Take a fresh look at your lifestyle.

देवेंद्र फडणवीस : कार्यकुशल मुख्यमंत्रीपदाबरोबरच सक्षम विरोधी पक्षनेता

सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भाजपातील एक संयमी, झुंजार आणि अभ्यासू नेतृत्व अशी देवेंद्रजींची प्रतिमा निर्माण झाली आहे. भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांना ते नावाने ओळखतात.

0

दोन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी लिहिलेला हा लेख आज पुन्हा रिपोस्ट करत आहोत.

विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची धुरा माझे वडील कै. वसंतराव डावखरे यांच्याकडे १६ वर्ष होती. माझे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी विधान भवनात अधिवेशनातील कामकाज पाहण्यासाठी सातत्याने जात होतो. त्यावेळी विधानसभा व विधान परिषदेतील प्रश्नोत्तराचा तास, विविध विषयांवरील चर्चा ऐकण्यासाठी अनेक वेळा प्रेक्षक गॅलरीत जात असे.

या काळात मला विद्यमान विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भाषणे व त्यांनी मांडलेले मुद्दे ऐकता आले. एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे खोलात जाऊन व सर्व बाजूने सांगोपांग विचार करून तो प्रश्न सभागृहात मांडण्याची मा. देवेंद्रजींची पद्धत मनाला भावली होती.

१९९९ पासून २०१४ पर्यंत अवघ्या १५ वर्षांच्या काळात देवेंद्रजींमधील नेतृत्व बहरत गेले. अन्, ते २०१४ मध्ये मुख्यमंत्रीही झाले.

मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी दाखविलेली तडफदार कामगिरी महाराष्ट्राच्या स्मरणात आहे. गुंतवणूक व रोजगारात घसरण झालेल्या महाराष्ट्राला अव्वल स्थानावर नेण्याची कामगिरीही देवेंद्रजींमुळेच शक्य झाली. मात्र, सध्याच्या महाविकास आघाडीच्या काळात सुरू असलेली सर्वच स्तरांवरील घसरण पाहून देवेंद्रजींच्या नेतृत्वाची गरज अधोरेखित होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१८ पासून कार्य करताना त्यांच्याशी सातत्याने संपर्क आला. कोकणातील प्रश्न, शिक्षक-शिक्षकेतरांचे प्रश्न, वाढत्या नागरीकरणाने उद्भवणाऱ्या समस्या आदींचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याकडे त्यांचा कल होता. सामान्यांचे प्रश्न धसास लावण्याच्या त्यांच्या झपाट्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेले अनेक प्रश्न मार्गी लागले.

सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भाजपातील एक संयमी, झुंजार आणि अभ्यासू नेतृत्व अशी देवेंद्रजींची प्रतिमा निर्माण झाली आहे.

भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांना ते नावाने ओळखतात.

जिल्हास्तरावरील बहुतांशी कार्यकर्त्यांची बलस्थानांशी ते अवगत आहेत. त्यामुळे त्यांच्याच प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात भाजपाचा मोठा प्रसार झाला. विधानसभा निवडणुकीआधी काढण्यात आलेल्या महाजनादेश यात्रेच्या नियोजनावेळी कार्यरत असताना मला त्याची प्रचिती आली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नातील देश घडविण्यासाठी ते सातत्याने महाराष्ट्राच्या भूमीत कार्यरत आहेत.

आपत्कालीन परिस्थिती आणि देवेंद्रजी

गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील पूर, महाराष्ट्रातील दुष्काळ आदी परिस्थितीत जनतेला मदत करण्यात देवेंद्रजींचे कसब महाराष्ट्राला पाहावयास मिळाले होते. खेडे असो कि शहर तेथील समस्यांची माहिती मुख्यमंत्र्यांकडे तत्काळ पोचत होती. केवळ शासकीय यंत्रणा नव्हे, तर सेवाभावी संस्था व भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर आपत्कालीन परिस्थितीत सामान्यांना दिलासा देण्याचा देवेंद्रजींचा प्रयत्न आहे.

आपत्तीत नुकसान झालेल्या प्रत्येक घटकाला शासकीय मदत मिळालीच पाहिजे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.

त्याच दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच बदलापूरात नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना १० ते १५ हजारांची मदत दिली गेली. सध्याच्या कोविड-१९ च्या आपत्तीतही आपल्याला देवेंद्रजींचा महाराष्ट्रभर सुरू असलेला संचार पाहावयास मिळत आहे. तो याच भूमिकेतून. कोविड असो कि चक्रीवादळ कोकणातही आपल्या दौऱ्यातून त्यांनी अनेक समस्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले.

एक कार्यकुशल मुख्यमंत्रीपदाबरोबरच सक्षम विरोधी पक्षनेता अशी त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात ओळख निर्माण केली आहे.

कोविडच्या आपत्तीशी सामना सुरू असतानाच कोकणावर चक्रीवादळाचे संकट आले. रायगड जिल्ह्याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागाला तडाखा बसला. त्यानंतर लगेचच देवेंद्रजींनी दौरा करीत आपद्ग्रस्तांची विचारपूस केली. तसेच त्यांच्याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल शासकीय यंत्रणांचे लक्ष वेधले. त्यानंतर चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागातील शासकीय यंत्रणा जागी झाली, ही वस्तूस्थिती आहे.

कोविडने उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्रजींनी ठाणे जिल्ह्यातील विविध महापालिका क्षेत्राचा दौरा केला. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर येथील परिस्थितीची माहिती घेतली. क्वारंटाईन केलेल्या रुग्णांबरोबरच विशेष कोविड रुग्णालयांना भेट दिली. आपल्या जीवाचा धोका पत्करून थेट माहिती घेणाऱ्या निवडक नेत्यांमध्ये देवेंद्रजींचा समावेश आहे.

या दौऱ्यातच ठाण्यातील विशेष कोविड रुग्णालयातून हरविलेल्या भालचंद्र गायकवाड यांच्या कुटुंबियांची भेट झाली. त्यांनी त्यांची व्यथा जाणून थेट महापालिका आयुक्तांकडे अडचण केली. माझ्याबरोबरच आमदार संजयजी केळकर, माजी खासदार किरीटजी सोमय्या यांना पाठपुरावा करण्याची सुचना केली.

या प्रकरणाबाबत आम्ही अधिक माहिती घेत असताना, त्यांच्याकडूनही वेळोवेळी माहिती जाणून घेतली जात होती. अखेर भालचंद्र गायकवाड यांचे निधन झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी विशेष कोविड रुग्णालयाचा कारभार सुधारण्याबाबत सुचना केल्या होत्या. या प्रकरणातून एखादे प्रकरण धसास लावण्याच्या देवेंद्रजींच्या स्वभावाचा आम्हाला पुन्हा परिचय झाला.

  • आमदार निरंजन डावखरे
  • लेखक विधानपरिषद सदस्य आहेत

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.