज ऑफ शिवसेना’ या पुस्तकात वैभव पुरंदरें यांनी लिहिले आहे. या पुस्तकानुसार, बाळासाहेबांनी त्यावेळी सांगितले होते की, आम्ही कम्युनिस्टांना हरवण्यासाठी एकत्र आलो आहोत.
आणीबाणी आणि बाळासाहेब ठाकरे
1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. आणीबाणीला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्वतः मुंबईतील राजभवनात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यांनी आणीबाणीचे समर्थन तर केलेच, पण याला धाडसी पाऊल म्हणत श्रीमती गांधींचे अभिनंदनही केले होते.
आणीबाणी लागल्यानंतर ‘मार्मिक’वरही बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे ‘मार्मिक’वरील बंदी उठवावी, अशी मागणी करण्यासाठी शिवसेनेचे तेव्हाचे नेते डॉ. हेमचंद्र गुप्ते, मनोहर जोशी आणि सुधीर जोशी हे संजय गांधी यांना भेटायला दिल्लीला गेले होते.
अंतुले यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा
1980 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान होताच राज्यातील सरकार बरखास्त करण्यात आले आणि पुन्हा निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीत शिवसेनेने आपला एकही उमेदवार उभा केला नव्हता आणि काँग्रेसला समर्थन दिले. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने अब्दुल रहमान अंतुले यांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते. अंतुले आणि ठाकरे चांगले मित्र होते.
यामुळे मुख्यमंत्री झालेल्या बॅ. अब्दुल रहमान अंतुले यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेनेने प्रचार केला. इतकंच नाही तर या प्रचाराच्या सांगता सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि रामराव आदिक प्रमुख वक्ते होते.
1980 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार न लढवण्याचा समझोता काँग्रेसशी केला. त्याबदल्यात शिवसेनेच्या दोन नेत्यांना म्हणजे वामनराव महाडिक आणि प्रमोद नवलकर यांना विधानपरिषदेत जाण्याची संधी मिळाली.
मराठीच्या मुद्द्यावर प्रतिभा पाटील यांना पाठिंबा
शिवसेना भाजप युती झाल्यांनतर राज्य आणि केंद्र दोन्ही ठिकाणी हे पक्ष सोबत लढत होते. पण 2007 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते भैरोसिंग शेखावत हे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार होते. प्रतिभा पाटील या महाराष्ट्रातील असल्यामुळे त्यांना पाठिंबा दिल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले होते.
प्रणव मुखर्जी यांनाही पाठिंबा
2007च्या निवडणुकीत प्रतिभा पाटील यांचे समर्थन केल्यानंतर 2012 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही शिवसेनेने काँग्रेसचे उमेदवार असलेल्या प्रणव मुखर्जी यांनाच पाठिंबा दिला होता. मुखर्जी यांच्या विरोधात एनडीएचे उमेदवार पीए संगमा होते. शिवसेनेच्या पाठिंब्याचे आभार मानण्यासाठी प्रणव मुखर्जी स्वतः मातोश्री या निवासस्थानी आले होते.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम