एके काळी कॉंग्रेस सेवा दलाचे काम करणारे दादा कोंडके बाळासाहेब ठाकरे यांचे खास झाले
अभिनेते दादा कोंडके आणि त्यांचे विनोद माहित नसलेला मानून शोधून सापडणार नाही. मराठीतले आजपर्यंतचे सर्वोत्तम विनोदवीर म्हणून दादा कोंडके ओळखले जातात. आज दादा कोंडकेंचा जन्म दिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या काही आठवणी
अभिनय सृष्ठीत प्रवेश आणि पहिले नाटक
दादा कोंडके मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलाकार झाले, पण दादा कोंडके यांचा कलेशी संबंध आला तो बँडमार्फत. मुंबईत असताना काही मित्रांसोबत दादा एका बँडमध्ये होते. इथून त्यांचा नाटकांशी संबंध आला.
याच काळात दादा कोंडके काँग्रेस सेवा दलाचेही काम करायचे.
सुरुवातीला बँड मध्ये काम करणारे दादा ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकामधून रंगभूमीवर आले. हे नाटक मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालं. त्या काळी महाराष्ट्र आणि गोव्यात ‘विच्छा माझी पुरी करा’चे दीड हजार प्रयोग झाले होते. प्रेक्षकांना ‘विच्छा माझी पुरी करा’ने वेड लावलं.
तेव्हा मुंबईत होणाऱ्या या नाटकांच्या प्रयोगांना खुद्द बाळासाहेब ठाकरे, आशा भोसले यांच्यासारखे मान्यवर न चुकता हजेरी लावायचे.

“सोंगाड्या”साठी शिवसैनिकांचा राडा
साधारण १९७३-७४काळ असेल. दादा कोंडके चित्रपट निर्मिती मध्ये उतरले होते. सुरुवातीला दादांचा ‘सोंगाड्या’ आणि ‘एकटा जीव..’ मुंबईतील भारतमाता चित्रपट गृहात लागले, पण फार कमाई झाली नाही. त्याचे कारण म्हणजे हे थिएटर लहान, त्यात तिकीट दीड रुपया अन् अडीच रुपये होते.
पण त्यांनतर ‘राम राम गंगाराम’ च्या वेळी दादांना दादरचे मराठा मंदिर हवे होते, पण मराठा मंदिरचा पारशी मालक त्यासाठी तयार नव्हता.

कारण त्याचवेळी हिंदी भाषेतील ‘हाथी मेरे साथी’ आणि ‘बॉबी’ हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार होते. दादांनी मराठा मंदिरचा मालक फिरदोस तारापोरवाला बरोबर चार महिने आधी ‘मॉर्निंग शो’चा करार केला होता. पण करारानंतरही तारापोरवाल्याने दादांकडे पाठ फिरवली. दादांचा पहिलाच चित्रपट प्रदर्शनासाठी थिएटर न मिळाल्यामुळे रखडतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली.दादांनी तारापोरवाल्याला थिएटरवर जाऊन हात जोडले, पण तो ऐकून घेत नव्हता.
तारापोरवाल्याने गुंड बोलावले. दादा कोंडके यांना बाहेर काढले. शेवटी दादा थेट बाळासाहेबांकडे गेले. दरम्यान, मुंबईत शिवसेनेचा बोलबाला वाढत होता. एका मराठी माणसाचा चित्रपट प्रदर्शित करायला पारशी थिएटरमालक नकार देतो. ही गोष्ट बाळासाहेबांना खटकली. बाळासाहेब आपल्या शैलीत दादा कोंडके यांना म्हणाले, “रडताय काय असे, त्या तारापोरवाल्याचा पायजमा फाडून तुमच्या हातात देतो. थांबा जरा.”
बाळासाहेबांनी लगेच छगन भुजबळ आणि मोहन रावलेंना बोलावून घेतले आणि त्यांना सांगितले “आत्ताच्या आत्ता त्या पारश्याला उचलून माझ्यापुढे आणा आणि मराठा मंदिरवरचे बॉबीचे पोस्टर काढा” बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश म्हटलं कि लगेच वातावरण फिरले, अर्ध्याच तासात मोहन रावळेंनी तारापोरवाल्याला बखोटीला धरून साहेबांपुढे आणले. तोपर्यंत छगन भुजबळ यांनी मराठा मंदिर वरील बॉबीचे पोस्टर उतरवले.

बाळासाहेब ठाकरे यांनी तारापोरवाल्याला कडक शब्दात सुनावले. ‘चर्चा नको, दादा कोंडकें यांचा सिनेमा लावायचा! कळलं.. अन् फक्त मॉर्निंग नाही, चारही शो! मी सांगेपर्यंत सिनेमा उतरवायचा नाही! नाही तर तुला तुझ्या थिएटरसकट उतरवीन! बाळासाहेब म्हणाले होते, ‘चला निघा आता!’ पारशी उठला. पार गळपटला होता. रावळेंनीच त्याला धरून बाहेर आणले. मराठा मंदिरला सिनेमा लागला अन् अक्षरश: धो धो चालला.
सतत विनोद लिहणारे दादा अजरामर भक्तीगीत लिहितात.
दादा कोंडके म्हणजे विनोद असचं समीकरण तुम्हाला माहित असेल. पण एकदा प्रवासात असताना दादा कोंडके यांना चक्क एक भक्तीगीत सुचू लागले. दादांनी थेट कागद पेन हाती घेतला. त्यांचा पेन कागदावर सरसर फिरू लागला. त्यावेळी त्यांच्या लेखणीतून एक अजरामर भक्तीगीत लिहिले गेले.
ते गीत म्हणजे “अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान…”
अंजनीच्या सुता या गीताने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी लोकांना मोठा आनंद दिला आहे. “तुमचं आमचं जमल” या चित्रपटातील दादा कोंडके यांनी लिहलेले हे मराठी गीत पंजाबी महेंद्र कपूरने असे ठसक्यात गायले आहे. आजही हे गाणे पाहताना दादा कोंडके स्वत:च गात आहे असा भास होतो.
जत्रेतील टूरिंग टॉकीजच्या पडद्यावर ग्रामीण भागातील एक हनुमंत भक्त सुंदर शब्दात, भक्तीरसात बुडून जात हनुमांचे वर्णन करीत हे भक्तीरसाने ओतप्रोत भरलेले गीत गातांना बघून तत्कालिन सिने रसिक सुखावला होता व आजही हेच गीत यु-ट्युबवर पहातांना सुद्धा सुखावतो. आजही हे गीत तितकेच ताजेतवाने वाटते.
चित्रपट सृष्ठीत कित्येक नट आले आणि गेले परंतू दादा कोंडके या नावाचा दरारा आजही कायम आहे आणि राहणार.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम