पी. व्ही. नरसिंहराव याचं महाराष्ट्र कनेक्शन तुम्हाला माहित आहे का ?
पी. व्ही. नरसिंहराव यांना 9 वे पंतप्रधान म्हणून आपण ओळखतो. पण यापलीकडे त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांनी ज्या आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. त्याबद्दल त्यांना आपण कायमच सन्मानित करत आलो आहोत.
28 जून 1921 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यातील ठळक घडामोडींची ही माहिती आपण जाणून घेणार आहोत.
नरसिंहराव याचं महाराष्ट्र कनेक्शन
नरसिंहराव यांचे संपूर्ण शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून झाले. यातील दोन विद्यापीठे महाराष्ट्रातील आहेत. तसेच नागपूर जिल्ह्यातील रामटेक या मतदारसंघाचे 2 वेळा ते खासदारही होते. वर्ष 1984-89 आणि 1989-91 निवडणुकीत ते रामटेक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
नरसिंहराव यांना मराठी भाषा ही उत्तम लिहता, वाचता यायची
17 भाषांवर प्रभुत्व
नरसिंहराव यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी नरसिंहराव यांचे 17 भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तामिळ, उर्दू, कन्नड यासह इतर भाषांतून त्यांनी साहित्य निर्मिती केली.
राजकीय निवृत्ती जाहीर केल्यानंतर पंतप्रधान
नरसिंहराव यांची राजकीय कारकीर्द खूप मोठी आहे. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अश्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. पण राजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी 1991 ची लोकसभा निवडणूक लढवली नाही.
पण याच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर नरसिंहराव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. निवडणुकीच्या निकालानंतर कॉंग्रेस पक्षाचे नेते म्हणून नरसिंहराव यांची निवड झाली आणि त्यांनी 21 जून 1991 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
बाबरी मशीद आणि हिंदुत्व
त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद उद्ध्वस्त केली. त्याच दिवशी सायंकाळी केंद्र सरकारने उत्तरप्रदेशातील भाजप सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. तसेच भारतीय जनता पक्ष सत्तेत असलेली राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश ही राज्य सरकारे बरखास्त केली.
देशाची अर्थव्यवस्था केली मजबूत
नरसिंह रावांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी मनमोहन सिंग या निष्णात अर्थतज्ज्ञाची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली. तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काम केले. देशाला नवे आर्थिक धोरण मिळाले.
पंतप्रधान राहिलेल्या व्यक्तीला काँग्रेसने नाकारली उमेदवारी
पंतप्रधान राव यांनी आपल्या दूरदृष्टीने देशाला आर्थिक विकासाच्या वाटेवर नेले. अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या सोबतीने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली. पण पंतप्रधान असताना त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले.
१९९४ साली नरसिंह राव यांच्या सरकारावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे ९४ साली झालेल्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. तर १९९५ साली झालेल्या महाराष्ट्र, गुजरात, बिहार आणि ओडिशा या राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात केवळ ओडिशामध्ये काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली.
सलग अनेक राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला. त्याला राव यांना जबाबदार धरून १९९८ साली लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतर ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले. 23 डिसेंबर 2004 रोजी त्यांचे निधन झाले.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम